आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दररोज आठ लाखांहून जास्त चाचण्यांचा कल कायम ठेवत भारतात 3.5 कोटीहून जास्त चाचण्या


प्रति दहा लाखांमागे होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होऊन आज ते 25,574 वर पोहोचले

Posted On: 23 AUG 2020 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑगस्‍ट 2020

 

पुण्यामध्ये असलेल्या एकमेव प्रयोगशाळेत जानेवारी 2020 मध्ये एका चाचणीपासून सुरुवात करत, भारताने आजतागायत 3.5 कोटीहून जास्त चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. गेले सहा दिवस सातत्याने आठ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत, गेल्या 24 तासात 8,01,147 कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची एकूण संख्या 3,52,92,220 झाली आहे.

केंद्राने घेतलेल्या लक्ष्य केंद्रित आणि स्तरबद्ध दृष्टीकोनामुळे झपाट्याने जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण अंमलात आणले जात आहे आणि त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ दिसत आहे.

गेल्या तीन आठवड्यात दैनंदिन चाचण्यांच्या सरासरीत वाढ झाल्याने देशभरात कोविड-19 च्या चाचण्यांच्या स्थितीत प्रगती झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे चाचण्यांच्या संख्येत वाढ होत आहे तर दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या दैनंदिन सरासरीत घट होऊ  लागली आहे.

टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट म्हणजे चाचण्या, मागोवा आणि उपचार या धोरणावर संपूर्ण भर देत प्रति दहा लाखांमागे होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होऊन हे प्रमाण आज 25,574वर पोहोचले आहे. झपाट्याने चाचण्या करण्यामुळेच वेळेवर सक्रिय रुग्णांचे निदान करणे, त्यांच्या संपर्कांचा माग घेणे आणि त्यांचे विलगीकरण करणे त्याच बरोबर तीव्र लक्षणे असलेल्यांना आणि चिंताजनक स्थितीतील रुग्णांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार देणे  शक्य झाले आहे.

चाचण्यांविषयीच्या धोरणामुळे देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे देखील विस्तारण्यास मदत झाली आहे. आज देशभरात 983 सरकारी आणि 532 खाजगी प्रयोगशाळा आहेत. या 1515 प्रयोगशाळा लोकांना समावेशक चाचण्यांच्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

यामध्ये:

• रियल टाईम आरटी पीसीआर आधारित प्रयोगशाळा: 780 ( सरकारी: 458 + खाजगी: 322)

• ट्रूनेट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 617 ( सरकारी: 491 + खाजगी: 126)

• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 118 (सरकारी: 34 + खाजगी: 84)

 

कोविड-19 विषयीच्या तांत्रिक बाबी, मार्गदर्शक  तत्वे आणि सूचना याविषयीच्या सर्व प्रकारच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमित भेट द्या : https://www.mohfw.gov.in/ and @MoHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक प्रश्नांच्या उत्तरांसाठी हे प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in कडे आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva येथे पाठवता येतील. 

कोविड-19 विषयी काही प्रश्न असतील तर कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या: +91-11-23978046 किंवा 1075 ( टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या कोविड-19 विषयक हेल्पलाईन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf येथे उपलब्ध आहे.

 

* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648051) Visitor Counter : 125