पंतप्रधान कार्यालय

भारत - डेन्मार्क द्विपक्षीय आभासी शिखर संमेलनात पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 28 SEP 2020 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

आदरणीय महोदया, नमस्कार.

या आभासी संमेलनाच्या माध्यमातून मला आपल्या सोबत संवाद साधण्याची संधी मिळते आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो आहे. सर्वप्रथम, कोवीड- 19 मुळे डेन्मार्कची जी हानी झाली आहे, त्याबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या संकटावर मात करणाऱ्या कुशल नेतृत्वाचे मी अभिनंदन करतो.

अतिशय व्यस्त वेळापत्रक असतानासुद्धा या संवादासाठी आपण वेळ काढला, यावरून आपल्या दोन्ही देशांमधील नात्याकडे आपले लक्ष आणि या नात्याप्रति विशेष वचनबद्धता दिसून येते.

आपण नुकत्याच विवाहबद्ध झाल्या आहात, त्याबद्दल मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो. कोवीड-19 मुळे उद्‌भवलेली परिस्थिती सुधारल्यानंतर लवकरच आम्हाला भारतात आपले सहकुटुंब स्वागत करण्याची संधी मिळेल, अशी आशा आम्हाला वाटते. आपली कन्या इदा पुन्हा एकदा भारतात यायला उत्सुक असेल, असा विश्वास मला वाटतो.

काही महिन्यांपूर्वी दूरध्वनीवरून झालेला आपला संवाद उपयुक्त होता. अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि डेन्मार्क यांच्यातील सहकार्य वाढविण्याबाबत आपण चर्चा केली होती.

आज या आभासी संमेलनाच्या माध्यमातून त्या उद्दिष्टांना आपण नवी दिशा आणि गती देत आहोत, ही आनंदाची बाब आहे. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हापासून, म्हणजेच 2009 सालापासून डेन्मार्क, व्हायब्रंट गुजरात संमेलनात सातत्याने सहभागी होतो आहे, त्यामुळे डेन्मार्कबद्दल माझ्या मनात एक विशेष आपुलकीची भावना आहे. दुसरे भारत-नॉर्डिक संमेलन आयोजित करण्याच्या आपल्या प्रस्तावाबद्दल मी आपला आभारी आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर डेन्मार्कला भेट देणे आणि आपली ही भेट घेणे, माझ्यासाठी सौभाग्याची बाब असेल.

आदरणीय महोदया ,

आपल्यासारखे समविचारी देश पारदर्शक, मानवतावादी आणि लोकशाहीप्रधान मूल्यांची जोपासना करतात. अशा देशांनी एकत्रित काम करणे किती गरजेचे आहे, हे मागच्या काही महिन्यातील घटनांनंतर अधोरेखित झाले आहे.

लस विकसित करण्याबाबत सुद्धा समविचारी देशांमध्ये सहयोगाची भावना कायम राहिल्यास या साथरोगावर मात करणे अधिक सोपे होईल. या साथरोगाच्या काळात भारताची औषध उत्पादन क्षमता संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरत आहे. आम्ही लस विकसित करण्याच्या बाबतीत सुद्धा यासाठी प्रयत्नशील आहोत.

महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये भारत अधिक सक्षम व्हावा आणि जगाच्याही कामी यावा, यासाठी आम्ही आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रयत्नशील आहोत.

या अभियानांतर्गत आम्ही सर्वसमावेशक सुधारणांवर भर देत आहोत. नियामक आणि कर क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतात काम करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होईल. इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा सुधारणांची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कृषी आणि श्रम क्षेत्रात सुद्धा नुकत्याच महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

आदरणीय महोदया,

जागतिक पुरवठा साखळी कोणत्याही एकाच स्रोतावर अवलंबून असणे, जोखमीचे आहे हे कोवीड-19 ने दाखवून दिले आहे.

पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण आणि लवचिक करण्यासंदर्भात आम्ही जपान आणि ऑस्ट्रेलिया सोबत काम करीत आहोत. इतर समविचारी देश सुद्धा या प्रयत्नात आमच्या सोबत येऊ शकतात.

आपले हे आभासी संमेलन केवळ भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संबंधांसाठीच उपयुक्त ठरणार नाही तर जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एक सामायिक दृष्टिकोन तयार करण्याच्या दृष्टीनेही ते सहाय्यक ठरेल, असे मला वाटते.

आदरणीय महोदया, या संमेलनासाठी वेळ काढल्याबद्दल पुन्हा एकदा आपले अनेकानेक आभार.

आता प्रारंभिक भाषणासाठी मी आपणास येथे निमंत्रित करू इच्छितो.

M.Chopade/M.Pange/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659884) Visitor Counter : 127