संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलात राफेलचा समावेश

Posted On: 09 SEP 2020 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

भारतीय हवाई दल 10 सप्टेंबर 2020 रोजी अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर राफेल विमानांचा औपचारिकपणे हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करून घेणार आहे. हे विमान हवाई दलाच्या 17 व्या स्क्वॉड्रॉन, "गोल्डन एरो" चा एक भाग असेल. पाच राफेल विमानांची पहिली तुकडी 27 जुलैला फ्रान्सहून अंबाला हवाई तळावर पोहोचली होती.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री सौ. फ्लोरेन्स पार्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, संरक्षण विभाग, संशोधन व विकास सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, तसेच संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र सेना मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी, इतिहास नोंद होणाऱ्या या हवाई दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी फ्रान्सचे प्रतिनिधीत्व भारतातील फ्रान्सचे राजदूतएमॅन्युएल लेनिन, हवाई दलाचे प्रमुख एरिक ऑटलेट, फ्रांस हवाई दलाचे उपप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी करतील. दसॉ एव्हिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपीयर आणि एमबीडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक बेरेंजर यांच्यासह फ्रांस संरक्षण उद्योग समूहातील उद्योग अधिकाऱ्यांचे एक मोठे प्रतिनिधीमंडळ या वेळी उपस्थित राहणार आहे.

फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले यांना दिल्लीत येताच  गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. अंबाला हवाई तळावर ‘सर्व धर्म पूजा’ करून औपचारिकपणे राफेल विमानांचा हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करून घेण्यात येईल. यावेळी राफेल विमान हवाई कसरती सादर करणार असून त्यात तेजस विमानासह सारंग एरोबेटिक टीम देखील सहभागी होणार आहे. त्यानंतर, राफेल विमानांना पारंपारिक वाटर कॅनन सलामी दिली जाईल. हवाई दलाच्या 17 व्या स्क्वॉड्रनमध्ये राफेल विमानांचा औपचारिक समावेश झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर भारतीय आणि फ्रांस प्रतिनिधींची द्विपक्षीय बैठक होईल.

 

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652704) Visitor Counter : 139