महिला आणि बालविकास मंत्रालय

तिसरा राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2020 मध्ये होणार साजरा

Posted On: 06 SEP 2020 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  6 सप्टेंबर  2020

तिसरा राष्ट्रीय पोषण मास सप्टेंबर 2020 मध्ये साजरा केला जाणार आहे. पोषण (POSHAN समग्र पोषणासाठी पंतप्रधानांची अतिरिक्त योजना) मोहिमेअंतर्गत दरवर्षी पोषण माह साजरा केला जातो, ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, हे पोषण मोहिमेचे मुख्य मंत्रालय आहे, राज्य / केंद्रशासित प्रदेश, जिल्हे आणि तळागाळापर्यंत भागीदार मंत्रालये आणि विविध भाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पोषण माह साजरा करीत आहे. जनआंदोलन तयार करण्यासाठी जनभागीदारीला प्रोत्साहन देणे, लहान मुले आणि महिलांमधील कुपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रत्येकाचे पोषण आणि आरोग्य सुनिश्चित करणे हे पोषण मासाचे उद्दिष्ट आहे. 

आपल्या जीवनातील पोषणाचे महत्त्व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  मन की बातया प्रसिद्ध कार्यक्रमाच्या अलिकडच्याच भागात 30 ऑगस्ट 2020 रोजी अधोरेखित केले आहे. मुलांना आणि विद्यार्थ्यांना त्यांची अधिकतम क्षमता प्राप्त करण्यासाठी पोषण आहार देण्याच्या भूमिकेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांत केल्या गेलेल्या प्रयत्नांचीही नोंद त्यांनी घेतली, विशेषतः ज्या गावात पौषण सप्ताह आणि पोषण महिना (पोषण माह) यामध्ये लोकांचा सहभाग आणि त्यांच्यातील पोषण विषयक जागरुकता एका जन चळवळीत रुपांतरित करीत आहे.

केंद्रिय महिला आणि बाल कल्याण विकास आणि वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती झुबीन इराणी, यांनी 2 ऑगस्ट 2020 रोजी आंतर-मंत्रीस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते आणि महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव श्री राम मोहन मिश्रा यांनी पोषण माह दरम्यान अभिसरण कार्य सुरळीत करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी संवाद साधला. तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे (एसएएम) आणि त्यांचे व्यवस्थापन आणि पोषण वाटिकांचे रोपण, तसेच लवकरात लवकर बाळाला स्तनपान देण्याबाबत जनजागृती करणे, ज्याची जीवनाच्या पहिल्या हजार दिवसांसाठी उत्तम पोषणाची गरज असते, तरूण स्त्रिया आणि मुलांमध्ये अशक्तपणा कमी करण्यासाठीचे उपाय इत्यादि गोष्टींकडे पोषण माह दरम्यान विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

पोषण माह आणि त्यासाठी केले जाणारे विविध पोषण विषयक उपक्रम यासाठी सर्व सहभागी मंत्रालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांची वचनबद्धता दर्शविली आहे. शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालयांना विद्यार्थ्यांमध्ये पोषण विषयक ई माध्यमातून प्रश्नमंजुषा आणि संदेश तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. या महिन्यामध्ये पंचायती राज मंत्रालयाकडून प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये समितीची विशेष बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यांना सुचविले आहे की, महात्मा गांधी एनआरईजीए यांच्या सहकार्याने पोषण उद्यानाचा (न्यूट्री – गार्डन) प्रसार करावा. योगा आणि समग्र पोषण यांचा अवलंब करून निरोगी जीवनशैली अंगिकारण्यासाठी पाठिंबा देण्याबाबत आयुष मंत्रालयाने प्रस्ताव दिला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखील सर्व उपक्रमांसाठी सर्वतोपरि सहकार्य करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

देशातील सध्याच्या कोविड परिस्थितीचा आधार घेत महिला व बालविकास मंत्रालय सर्व भागधारकांना पोषण माह साजरा करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. समाज माध्यमे, ऑनलाइन उपक्रम, पॉडकास्ट आणि ई-संवाद इत्यादी माध्यमे जीवनात पोषण आहाराचे महत्त्व सांगण्यासाठी, त्याबाबतचे ज्ञान आणि माहिती प्रसारित करण्यासाठी या काळात वापरले जाणार आहे. मंत्रालयाकडून देखील एक वेबिनार मालिका आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये विषय तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्ती यांच्याकडून महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी आणि पोषण आहाराच्या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला जाईल.

 

M.Jaitly/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651867) Visitor Counter : 454