संरक्षण मंत्रालय

डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी

Posted On: 09 OCT 2020 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020


डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली. ओडिशाच्या  व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. एसयू-20 एमके1 या लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.

भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्र आहे. यासाठी प्रेक्षपण प्लॅटफॉर्म म्हणून एसयू-20 एमके1 या विमानाचा वापर केला आहे. प्रक्षेपणाच्या स्थितीनुसार त्याचा पल्ला बदलतो. अंतिम हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रामध्ये पॅसिव होमिंग हेडसह आयएनएस-जीपीएस नॅव्हिगेशनची सुविधा आहे. त्यामुळे रूद्रमच्या मदतीने अधिक दूरचे  लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे.

पॅसिव्ह होमिंग हेड प्रोग्रॅममुळे व्यापक फ्रिक्वेन्सी बँडच्या मदतीने वर्गीकरण करून लक्ष्य निर्धारित करणे शक्य झाले आहे. भारतीय हवाई दलासाठी क्षेपणास्त्र हे अतिशय प्रभावी अस्त्र  असून यामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीवर दडपण निर्माण करता येते.

या क्षेपणास्त्रांच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर आरएफ उत्सर्जित करणा-या घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात. अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र विकसित करण्यात आल्यामुळे देशाने स्वदेशी क्षेपणास्त्र बनविण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663156) Visitor Counter : 314