सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गांधीनगर इथे कुंभार समुदायाला विद्युत चाकांचे वितरण

Posted On: 30 SEP 2020 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  30 सप्टेंबर  2020

 

गांधीनगर आणि अहमदाबाद इथल्या कुंभार समुदायाच्या सुमारे 200 कुटुंबांनी केव्हीआयसी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या, कुंभार सशक्तीकरण योजनेत सहभागी होऊन शाश्वत स्व-रोजगाराच्या दिशेने वाटचाल सुरु केली. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी  गांधीनगर या आपल्या संसदीय मतदार संघातल्या रंधेजा या गावात झालेल्या कार्यक्रमात 200 प्रशिक्षित कारागिरांना 200 विद्युत चाके आणि कुंभार कामासाठीच्या इतर साहित्याचे नवी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे वाटप केले.

केव्हीआयसीने निश्चित केलेल्या 20 गावांपैकी 15 गावे गांधीनगर जिल्ह्यातली तर 5 गावे अहमदाबाद जिल्ह्यातली आहेत. विद्युत चाकांच्या वितरणाचा या समुदायाच्या  सुमारे 1200 सदस्यांना, उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी  लाभ होणार आहे.

केव्हीआयसीच्या मध अभियान,कुंभार सशक्तीकरण योजना, चामडे कारागीर सबलीकरण यासारख्या स्वयं रोजगाराच्या विविध योजनांची अमित शहा यांनी प्रशंसा केली.  यावेळी केव्हीआयसीने   मातीची भांडी घडवण्याचे 10 दिवसांचे प्रशिक्षण दिलेल्या  आणि विद्युत चाक आणि इतर साहित्य मिळालेल्या शैलेशभाई प्रजापती,भारतभाई प्रजापती, अवनीबेन प्रजापती आणि जिग्नेशभाई प्रजापती या चार जणांशी  त्यांनी संवाद साधला. सरकारचे आभार मानतानाच उपजीविकेचे चांगले साधन मिळाले असून आत्म निर्भर होण्यासाठी यामुळे मदत होणार असल्याची भावना कुंभार समुदायाने यावेळी व्यक्त केली. 

या विद्युत चाकामुळे या कुंभार समुदायाला  उत्पादन वाढवण्या बरोबरच नवी आकर्षक उत्पादने तयार करण्याला वाव मिळणार असून दसरा आणि दिवाळी या सणाच्या काळात त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठीही मदत होणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. या समुदायाच्या व्यापक हितासाठी प्रत्येक लाभार्थ्याने किमान दहा कुटुंबाना कुंभार सशक्तीकरण योजनेशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, कुंभार ( प्रजापती ) समुदायाच्या  सामाजिक- आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून या समुदायाचे  सबलीकरण साध्य करायचे आहे.  मातीची भांडी घडवण्याच्या कलेचे जतन करत कुंभारांसाठी  शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण करत त्यांना आत्मनिर्भर करण्याचा  केव्हीआयसीच्या कुंभार सशक्तीकरण योजनेचा उद्देश आहे. युवा पिढीने ही कला पुढे नेऊन त्याचा देशभरात विस्तार करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

या उत्पादनांच्या विक्रीसाठी सरकारने, भारतीय रेल्वेशी बोलणी करण्यासह सुयोग्य विपणन माध्यमे तयार केली आहेत. भारतीय रेल्वेच्या 400 स्थानकावर खाद्यान्न आणि पेये देण्यासाठी मातीच्याच भांड्यांचा वापर आधीपासूनच  करण्यात येत आहे. आपल्या कुंभार समुदायाला विक्रीसाठी अधिक व्यापक मंच मिळावा यासाठी अशी  आणखी रेल्वे स्थानके निश्चित करण्याची विनंती आपण रेल्वे मंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांवर उत्पादने विक्रीसाठी कुंभारांनी सहकारी संस्था स्थापन करण्याचे त्यांनी सुचवले.

देशात आतापर्यंत 18,000 पेक्षा जास्त विद्युत चाकांचे वाटप झाले असून या समुदायाच्या सुमारे 80,000 जणांना त्याचा लाभ झाल्याची माहिती केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिली. कुंभार सशक्तीकरण योजने अंतर्गत कुंभारांच्या सरासरी मासिक उत्पन्नात सुमारे 3000 रुपयांवरून सुमारे 10,000 पर्यंत वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुजरात मधले अनेक भाग विशेषकरून कच्छ आणि सौराष्ट्र हे भाग  पारंपारिक मातीच्या भांड्यांच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत. 2018 मध्ये कुंभार सशक्तीकरण योजना सुरु झाल्यापासून केव्हीआयसीने गुजरातमधल्या सुमारे 800 कुंभाराना प्रशिक्षण दिले आहे. केव्हीआयसीने त्यांना विद्युत चाकासह माती मळण्यासाठी लागणाऱ्या  साहित्याचे वितरणही केले आहे. यामुळे कुंभारांचे कष्ट कमी होत असून उत्पादनात 3 - 4 पट वाढ होत आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660418) Visitor Counter : 170