पंतप्रधान कार्यालय
स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता प्रमाणपत्र वितरणाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
11 OCT 2020 11:00PM by PIB Mumbai
आज ज्या एक लाख लोकांना आपल्या घरांची स्वामित्व पत्र किंवा मालमत्ता प्रमाणपत्र मिळाली आहेत, ज्यांनी आपले प्रमाणपत्र डाउनलोड केले आहे, त्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो. मला माहित आहे, आज जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बसाल, रात्री एकत्र जेवाल, तेव्हा तुम्हाला इतका आनंद होईल, जेवढा यापूर्वी कधीही झाला नसेल . तुम्ही तुमच्या मुलांना अभिमानाने सांगू शकाल कि बघा, आता आपण विश्वासाने म्हणू शकतो कि हीं तुमची मालमत्ता आहे, तुम्हाला ही वारशाने मिळेल. आमच्या पूर्वजांनी जे दिले होते, ती कागदपत्रे नव्हती, आज कागदपत्रे मिळाल्यामुळे आपली ताकद वाढली आहे. आजची संध्याकाळ तुमच्यासाठी खूप आनंददायी संध्याकाळ आहे, नवनवीन स्वप्ने पाहण्याची संध्याकाळ आहे. आणि नवनवीन स्वप्नांच्या बाबतीत मुलांबरोबर गप्पा मारण्याची संध्याकाळ आहे. म्हणूनच आज जे अधिकार मिळाले आहेत त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन.
हे अधिकार एक प्रकारे कायदेशीर दस्तावेज आहेत. तुमचे घर तुमचेच आहे, तुमच्या घरात तुम्हीच राहणार आहात . तुमच्या घरांचा कसा उपयोग करायचा याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. ना सरकार यात हस्तक्षेप करू शकते ना शेजार-पाजारचे लोक यात दखल देतील.
ही योजना आपल्या देशातील गावांमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणेल. आपण सर्वजण याचे साक्षिदार बनत आहोत.
आज या कार्यक्रमात मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमर आहेत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल आहेत, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आहेत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत, विविध राज्यांचे मंत्री आहेत, स्वामित्व योजनेचे अन्य लाभार्थी मित्र देखील आज आपल्यात उपस्थित आहेत. आणि जसे नरेंद्र सिंह सांगत होते, सव्वा कोटींपेक्षा अधिक लोकांनी नोंदणी केली आहे, आणि या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत. म्हणजे आज या व्हर्चुअल बैठकीत गावातील इतक्या लोकांचा सहभाग , या स्वामित्व योजनेचे आकर्षण किती आहे, ताकद किती आहे आणि किती महत्वपूर्ण आहे,याचा पुरावा आहे..
आत्मनिर्भर भारत अभियानात आज देशाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. स्वामित्व योजना, गावांमध्ये राहणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींना आत्मनिर्भर बनवण्यात खूप मदत करणार आहे. आज हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या हजारो कुटुंबांना त्यांच्या घरांची कायदेशीर कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. पुढील तीन-चार वर्षात देशातील प्रत्येक गावात , प्रत्येक घराला अशा प्रकारची मालमत्ता प्रमाणपत्रे देण्याचा प्रयत्न केला जाईल.
आणि मित्रांनो, मला खूप आनंद झाला आहे कि आज एवढे विराट काम एका दिवसात होत आहे. हा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवसाचे भारताच्या इतिहासात देखील खूप मोठे महत्व आहे. आज देशाच्या दोन सुपुत्रांची जयंती आहे. एक भारत रत्न लोकनायक जयप्रकाश नारायण आणि दुसरे भारतरत्न नानाजी देशमुख. या दोन्ही महापुरुषांची केवळ जयंतीच एका दिवशी नाही तर या दोन्ही महापुरुषांची देशातील भ्रष्टाचारविरोधात , देशात प्रामाणिकपणासाठी , देशातील गरीबांचे , गावांचे कल्याण व्हावे अशी समान विचारसरणी होती. ...दोघांचे आदर्श एक होते,...दोघांचे प्रयत्न एकसमान होते.
जयप्रकाश बाबू यांनी जेव्हा संपूर्ण क्रांतीचे आवाहन केले, बिहारच्या भूमीतून जो आवाज निघाला, जी स्वप्ने जयप्रकाश यांनी पाहिली होती, ...ज्या स्वप्नांची ढाल बनून नानाजी देशमुख यांनी काम केले. जेव्हा नानाजी यांनी गावांच्या विकासासाठी आपल्या कामांचा विस्तार केला, तेव्हा नानाजी यांची प्रेरणा जयप्रकाश बाबू होते.
आता बघा, किती मोठे अद्भुत सहकार्य आहे, गाव आणि गरीबाचा आवाज बुलंद करणे , जयप्रकाश बाबू आणि नानाजी यांच्या आयुष्याचा एक सामायिक संकल्प आहे.
मी कुठेतरी वाचले होते कि जेव्हा डॉक्टर कलाम, चित्रकूट येथे नानाजी देशमुख यांना भेटले, तेव्हा नानाजी यांनी त्यांना सांगितले कि आमच्याकडे इथे आजूबाजूची डझनभर गावे खटल्यांपासून पूर्णपणे मुक्त आहेत. म्हणजे कुठलीच कोर्ट-कचेरी नाही - कुणाहीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नाही. नानाजी म्हणायचे कि जेव्हा गावातील लोक वादांमध्ये अडकून राहतील तेव्हा ते ना स्वतःचा विकास करू शकतील, ना समाजाचा विकास करू शकतील. मला विश्वास आहे, स्वामित्व योजना देखील, आपल्या गावांमधील अनेक विवाद समाप्त करण्याचे खूप मोठे माध्यम बनेल.
मित्रानो, संपूर्ण जगात मोठमोठे तज्ञ एका गोष्टीवर भर देत आहेत कि जमीन आणि घराच्या स्वामित्व हक्कांची देशाच्या विकासात मोठी भूमिका असते. जेव्हा मालमत्तेची नोंदणी होते, जेव्हा मालमत्तेवर हक्क मिळतो, तेव्हा मालमत्ता देखील सुरक्षित राहते. आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो. जेव्हा मालमत्तेची नोंदणी होते, तेव्हा गुंतवणुकीसाठी , नवनवीन साहस करण्यासाठी, आर्थिक उत्पनाच्या नव्या योजना बनवण्यासाठी खूप मार्ग खुले होतात.
मालमत्तेची नोंदणी झालेली असेल तर बँकेकडून सहज कर्ज मिळते. रोजगार-स्वरोजगाराचे मार्ग तयार होतात. मात्र अडचण ही आहे कि आज जगात एक तृतीयांश लोकसंख्येकडेच कायदेशीररित्या आपल्या मालमत्तेची नोंद आहे. संपूर्ण जगात दोन तृतीयांश लोकांकडे हे नाही. अशात भारतासारख्या विकसनशील देशासाठी हे खूप आवश्यक आहे कि लोकांकडे त्यांच्या मालमतेची योग्य नोंद असावी. आणि ज्यांच्या नशिबात म्हतारपण आले आहे, मुले शिकले-सवरलेले नाहीत, मोठ्या मुश्किलीने आयुष्य जगत आहेत, त्यांच्यासाठी आता यामुळे एक नव्या विश्वासाचे आयुष्य सुरु होईल.
स्वामित्व योजना आणि त्याअंतर्गत मिळणारे मालमत्ता प्रमाणपत्र याच दिशेने, याच विचारासह पीडित, वंचित, शोषित, गावातील लोकांसाठी , त्यांच्या कल्याणासाठी एव्हढे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
मालमत्ता प्रमाणपत्र गावातील लोकांना कुठल्याही वादाशिवाय मालमत्ता खरेदी किंवा विक्रीचा मार्ग सुकर करतात. मालमत्ता प्रमाणपत्र मिळाल्यांनतर गावातील लोकांना त्यांचे घर जप्त होण्याच्या भीतीपासून मुक्ती मिळेल. कुणीही येऊन आपला हक्क गाजवेल...खोटी कागदपत्रे देऊन जाईल ..घेऊन जाईल ...हे सगळे बंद होईल. मालमत्ता प्रमाणपत्र मिळाल्यांनतर गावातील घरांवर देखील बँकेकडून सुलभ कर्ज मिळू शकेल.
मित्रांनो, आज गावातील आपले किती युवक आहेत ज्यांना स्वतःच्या बळावर काहीतरी करायचे आहे. आत्मविश्वासातून आत्मनिर्भर बनायचे आहे. मात्र घर असूनही , जमीनीचा तुकडा आपलयाकडे असूनही कागदपत्रे नव्हती, कुठलीही सरकारी दस्तावेज नव्हते. जगात कुणी त्यांचे म्हणणे मानायला तयार नव्हते, त्यांना काही मिळत नव्हते. आता त्यांच्यासाठी कर्ज प्राप्त करण्याचे, अधिकाराने मागण्याचे हे कागद त्यांच्या हातात आले आहेत. आता स्वामित्व योजने अंतर्गत बनलेले मालमत्ता प्रमाणपत्र दाखवून बँकेकडून सहज कर्ज मिळवणे सुनिश्चित झाले आहे.
मित्रांनो, या स्वामित्व पत्राचा आणखी एक लाभ गावातील नवीन व्यवस्थांच्या निर्माणसंबंधी होणार आहे. ड्रोन सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे ज्याप्रकारे मैपिंग आणि सर्वेक्षण केले जात आहे, त्यामुळे प्रत्येक गावाचे अचूक जमिनीची नोंद देखील बनेल. आणि मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलत होतो, जेव्हा प्रकल्प सुरु झाला, तेव्हा मला अधिकाऱ्यांनी सांगितले कि गावांमध्ये जेव्हा आम्ही मालमत्तेसाठी ड्रोन चालवतो तेव्हा गावकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये स्वारस्य असणे स्वाभाविक आहे. मात्र सर्वांची इच्छा असायची कि ड्रोन द्वारे आम्हाला वरून आमचे गाव आम्हाला दाखवा, आमचे गाव कसे दिसते, आमचे गाव किती सुंदर आहे. आणि आपले अधिकारी म्हणायचे कि आम्हाला थोडा वेळ तरी सर्व गावकऱ्यांना त्यांचे गाव वरून दाखवणे आमच्या साठी अनिवार्य बनले होते. यामुळे गावाप्रती जिव्हाळा निर्माण व्हायचा.
बंधू आणि भगिनींनो, आतापर्यन्त बहुतांश शाळा, रुग्णालये, बाजार किंवा अन्य सार्वजनिक सुविधा कुठे उभारायच्या ..कशा करायच्या ...सुविधा कुठे असतील, …जमीन कुठे आहे, ...काही हिशोबच नव्हता. जिथे मर्जी येईल, ...जो बाबू तिथे बसला असेल, ...किंवा जो गावचा प्रधान असेल, आणि जो कुणी जरा दमदार व्यक्ती असेल, जे हवे ते करत असेल. आता सगळे कागदावर नकाशा तयार आहे. ...आता कोणती गोष्ट कुठे बनेल अगदी सहजपणे ठरेल, ...वादही होणार नाहीत आणि अचूक जमिनीची नोंद झाल्यामुळे गावातील विकासाशी संबंधित सगळी कामे सुलभ होतील.
मित्रांनो, गेल्या 6 वर्षांपासून आपल्या पंचायती राज व्यवस्थेला बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. आणि त्यांनाही स्वामित्व योजना बळ देईल. अनेक योजनांच्या नियोजनापासून त्याची अंमलबजावणी आणि देखभाल याची जबाबदारी ग्राम पंचायतींकडे आहे. आता गावातील लोक स्वतः ठरवतात कि तिथल्या विकासासाठी काय जरुरी आहे आणि तिथल्या समस्यांचे निवारण कसे करायचे आहे.
पंचायतींचे कामकाज देखील आता ऑनलाइन केले जात आहे. एवढेच नाही, पंचायत विकासाची जी कामे करते त्याचे भू सर्वेक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. जर विहीर बनली असेल तर इथे ऑनलाइन माझ्या कार्यालयापर्यंत समजू शकते कि कुठल्या कोपऱ्यात कशी विहीर बनली आहे. ही तंत्रज्ञानाची कृपा आहे. आणि ते अनिवार्य आहे. शौचालय बनले असेल तर Geo tagging होईल. शाळा बांधली असेल तर Geo tagging होईल. पाण्यासाठी छोटे धारण बांधले असेल तर Geo tagging होईल. यामुळे रुपये-पैसे गायब होण्याचे बंद होईल.
मित्रांनो, स्वामित्व योजनेमुळे आपल्या ग्राम पंचायतींसाठी देखील नगर पालिका आणि नगर-परिषदांप्रमाणे व्यवस्थित रित्या गावाचे व्यवस्थापन सोपे होईल. गावांच्या सुविधेसाठी सरकारकडून मिळत असलेल्या मदतीबरोबर, गावांमध्येही संसाधन संकलित करू शकतील. एक प्रकारे गावात राहणाऱ्यांना मिळणारे दस्तावेज़ ग्राम पंचायतीना मजबूत करण्यात खूप मदत करतील.
मित्रांनो, आपल्याकडे नेहमी म्हटले जाते की, भारताचा आत्मा गावांमध्येच आहे. मात्र, वास्तविकता ही आहे की, भारतातील गावांना आहे त्या अवस्थेतच सोडून दिले आहे. शौचालयांची सर्वाधिक समस्या कुठे होती? गावांमध्ये होती. वीजेची समस्या सर्वाधिक कुठे होती? गावांमध्ये होती. अंधारामध्ये कोणाला राहावे लागत होते-गावातील लोकांना. लाकडाच्या चुली...धुरामध्ये स्वयंपाक करण्याची असहाय्यता कुठे होती? गावांमध्ये होती. बँकींग व्यवस्थेपासून सर्वात दूर कोण होते? गावातील लोक होते.
मित्रांनो, इतकी वर्षे जे लोक सत्तेवर होते, त्यांनी मोठ-मोठ्या गोष्टी केल्या होत्या. त्यांनी गाव आणि गावातील गरीबांना त्यांच्या समस्यांसह तसेच सोडून दिले होते. मी असे करु शकत नाही...तुमच्या आशीर्वादाने जेवढे शक्य आहे ते मी करणार आहे...तुमच्यासाठी करणार आहे...गावासाठी करायचे आहे, गरीबांसाठी करायचे आहे. पीडीत, शोषित, वंचितांसाठी करायचे आहे...कारण त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही, दुसऱ्याच्या इच्छेचे ते गुलाम होणार नाहीत.
मित्रांनो, गेल्या 6 वर्षांमध्ये अशा सर्व जुन्या कमतरतांना दूर सारण्यासाठी एकानंतर एक कामांना सुरुवात केली आहे आणि गावांपर्यंत, गरीबांच्या घरापर्यंत नेले आहे. आज देशात कोणत्याही भेदभावाशिवाय, सर्वांचा विकास होत आहे. पूर्ण पारदर्शकतेसह सर्वांना योजनांचे लाभ मिळत आहेत.
जर स्वामित्व सारखी योजना पूर्वी झाली असती...ठीक आहे, त्याकाळी ड्रोन नव्हते, पण गावकऱ्यांसोबत एकत्र येऊन मार्ग काढले जाऊ शकले असते...पण हे झाले नाही. जर हे झाले असते तर मध्यस्थ, लाचखोरी आणि दलाल उद्भवले नसते, तसेच ही असहायता निर्माण झाली नसती. अगोदर जमीन मोजणीवर दलालांची नजर असे, आता ड्रोनच्या नजरेतून जमीनीची मोजणी होईल. जे ड्रोनमध्ये पाहिले जाईल, त्याची कागदावर नोंद होईल.
मित्रांनो, भारतातील गावांसाठी, गावकऱ्यांसाठी जेवढे काम गेल्या 6 वर्षांत झाले आहे, तेवढे स्वातंत्र्यानंतरच्या 6 दशकांतही झाले नाही. 6 दशकांपासून कोट्यवधी लोक बँकींग खात्यांपासून वंचित होते. त्यांची खाती आता उघडण्यात आली आहेत. 6 दशकांपासून कोट्यवधी लोकांना वीज जोडणी नव्हती. आज प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचली आहे. 6 दशकांपर्यंत, गावातील कोट्यवधी परिवार शौचालयापासून वंचित होते. आज घरा-घरात शौचालय आहे.
मित्रांनो, दशकांपासून गावातील गरीब व्यक्ती गॅस जोडणीचा विचारही करु शकत नव्हता. आज गरीबाच्या घरापर्यंत गॅस जोडणी पोहोचली आहे. दशकांपर्यंत गावातील कोट्यवधी कुटुंबांचे स्वतःचे घर नव्हते. आज सुमारे 2 कोटी गरीब कुटुंबांना पक्के घर मिळाले आहे आणि लवकरच राहिलेल्यांना पक्की घरं मिळणार आहेत, यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करत आहे. दशकांपर्यंत गावातील घरांपर्यंत नळाच्या माध्यमातून पाणी, कोणी विचारही केला नव्हता...तीन-तीन किलोमीटर अंतरावरुन आपल्या माता-भगिनींना डोक्यावर ओझे उचलून पाणी आणावे लागत असे. आता प्रत्येक घरात पाणी पोहोचले आहे. आज देशातील 15 कोटी घरांपर्यंत पाणी पोहोचवण्याठी जल जीवन मिशन राबवले जात आहे.
देशातील प्रत्येक गावापर्यंत ऑप्टिकल फायबर पोहोचवण्याची मोठी मोहीम वेगाने सुरु आहे. पूर्वी लोक म्हणत असत वीज येते-जाते. आता लोकांची तक्रार आहे, मोबाईल फोनमध्ये कनेक्शन येते आणि जाते. या सर्व समस्यांचे उत्तर ऑप्टिकल फायबरमध्ये आहे.
मित्रांनो, जिथे टंचाई आहे तेथे अशा शक्तींचा प्रभाव आणि अशा शक्तींचा दबाव त्यांना त्रास देत राहतो. आज गाव आणि गरीबांना अभावाच्या परिस्थितीत ठेवणे काही लोकांचे राजकारण होते, असा इतिहास सांगतो. आम्ही गरीबांना सर्व अभावातून मुक्त करण्याची मोहीम चालवली आहे.
बंधु-भगिनिंनो, अशा लोकांना वाटते की, जर गाव, गरीब, शेतकरी, आदिवासी सबल झाले तर मग यांना कोण विचारेल, त्यांचे दुकान चालणार नाही, कोण त्यांचे हात-पाय पकडेल? कोण त्यांच्यासमोर झुकेल?म्हणून गावातील समस्या तशाच ठेवणे, लोकांच्या समस्या कायम ठेवणे, जेणेकरुन यांचे काम सुरु राहिल. म्हणून, काम लटकवणे, अटकवणे आणि भटकवणे ही त्यांची सवय बनली.
सध्या कृषीविषयक ज्या ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत, त्यातही यांना अडचण आहे. हे लोक आक्रमक झाले आहेत. ही आक्रमकता शेतकऱ्यांसाठी नाही, आता देशाच्या लक्षात येत आहे, त्यांची ही समस्या नाही. पिढ्यान पिढ्या मध्यस्थ, घुसखोर, दलालांचे तंत्र उभा करुन एकप्रकारचे मायाजाल तयार केले होते. देशातील लोकांनी यांचे मायाजाल, त्यांच्या योजना निष्प्रभ करण्यास सुरुवात केली आहे.
कोट्यावध भारतीय एकीकडे भारताच्या नवनिर्माणात गुंतले आहेत, त्यात या लोकांची बाजू उघडी पडत आहे. देशाला लुटणाऱ्या लोकांना आता देश ओळखत आहे. म्हणूनच हे लोक सध्या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आहेत. त्यांना ना गरीबांची चिंता आहे, ना गावाची चिंता आहे, ना देशाची चिंता आहे. त्यांना प्रत्येक चांगल्या कार्याचा त्रास होत आहे. हे लोक देशाचा विकास रोखू इच्छितात. यांना वाटत नाही की, आपली गावे, गरीब, आपले शेतकरी, आपले मजूर बंधु-भगिनी सुद्धा आत्मनिर्भर व्हाव्या. आज MSP आम्ही दीडपट केला आहे, त्यांना हे करता आले नव्हते.
लहान शेतकरी, पशुपालक, मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड मिळाल्यामुळे ज्यांचा काळ्या कमाईचा रस्ता बंद झाला आहे, त्यांना ही समस्या जाणवत आहे. युरियाच्या नीमकोटींगमुळे ज्यांचे गैरव्यवहार बंद झाले, त्यांना अडचण जाणवत आहे, ते आज बेचैन आहेत. शेतकरी आणि शेतमजूरांना मिळणारा विमा, निवृत्तीवेतन अशा सुविधांमुळे ज्यांना अडचण आहे, ते आज कृषी सुधारणांचा विरोध करत आहेत. मात्र, शेतकरी त्यांच्यासोबत जायला तयार नाहीत, शेतकऱ्यांनी त्यांना ओळखले आहे.
मित्रांनो दलाल, घुसखोर, कमीशनबाज यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना कितीही वाटले तरी, कितीही स्वप्ने पाहिली, कितीही असत्य पसरवले, तरी देश थांबणार नाही. देशाने निर्धार केला आहे गाव आणि गरीबांना आत्मनिर्भर बनवण्याचा, भारताच्या सामर्थ्याची ओळख निर्माण करायची आहे.
या संकल्पाच्या सिद्धीसाठी स्वामित्व योजनेची भूमिका मोठी आहे. म्हणून, आज एक लाख कुटुंबांना कमी वेळेत स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे. मी आज विशेषत्वाने नरेंद्र सिंह जी आणि त्यांच्या पूर्ण चमूचे अभिनंदन करतो. ज्यांनी एवढ्या कमी वेळेत काम केले, त्यांचेही अभिनंदन करतो. काम लहान नाही, गावा-गावांत जाणे आणि तेही टाळेबंदीच्या काळात जाऊन एवढे मोठे काम करायचे. या लोकांचे जेवढे अभिनंदन करता येईल तेवढे कमी आहे.
मला विश्वास आहे, आमच्या सरकारमधील लहान-मोठ्या सर्वांनी जे काम केले आहे, मला नाही वाटत आता चार वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. जर, त्यांनी मनात आणले तर याअगोदरही ते देशाला देऊ शकतात. कारण, एवढे मोठे काम...आणि जेंव्हा एप्रिलमध्ये मी यांच्याशी बोललो होतो, तेंव्हा मला वाटले मी यांना जास्त सांगत आहे. मी पाहिले, मी सांगितले त्यापेक्षाही जास्त काम झाले आहे. म्हणून नरेंद्र सिंह आणि त्यांचा विभागातील सर्व लोक अभिनंदनासाठी पात्र आहेत. तसेच आज ज्यांना हा लाभ मिळाला आहे, त्या कुटुंबांचे स्वामित्व जागे झाले, आत्मविश्वास जागा झाला, तुमच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे, तुमचा आनंद माझ्या आनंदाचे कारण आहे. तुमच्या आयुष्यात भविष्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली आहे आणि ते माझे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मला दिसत आहे.
म्हणून बंधु-भगिनिंनो जेवढे तुम्ही आनंदी आहात, त्यापेक्षी मी आनंदी आहे कारण आज माझे एक लाख कुटुंबीय आत्मविश्वासाने, आत्मसन्मानाने आपल्या संपत्तीच्या कागदांसह जगासमोर विश्वासाने उभारले आहेत. ही चांगली संधी आहे. जे पी यांच्या जयंतीदिनी, नाना जी यांच्या जयंतीदिनी हे होत आहे, यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो.
माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा, यासोबतच सध्या देशात आम्ही आणखी एक मोहीम राबवत आहोत. या कोरोना काळात मास्क वापरण्याचे, दोन गज अंतर ठेवण्याचे, नियमितपणे हात साबणाने धुण्याचे...आणि तुम्हीसुद्धा आजारी पडू नये, तुमचे कुटुंबीय आजारी पडू नये, गावातील कोणीही आजारी पडू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आम्हाला माहित आहे, हा असा आजार आहे, ज्याचे जगात कसलेही औषध नाही.
तुम्ही माझे कुटुंबीय आहात...आणि म्हणून आग्रहाने सांगतो, जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत हलगर्जीपणा नको (जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं) हा मंत्र विसरु नका आणि पूर्णपणे काळजी घ्या. या विश्वासाने मी पुन्हा तुम्हाला आजच्या आनंददायी, सुखद, स्वप्नांचा क्षण, संकल्पाचा क्षण यासाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद !
***
B.Gokhale/S.Kane/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663616)
Visitor Counter : 493
Read this release in:
Hindi
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam