पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या उपस्थितीत हिमाचल प्रदेशातल्या सिस्सू येथे ‘आभार समारोह’


अटल बोगदा या भागातल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणेल: पंतप्रधान

अटल बोगदा म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे प्रतीक : पंतप्रधान

मतांच्या गणतीनुसार आता धोरणे ठरत नाहीत तर विकासाच्या मार्गावरून वाटचाल करताना एकही भारतीय मागे राहू नये, हे सुनिश्चित केले जातेः पंतप्रधान

देव दर्शन आणि बुद्ध दर्शन यांचा संगम म्हणून लाहौल-स्पितीची आता नवीन ओळख निर्माण होईल – पंतप्रधान

Posted On: 03 OCT 2020 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020

 

हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्पितीमध्ये सिस्सू येथे आज झालेल्या ‘आभार समारोह’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

बोगद्यामुळे परिवर्तनाची नांदी

आपण ज्यावेळी कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो, त्यावेळी या भागामध्ये अनेकदा प्रवास केल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केली. रोहतांग मार्गावरून प्रवास करणे अतिशय अवघड होते. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे या भागातल्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. हिवाळ्यामध्ये तर सहा महिने रोहतांग पास - खिंड पूर्णपणे बंद होते. त्याच काळामध्ये आपल्याला ठाकूर सेन नेगी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती, त्याचीही आठवण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली. माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना या भागातल्या लोकांना असलेल्या समस्या, त्यांना येणा-या अडचणी यांची चांगलीच जाणीव होती. त्यामुळेच तर त्यांनी सन 2000 मध्ये हा बोगदा तयार करण्याची घोषणा केली होती.

या साडेनऊ किलोमीटरच्या बोगद्यामुळे आता जवळपास 45-46 किलोमीटर अंतर कमी झाले आहे. या बोगद्यामुळे या भागातल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडून येण्यास मदत होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. लाहौल-स्पिती आणि पंगी या लोकांना तर कमालीचा लाभ होणार आहे. यामध्ये शेतकरी, फलोत्पादक तसेच पशुसंवर्धक, व्यापारी, विद्यार्थी यांनाही या बोगद्याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे होणारे नुकसान रोखता येणार आहे. त्यांच्या मालाला लवकर बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होणार आहे. या भागात पिकणाऱ्‍या चंद्रमुखी बटाट्यांना आता नवीन बाजारपेठ मिळू शकेल. या बोगद्यामुळे लाहौल-स्पिती भागामध्ये उगविणा-या वनौषधी तसेच मसाल्यांचे पदार्थ यांनाही जगभरातल्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे. इतकेच नाही तर इथल्या मुलांच्या शिक्षणाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष केले जात होते, कारण बाहेर जाण्यासाठी मर्यादित सोय होती, आता त्या सर्व मुलांना सहजतेने शिकता येणार आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.

पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना

या क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी अपार संधी आहेत. त्याला आता चालना मिळू शकणार आहे आणि त्यातूनच रोजगाराच्या संधी निर्माण होवू शकणार आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, देव दर्शन आणि बुद्ध दर्शन यांचा संगम म्हणून आता लाहौल-स्पितीची एक नवीन ओळख निर्माण होणार आहे. जगभरातल्या लोकांना आता स्पिती खो-यातला तॅबो मठांना भेट देणे सहज सुकर होणार आहे. पूर्व आशिया आणि जगातल्या बौद्ध धर्मियांसाठी हे क्षेत्र म्हणजे एक विशाल केंद्र बनण्यास मदत होणार आहे. पर्यटनाला चालना मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असेही मोदी यावेळी म्हणाले.

शेवटच्या घटकापर्यंत पोहोच

देशामध्ये होत असलेल्या विकास कार्यांचा लाभ समाजातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी सरकार वचनबद्ध आहे. या बांधिलकीचे प्रतीक म्हणजेच हा अटल बोगदा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, यापूर्वी लाहौल-स्पिती आणि इतर काही क्षेत्रांचे कसे संरक्षण करायचा असे वाटत होते. कारण या प्रदेशातल्या काही संकुचित राजकीय स्वार्थपूर्तीसाठी विकास कामे केली जात नव्हती. परंतु आता देशात तसे काही होत नाही. सरकार एक नवीन विचार घेवून विकासासाठी कार्यरत आहे. आता काही मतसंख्येचा आधार घेवून धोरणे बनविली जात नाहीत. तर विकासाच्या मार्गावरून वाटचाल करताना एकही भारतीय मागे राहणार नाही, यासाठी काळजी केली जाते, सर्वांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचतो आहे, याची खात्री केली जाते, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. लाहौल-स्पिती भागामध्ये घडून येत असलेल्या बदलांचे एक मोठे उदाहरण मानता येईल. कारण या भागातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरामध्ये वाहिनीमार्फत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था सुनिश्चित केली आहे.

सरकार दलित, आदिवासी, पीडित आणि वंचितांना सर्व मूलभूत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरूच्चार केला. ग्रामीण विद्युतीकरण, स्वयंपाकाचा गॅस, शौचालय यांच्यासारख्या सुविधा निर्माण करणे, आयुष्मान भारत योजनेतून मोफत औषधोपचाराची सुविधा देणे, यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच लोकांनी कोरोना महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता दाखवावी, असे आवाहन अखेरीस केले.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1661319) Visitor Counter : 230