शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. रमेश पोखरीयाल निःशंक यांनी आसियान पीएचडी फेलोशिप कार्यक्रमातील पहिल्या तुकडीला केले संबोधन
आसियान पीएचडी फेलोशिप कार्यक्रम(APFP) हा भारत सरकारने हाती घेतलेला परदेशी लाभार्थींसाठी सर्वात मोठा क्षमता विकास कार्यक्रम -श्री.रमेश पोखरीयाल निःशंक
Posted On:
16 OCT 2020 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. रमेश पोखरीयाल निःशंक यांनी आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे भारत सरकारने अर्थसहाय्य केलेल्या प्रतिष्ठित आसियान पीएचडी फेलोशिप कार्यक्रमासाठी आसियान देशांतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि आयआयटी या भारतातील प्रमुख तंत्रज्ञान संस्थेतून शिक्षण घेण्यासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.शिक्षण राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आसियान देशांतील राजदूत आणि प्रतिनिधी,उच्च शिक्षण सचिव श्री. अमित खरे ,परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव रीवा गांगुली दास,आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.व्ही.रामगोपाल राव,विविध आयआयटीमधले आसियान समन्वयक ,विविध आयआयटींचे संचालक आणि निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले, की भारत आणि आसियान देशांत शैक्षणिक आणि संशोधन बंध प्रस्थापित झाल्याचा लाभ परस्परांना होईल.यामुळे संस्कृती,उद्योग आणि संयोजन यातील संबंधांना बळकटी मिळेल.एपीएफपी मुळे तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी भारतातील तसेच आसियान देशातील शिक्षणतज्ञ, संशोधक आणि वैज्ञानिकांना एकत्र येऊन आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी दरवाजे खुले होतील. या संशोधन आणि नव्या संकल्पनांचा लाभ संपूर्ण जगातील मानवजातीच्या उत्कर्षासाठी होईल,असेही ते पुढे म्हणाले.
मंत्रीमहोदयांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण मंत्रालय, आसियान पीएचडी फेलोशिप कार्यक्रम सचिवालय ,या आसियान विद्यार्थ्यांसाठी आयआयटी दिल्ली येथे सुरू केलेल्या संस्थेद्वारे या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करेल.
एपीएफपी द्वारे केवळ आसियान नागरिकांना 1000 अशा फेलोशिप देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.एपीएफपी हा भारत सरकारने परदेशी लाभार्थींसाठी हाती घेतलेला सर्वात मोठा क्षमता विकास कार्यक्रम असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. आसियान पीचडी फेलोजना त्यांनी शिक्षण घेतलेल्या आयआयटी संस्थेचे माजी विद्यार्थी म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
यावेळी बोलताना श्री. पोखरीयाल म्हणाले ,की हा कार्यक्रम भारताच्या अतिथि देवो भव आणि वसुधैव कुटुंबकम् या दृष्टी सोबतच सर्वे भवन्तु सुखिनः या भारताने कायम संवर्धित केलेल्या आणि पुढे नेलेल्या संस्कृतीचे प्रतिक आहे.ते पुढे म्हणाले, की आम्हाला जगाला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यांनी आणखी पुढे सांगितले , की जागतिक मनःस्थितीचा विचार करून आणि त्यानुसार वाटचाल करत आम्हाला शिक्षण क्षेत्रात भारताला जागतिक शैक्षणिक केंद्र बनवायचे आहे.ते पुढे म्हणाले,की एपीएफपी कार्यक्रम हा शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने पुढे उचललेले सकारात्मक पाऊल आहे.
संपूर्ण जग कोविड -19 महामारीविरूध्द मुकाबला करत असताना आमच्या संशोधकीय संस्थांनी आम्हाला कमी किमतीचे व्हेंटीलेटर,चाचणी साधने, मास्क विकसित करून कोरोनाशी लढायला मदत केली, यावर श्री. संजय धोत्रे यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. त्यांनी या फेलोशिप कार्यक्रमात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आयआयटीतील उत्तम शिक्षण तज्ञ आणि वैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील संशोधन आणि नवसंकल्पनांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री. खरे म्हणाले, की आत्ताच जाहीर झालेले नवे शैक्षणिक धोरण-2020 (NEP) भारतातील शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणेल. नव्या शैक्षणिक धोरणाचे लक्ष्य उच्च शिक्षणात आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणात संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे, हे आहे. या धोरणाने परदेशी विद्यापीठांना आपले अभ्यासक्रम(आवार) भारतात उघडण्याची मुभा दिली आहे, तसेच आपले अभ्यासक्रम परदेशात सुरू करता येणार आहेत , हे शैक्षणिक धोरण भारताला जागतिक ज्ञान केंद्र होण्यास साधनीभूत ठरेल. श्री. खरे पुढे म्हणाले की स्पार्क म्हणजे स्कीम फॉर प्रमोशन ऑफ अँकेडेमिक अँड रीसर्च कोलँबरेशन(शैक्षणीक आणि संशोधन साहचर्य विकास योजना) या शिक्षण मंत्रालयाच्या योजनेमुळे भारतातील उच्च श्रेणीच्या संस्था आणि जागतिक मानांकन प्राप्त परदेशी संस्था यांच्यातील संशोधन क्षेत्रातील साहचर्याला प्रोत्साहन मिळेल. त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की राष्ट्रीय संशोधन संस्था हे संशोधन ,तंत्रज्ञान विकास,आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनिर्मितीला विशेष दिशा देणारे एक पाऊल ठरेल आणि नवभारताच्या दृष्टिला परीपूर्ण करायला उत्तेजन देईल. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
* * *
B.Gokhale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665292)
Visitor Counter : 123