गृह मंत्रालय

श्री हरमंदिर साहिबला एफसीआरए अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय ऐतिहासिक आणि पथदर्शी- गृहमंत्री अमित शाह


‘एफसीआरए अंतर्गत परवानगी देण्याचा मोदी सरकारचा निर्णय सेवा आणि संगत तसेच श्री दरबार साहिब यांच्यातील बंध अधिक दृढ करेल’-अमित शाह

“वाहे गुरु यांची सेवा करण्याची संधी पंतप्रधानांना मिळणे हे भाग्यच”-अमित शाह

Posted On: 10 SEP 2020 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2020


FCRA म्हणजेच, परदेशी चलन नियमन कायद्यान्वये हरमंदिर साहिब ला परवानगी देण्याचा मोदी सरकारचा निर्णय, ऐतिहासिक आणि पथदर्शी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. आपल्या ट्वीटमध्ये मोदी यांनी म्हटले की, “श्री दरबार साहिबची दिव्य शक्ती आपल्या सर्वांनाचा ऊर्जा देणारी आहे. अनेक दशकांपासून जगभरात असलेल्या ‘संगत’ला श्री दरबार साहिबची सेवा करण्याची संधी मिळत नव्हती. मात्र मोदी सरकारने श्री हरमंदिर साहिबला एफसीआरएला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे, संपूर्ण जगातील त्यांच्या “संगत’ मधल्या लोकांचा सेवाभाव अधिक दृढ होणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.”

“वाहे गुरुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही सेवेची संधी दिली हे त्यांचे भाग्यच आहे”, असेही अमित शाह म्हणाले. हा एक पथदर्शी निर्णय असून पुन्हा एकदा आपल्या शीख बंधू-बांधवांमध्ये सेवाभाव जागवणारा आहे.” असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी  सचखंड श्री हरमंदिर साहिब, श्री दरबार साहिब, पंजाब या संस्थेला, एफसीआरए नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे. या संस्थेने FCRA कायद्याअंतर्गत परवानगीसाठी 27 मे 2020 रोजी अर्ज केला होता. ही नोंदणी पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे.  

सचखंड श्री हरमंदिर साहिब आणि  श्री दरबार साहिबला मंजुरी देण्यापूर्वी, या संस्थेचा एफसीआरए, 2010 कायद्याअंतर्गत तपासणी केली गेली. संबंधित संस्थांकडून मिळालेली माहिती आणि या संस्थेने आपल्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर, ही संस्था एफसीआरए कायद्यान्वये नोंदणीस पात्र असल्याचा निर्णय घेण्यात आला.

पंजाबच्या अमृतसर येथे असलेल्या आणि गोल्डन टेम्पल नावाने प्रसिध्द या सचखंड श्री हरमंदिर साहिब, श्री दरबार साहिब या संस्थेची स्थापना 1925 साली शीख गुरुद्वारा अधिनियम अंतर्गत झाली होती. या संस्थेचा उद्देश जनता-भाविकांना चोवीस तास मोफत लंगर उपलब्ध करणे, गरीब आणि गरजूंना, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, गरजूंना वैद्यकीय उपचार आणि नैसर्गिक संकटांच्या काळात मदत करणे अशी कामे करते. या संस्थेला या कामांसाठी देशातील विविध व्यक्तींकडून दान मिळत होते, मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर  ही संस्था एफसीआरए, 2010 च्या नियमांच्या अधीन राहून, परदेशी देणग्या देखील स्वीकारु शकेल.

 

 


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1653176)