उपराष्ट्रपती कार्यालय

माध्यान्न भोजन योजनेत दुधाचा समावेश करण्याची उपराष्ट्रपतींची सूचना

Posted On: 07 SEP 2020 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2020


कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कुक्कुटपालन व दुग्धशाळा क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी घेतलेल्या उपायांची माहिती उपराष्ट्रपतींना दिली.

मुलांची पोषण पातळी सुधारण्यासाठी नाश्ता किंवा माध्यान्न भोजनात दूध दिले जाऊ शकते अशी सूचना उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज केली. 

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी या संदर्भात चर्चा करून नायडू यांनी ही सूचना केली . माध्यान्न भोजन योजनेत दुधाचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांच्या शिफारसींवर विचार करेल, असे आश्वासन मंत्र्यांनी उपराष्ट्रपतींना दिले.

तत्पूर्वी आज पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपती निवास येथे उपराष्ट्रपतींची भेट घेऊन कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कुक्कुटपालन व दुग्धशाळा क्षेत्राला मदत म्हणून केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. 

सरकार कुक्कुटपालन क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन देत असून प्रोत्साहन व धोरणात्मक हस्तक्षेपाद्वारे सहकार्य करीत असल्याची माहिती त्यांनी उपराष्ट्रपतींना दिली. कुक्कुटपालन उद्योगासाठी कर्जाची पुनर्रचना करण्याची गरज असल्याची शिफारस अर्थ  मंत्रालयाला करण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभाग विचार करेल असेही त्यांनी सांगितले.

संघटित क्षेत्रातील दूध सहकारी संस्थांकडून होणाऱ्या खरेदीत आता वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी नायडू यांना दिली. कार्यरत भांडवली कर्जावरील सहकारी संस्थांना सरकार दरवर्षी दोन टक्के व्याजदराने अर्थसाहाय्य करीत आहे. तसेच वेळेवर परतफेड केल्यास दोन टक्के व्याज सूट देण्याचे अतिरिक्त प्रोत्साहन दिले जात आहे. उपराष्ट्रपतींच्या सूचनेनुसार खाजगी दुग्धशाळांना अशीच सुविधा देण्याचा विचार करण्याचे आश्वासन सचिवांनी दिले.

उपलब्ध पायाभूत सुविधांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून पशुक्षेत्र, मेंढ्या व शेळ्या पालन क्षेत्र आणि प्रादेशिक चारा केंद्र विकसित करण्याच्या विभागाच्या योजनांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. अत्याधुनिक इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाद्वारे जनावरांची पैदास सुधारण्याच्या योजनेबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.

 

* * *

M.Iyengar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651972) Visitor Counter : 165