Posted On:
08 OCT 2020 3:11PM by PIB Mumbai
भारताने जानेवारी 2020 पासून कोविड - 19 चाचणी संदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दर्शवली आहे. देशातील चाचणी क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. दररोज 15 लाखाहून अधिक नमुने तपासले जात आहेत.
दर दिवशी दशलक्ष लोकसंख्येमागे 140 चाचण्या करण्याच्या डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार यामध्ये भारताने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. “कोविड - 19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष” या संबंधीच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये डब्ल्यूएचओने संशयित प्रकरणांच्या व्यापक देखरेखीसाठी या धोरणाचा सल्ला दिला आहे.
35 राज्य/केंद्रशासित प्रदेशात प्रति दिवशी दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 हून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. राष्ट्रीय सरासरीनुसार प्रति दिवशी दर दहा लाख लोकसंख्येमागे 865 चाचण्या होत आहेत.
गेल्या 24 तासात देशात सुमारे 12 लाख चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 11,94,321 चाचण्या करण्यात आल्या असून एकूण चाचण्यांची संख्या 8.34 कोटी (8,34,65,975) इतकी झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्याने पॉझिटीव्हीटी दरात घट होण्यास मदत झाली आहे, हे पुराव्याने सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर एकूण पॉझिटीव्हीटी दरात तीव्र घट झाल्याने कोविड संक्रमणाच्या प्रसाराचे प्रमाण कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे.
जास्तीत जास्त चाचण्या केल्यामुळे बाधित रुग्णांची लवकर ओळख, त्यांच्यावर पाळत ठेवणे व ट्रेसिंगद्वारे त्वरित तपासणी करणे आणि गंभीर स्वरुपाच्या घटनांमध्ये घरे / रुग्णालयात वेळेवर व प्रभावी उपचार केले गेले, परिणामी या उपाययोजनांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
7 राज्य/केंद्रशासित प्रदेशात पॉझिटीव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारच्या यशस्वी टेस्ट, ट्रॅक, ट्रॅक, ट्रीटमेंट आणि तंत्रज्ञान धोरणाचा हा परिणाम असून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
22 राज्य/केंद्रशासित प्रदेशात पॉझिटीव्हीटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. पॉझिटीव्हीटी दर 8.19 टक्के असून असून त्यात सतत घट होत आहे.
नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असून गेल्या 24 तासात 78,524 नवीन रुग्ण आढळले असून 83,011 रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत एकूण 58,27,704 रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील तफावत 49 लाखांहून (49,25,279) अधिक आहे.
सलग 17 व्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या 9,02,425 बाधित रुग्ण असून यापैकी 13.20 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो 85.25 टक्के झाला आहे.
नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून एका दिवसात महाराष्ट्रात 16 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 78,524 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 79 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 14 हजार तर त्या खालोखाल कर्नाटकात 11 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 971 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 82 टक्के मृत्यू10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्रप्रदेश, पंजाब, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.
36 टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातून (355) नोंदवले गेले आहेत.
***
U.Ujgare/S.Tupe/P.Kor