सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये अगरबत्ती बनविणाऱ्यांना सरकारचे पाठबळ


पूर्वीच्या 200च्या तुलनेत आणखी 400 स्वयंचलित अगरबत्ती यंत्रांचा पुरवठा करणार

‘स्फुर्ती’अंतर्गत 50 कोटी रुपये खर्चून 10 उत्पादन केंद्रांची निर्मिती करणार; 5000 अगरबत्ती कारागिरांना लाभ

Posted On: 06 SEP 2020 3:19PM by PIB Mumbai

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने (एमएसएमई) अगरबत्ती तयार करणाऱ्या कारागिरांना विविध स्तरावर पाठबळ देवून  या उद्योगाच्या विस्तारासाठी आणि उदबत्ती निर्मिती क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या हेतूने दि. 4 सप्टेंबर रोजी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. यामुळे अगरबत्ती निर्मिती व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकणार आहे. अगरबत्ती बनविण्यासाठी केवळ स्वयंचलित यंत्राचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे नाही; तर अगरबत्ती बनविण्यासाठी लागण-या कच्चा माल नियमित पुरविणे सुनिश्चित करण्यात येणार आहे. कच्च्या मालाला गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली आहे, याचा विचार करून पुरवठा करण्यात येणार आहे.

अगरबत्ती निर्मितीसाठी आधी 200 स्वयंचलित यंत्रांचा पुरवठा करण्यात आला होता आता, आता 400 यंत्रे संबंधित संस्थांना देण्यात येणार आहेत. तसेच सायकलप्रमाणे पायाने चालविता येणारी अतिरिक्त 500 यंत्रे स्वमदत समुहांना देण्यात येणार आहेत. अगरबत्ती निर्मिती क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशभरामध्ये 20 पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाची पुरवठा साखळी तयार करणे तसेच बनलेल्या मालाचे व्यावसायिक पद्धतीने विपणन करणे, यांचा समावेश आहे. या कार्यक्रमामुळे जवळपास 1500 कारागिरांना ताबडतोब लाभ मिळणार आहे. त्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे. यासाठी जे स्थलांतरित कामगार आहेत, आणि हाताने अगरबत्ती तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सरकारने अगरबत्ती कारागीर विकास कार्यक्रमला व्यापक स्वरूप् दिले असून यासाठी सरकार आता 55 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. यामध्ये:-

  1. अगरबत्ती कारागिरांना प्रशिक्षण, कच्चा माल, विपणन यासाठी मदत करणे आणि सातत्याने पाठिंबा देणे.
  2. अगरबत्ती उत्पादनाच्या सर्व बाबींवर कार्य करणे. यामध्ये सुगंधासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविताना पर्यायी कच्च्या मालाच्या फेरवापराचा विचार करणे. वाहिलेल्या फुलांचा वापर करणे, काॅयरचा वापर त्याचबरोबर कृषी मंत्रालयाच्या मदतीने बांबूच्या काड्या उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यात येत आहे. कन्नौज हे संुगधाचे केंद्र स्थान आहे, हे लक्षात घेवून अगरबत्ती निर्मितीमध्ये वेगवेगळे गंध विकसित करण्यासाठी कन्नौज येथे एक ‘उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्याचे काम सरकारने  सुरू केले आहे.
  3. एमएसएमई मंत्रालयाच्या पारंपरिक उद्योगांच्या पुनर्रचनेसाठी निधी योजनेनुसार म्हणजेच ‘स्फूर्ती’ या योजनेअंतर्गत देशामध्ये अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी 10 केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी 50 कोटी सरकार खर्च करणार आहे. त्याचा लाभ देशातल्या सुमारे 5000 अगरबत्ती कारागिरांना होणार आहे. त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध होवू शकणार आहे. तसेच आत्ता जे या व्यवसायामध्ये आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत मिळणार आहे.
  4. अगरबत्ती निर्मिती व्यवसायामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज आहे, हे लक्षात आल्यानंतर सरकारने ‘उत्कृष्टता केंद्र’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आयआयटी आणि एनआयटींच्या मदतीने स्वयंचलित यंत्रे विकसित करण्यासाठी 2.20 कोटी रूपये खर्च केले आहेत.

या क्षेत्रामध्ये खादी आणि कुटिरोद्योग आयोगाच्यावतीने हाताने अगरबत्ती करणा-या आणि स्वमदत समुहांमधल्या कारागिरांना मदत करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे देशातल्या अगरबत्ती उद्योगाला चांगलेच पाठबळ मिळणार आहे. त्याचबरोबर अगरबत्ती निर्मिती क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर होवू शकणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत आणि निर्यातीलाही बळ मिळणार आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651785) Visitor Counter : 171