पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी "रेझ 2020" या कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील भव्य आभासी परिषदेचे उद्घाटन केले


भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक केंद्र बनणार- पंतप्रधान

कृत्रिम बुद्धिमत्तेवरील राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवणार- पंतप्रधान

Posted On: 05 OCT 2020 10:43PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेझ 2020, या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भव्य परिषदेचे उद्घाटन केले. रेझ   2020 ही आरोग्य क्षेत्र, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटी या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण आणि आराखडा तयार करण्यासाठी जागतिक पातळीवरील बैठक आहे.

पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमतेवर चर्चेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. ते म्हणाले, तंत्रज्ञानाने आपल्या कार्यस्थळांचे परिवर्तन घडवून आणले आहे आणि कनेक्टीव्हीटी सुधारली आहे. सामाजिक उत्तरदायित्व आणि एआय यांच्या विलिनीकरणामुळे एआय मानवी स्पर्शाने समृद्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एआयचे मानवासोबत एकजुटीने कार्य पृथ्वीतलावर चमत्कार घडवून आणेल, असे ते म्हणाले.   

भारताने ज्ञान आणि शिक्षणामध्ये जगाचे नेतृत्व केले आहे आणि जगाला डिजीटली श्रेष्ठ बनवण्याचे आणि आनंद प्रदान करण्याचे कार्य भारत सुरु ठेवेल.

नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता आणि सेवा प्रदान यात कशी सुधारणा होते, याचा भारताला अनुभव आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, कशापद्धतीने जगातील अद्वितीय ओळख प्रणाली- आधार आणि जगातील सर्वाधिक कल्पक डिजीटल देयक प्रणाली- युपीआय (UPI) यामुळे डिजीटल सेवा, आर्थिक सेवा यांद्वारे गरीब आणि वंचितांना थेट लाभ हस्तांतरण सुलभ झाले आहे. महामारीच्या काळात, यामुळे जनतेपर्यंत पोहोचणे आणि त्यांना कार्यक्षमरित्या मदत करणे शक्य झाले. 

पंतप्रधानांनी भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक केंद्र व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आणि आगामी काळात आणखी बरेच भारतीय यावर काम करण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यासंबंधीच्या ध्येयाप्रतीचा दृष्टीकोन सांघिक कामगिरी, निष्ठा, सहकार्य, उत्तरदायित्व आणि समावेशकता या मूलभूत तत्त्वांवर आधारीत आहे.

पंतप्रधान म्हणाले, भारताने नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले, ज्यात तंत्रज्ञान-आधारीत शिक्षण आणि कौशल्य यास शिक्षणाचा गाभा बनवले आहे. ते म्हणाले ई-कोर्सेस विविध प्रादेशिक भाषा आणि बोलींमध्ये विकसित करण्यात येणार आहेत. या सर्व प्रयत्नांना एआय प्लॅटफॉर्मच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) क्षमतेमुळे लाभ होईल. ते म्हणाले, ‘तरुणांसाठी जबाबदारीचे एआयहा कार्यक्रम एप्रिल 2020 मध्ये सुरु केला, या अंतर्गत 11,000 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी मुलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ते आता एआय प्रकल्प निर्माण करत आहेत. 

पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल सामग्री आणि क्षमता वाढविण्यासाठी ई-एजुकेशन युनिटची निर्मिती करेल. त्यांनी उभरत्या तंत्रज्ञानासमवेत वाटचाल करण्यासाठी हाती घेतलेल्या व्हर्च्युल प्रयोगशाळा, अटल इनोव्हेशन मिशन या उपक्रमांची तपशीलवार माहिती दिली.

ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमाचा वापर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येईल.

नरेंद्र मोदी यांनी एआयसाठी प्रचंड वाव असलेली क्षेत्रे म्हणून -कृषी, भविष्यकालानुरुप नागरी पायाभूत सुविधांची निर्मिती, नागरी समस्या: वाहतूक कोंडी कमी करणे, सांडपाणी प्रक्रिया सुधारणे आणि ऊर्जेसाठी ग्रीड उभारणे, आपत्ती व्यवस्थापन मजबूत करणे आणि हवामानबदलाची समस्या सोडवणे- यांच्या विषयी सांगितले. त्यांनी सुचवले की, एआयच्या माध्यमातून भाषिक अडथळे दूर करुन भाषा आणि बोलींच्या विविधतेचे जतन करता येईल. तसेच त्यांनी ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एआयचा वापर करता येईल असे सांगितले. 

पंतप्रधान म्हणाले की, एआयचा वापर कशा प्रकारे केला जातो यावर विश्वास प्रस्थापित करण्यासाठी अल्गोरिदम पारदर्शकता महत्वाची आहे आणि ती सुनिश्चित करणे ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे.

विघातक शक्तींकडून एआयच्या शस्त्रीकरणाविरोधात जगाचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले मानवी प्रतिभा आणि मानवी भावना ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे आणि यंत्रांविरोधात याचा आपल्याला अद्वितीय लाभ आहे. त्यांनी सर्वांना आवाहन केले की, यंत्रांवरील बौद्धिक हुकूमत कशी कायम ठेवता येईल आणि मानवी बुद्धिमत्ता एआयच्या काही पावलं पुढे राहिल हे सुनिश्चित करण्यासाठी विचार करावा. ते म्हणाले की, एआयमुळे मानवी क्षमता कशी वाढवता येऊ शकेल याबद्दलही आपण विचार केला पाहिजे.   

पंतप्रधान म्हणाले, एआयमुळे प्रत्येक व्यक्तीची अद्वितीय क्षमता खुली होईल आणि ते समाजात अधिक प्रभावीपणे योगदान देण्यास सक्षम होतील. त्यांनी रेझ  2020 परिषदेतील सहभागितांना विचारांची देवाणघेवाण करुन कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्यासाठी सामायिक मार्ग काढण्याचे आवाहन केले. या चर्चेतून तयार झालेल्या जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच्या आराखड्यामुळे जगभरातील व्यक्तींचे जीवन आणि चरितार्थ यात परिवर्तन घडवून येईल, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

*****

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1661913) Visitor Counter : 243