पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोलंग येथे अभिनंदन कार्यक्रम
हमिरपूर येथे 66 एमडब्ल्यू क्षमतेचा धौलासिध जलविद्युत प्रकल्पाची घोषणा
Posted On:
03 OCT 2020 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
हिमाचल प्रदेशातल्या सोलंग खोऱ्यामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या अभिनंदन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यापूर्वी मोदी यांनी जगातला सर्वात जास्त लांबीचा अटल बोगदा रोहतांग येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्राला अर्पित केला. तसेच ते हिमाचल प्रदेशातल्या सिस्सू येथे झालेल्या आभार समारंभात सहभागी झाले.
बोगद्यामुळे परिवर्तन घडून येणार
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अटलजींना मनालीविषयी खूप प्रेम होते. त्यामुळे मनालीच्या पायाभूत सुविधा, संपर्क यंत्रणा आणि पर्यटन उद्योगामध्ये सुधारणा करण्याची त्यांची इच्छा होती. हा बोगदा तयार करण्याच्या निर्णयामागेही हेच कारण आहे.
यावेळी मोदी म्हणाले, अटल बोगदा हिमाचल, लेह, लडाख आणि जम्मू-काश्मिर या राज्यांतल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे. ते म्हणाले, या बोगद्यामुळे सर्वसामान्य लोकांवर जो बोझा पडत होता, तो कमी होईल. तसेच संपूर्ण वर्षभर लाहौल-स्पितीमध्ये सहजतेने प्रवेश करणे शक्य होणार आहे. या बोगद्यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
या बोगद्यामुळे पर्यटक कुलू-मनाली मध्ये सकाळी ‘सिड्डू घी’ नाष्ट्याला खावून लाहौल येथे दुपारच्या भोजनामध्ये ‘दो-मार’ आणि ‘चिलडे’ यांचा आस्वाद घेवू शकतील, असा दिवस आता फार काही दूर नाही.
हमिरपूर येथे धौलासिध जलविद्युत प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमिरपूर येथे 66 एमडब्ल्यू क्षमतेचा धौलासिध जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी केली. या प्रकल्पामुळे केवळ विजेचा पुरवठा चांगला होईल असे नाही तर या भागामध्ये युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
देशभरामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, विशेषतः ग्रामीण भागात रस्ते, महामार्ग, वीज प्रकल्प, रेल्वे आणि हवाई संपर्क साधण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमध्ये हिमाचल प्रदेश हा देखील एक महत्वाचा भागीदार आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
हिमाचल प्रदेशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास
पंतप्रधान म्हणाले, किरतपूर-कुल्लू- मनाली रोड कॉरिडॉर , झिरकपूर-परवानू- सोलन- कैथलिघाट रोड कॉरिडॉर , नांगल धरण- तलवारा रेल मार्ग, भानुपाली- बिलासपूर रेल मार्ग, या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे. हे प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि हिमाचलवासियांना लवकरच सेवा देण्यास प्रारंभ होईल.
ते म्हणाले रस्ते, रेल्वे आणि वीज यांच्यासारख्या मूलभूत सुविधांबरोबरच लोकांचे जीवन अधिक सुकर व्हावे, यासाठी मोबाइल आणि इंटरनेट संपर्क व्यवस्थाही प्रभावी असणे अत्यंत महत्वाचे आहे.
दूरसंचार व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने देशातल्या सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दि.15 ऑगस्ट रोजी सुरू झालेला हा प्रकल्प एक हजार दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पा अंतर्गत गावांमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे घरांमध्येही इंटरनेट उपलब्ध होवू शकणार आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी लाभ होईल. त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय, पर्यटन क्षेत्रालाही फायदा मिळेल.
पंतप्रधान म्हणाले, लोकांचे जगणे अधिक सुलभ व्हावे आणि त्यांना सर्व अधिकारांचा लाभ घेता यावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये वेतन, निवृत्ती वेतन, बँकिंग सेवा, वीज आणि दूरध्वनी सारख्या बिलांचा भरणा करणे तसचे जवळपास सर्व सरकारी सेवा आता डिजिटल करण्यात आल्या आहेत. अशा विविध सुधारणांमुळे वेळ आणि पैशाची बचत होते त्याचबरोबर भ्रष्टाचाराची शक्यता संपुष्टात येते.
कोरोनाच्या अवघड काळामध्ये हिमाचल प्रदेशातल्या 5लाखांपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारक आणि सुमारे 6 लाख लाभार्थींच्या जन धन खात्यामध्ये शेकडो कोटी रुपये जमा झाले आहेत.
कृषी सुधारणा
सरकारने केलेल्या कृषी सुधारणांवर अलिकडे विरोधाचा सूर उमटत आहे, त्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ज्यांनी सातत्याने आपल्या राजकीय स्वार्थाचा विचार करून काम केले, त्यांना या सुधारणा अस्वस्थ करीत आहेत. त्यांनी तयार केलेली मध्यस्थ आणि दलालीची व्यवस्था आता असणार नाही, त्यामुळे हे अस्वस्थ लोक भ्रम निर्माण करीत आहे.
कुल्लू, सिमला किंवा किन्नूर येथे पिकणा-या सफरचंदांची किंमत शेतकरी बांधवांना 40ते 50 रूपये प्रतिकिलो मिळते. मात्र अखेरच्या वापरकर्त्या ला हीच सफरचंदे 100 ते 150 रूपये किलो दराने खरेदी करावी लागतात. यामध्ये शेतक-याला फारसे काही मिळत नाही की खरेदीदारालाही लाभ होत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी सफरचंदाचा हंगाम अगदी बहरामध्ये असतो, त्यावेळी बाजारपेठेत आवक प्रचंड प्रमाणावर होत असल्यामुळे फळांचे भावही कोसळतात. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी बांधवांना बसतो, आता कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कायद्यामध्ये ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लहान प्रमाणावर शेती करणारे उत्पादक आपली संघटना तयार करून देशामध्ये कोठेही आणि कुणालाही आपल्या सफरचंदांची विक्री करण्यास मुक्त असणार आहेत. अशी कृषी सुधारणांविषयी सविस्तर माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे सांगून नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत देशातल्या सुमारे 10.25 कोटी शेतक-यांच्या बँक खात्यांमध्ये एक लाख कोटी रूपये जमा केले आहेत, अशी माहिती दिली. यामध्ये हिमाचल प्रदेशातल्या 9 लाख शेतकरी कुटुंबांचा समावेश असून त्यांच्या खात्यात 1000 कोटी रूपये जमा केले आहेत, असेही सांगितले.
आपल्याकडे अनेक क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्याची संधी देण्याची परवानगी नव्हती. परंतु नव्याने लागू करण्यात आलेल्या कामगार सुधारणांमध्ये महिलांना सर्व क्षेत्रात कामाच्या समान संधी उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांना पुरूष कामगारांइतकेच समान वेतन देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि स्वावलंबी- आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सुधारणांची प्रक्रिया आता अशीच सुरू राहणार आहे.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, सरकारच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश आणि देशातल्या प्रत्येक तरूणाचे स्वप्न आणि आकांक्षा पूर्ती सर्वोपरी आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661447)
Visitor Counter : 226
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam