आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील कोविडच्या सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट
आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12.3 लाख
रुग्ण बरे होण्याचा दर 66.31%पर्यंत
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2020 11:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
आज देशात कोविडच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12,30,509 इतकी झाली असून उपचार सुरु असलेल्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 44,306 रुग्ण बरे झाले आहे. यामुळे कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर 66.31% इतका झाला आहे. कोविड व्यवस्थापनाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयीत प्रयत्नांमुळे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अविरत परिश्रमामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
सध्या देशात उपचार सुरु असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 5,86,298 इतकी असून आतापर्यंतच्या सक्रिय रुग्णांच्या तुलनेत ही संख्या 31.59% इतकी आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात योग्य अंमलबजावणी, चाचण्यांच्या संख्येत वाढ आणि प्रमाणित, वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलची अंमलबजावणी यामुळे, देशात कोविड रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. पहिल्या टाळेबंदी च्या स्थितीवेळी जागतिक सरासरी दराच्या तुलनेत, आज देशात कोविडचा मृत्यूदर सर्वात कमी म्हणजे 2.10% इतका आहे.
सध्याच्या कोविड मृत्यूविषयक आकडेवारीनुसार, 60 वर्षे आणि त्यापुढच्या वयाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 50% इतके आहे. तर 45 ते 60 या वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 37% आहे. 26 ते 44 या वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 11% इतके आहे. या आकडेवारीनुसार, 45 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना कोविड संसर्गाचा अधिक धोका आहे, त्यामुळेच देशाच्या प्रतिबंधक धोरणात, या वयोगटावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्त्री-पुरुष विभागणीनुसार, पुरुषांचा मृत्यूदर 68% तर स्त्रियांचा मृत्यूदर 32% इतका आहे.
कोविड या साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यावर लगेचच, भारताने व्हेंटीलेटर्सची उपलब्धता वाढवण्यासाठी श्रेणीबद्ध प्रयत्न सुरु केले. मेक इन इंडिया अंतर्गत, भारतातच व्हेंटीलेटर्स तयार करण्यावर भर देण्यात आला.
देशात आवश्यक असलेल्या अंदाजे 60,000 व्हेंटीलेटर्सची उपलब्धता निर्माण करण्यासाठी, आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या तांत्रिक तज्ञांच्या चमूने मूलभूत व्हेंटीलेटर्सच्या निर्मितीसाठीचे निकष आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या. आवश्यक वैद्यकीय पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोविड साठीच्या सक्षम गट- तीन ची स्थापना करण्यात आली. नेमकी किती व्हेंटीलेटर्सची गरज आहे, याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार ऑर्डर दिल्या गेल्या .
त्यातही सरकारी कंपन्याना अधिक ऑर्डर्स दिल्या गेल्या आहेत. त्याशिवाय , डीआरडीओ सोबत, वाहन उद्योगांचीही मदत घेण्यात आली. आतापर्यंत, “मेक इन इंडिया’ अंतर्गत, 96% व्हेंटीलेटर्स देशातच तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत 700 रुग्णालयांमध्ये हे व्हेंटीलेटर्स लावण्यात आले आहेत. केवळ दोन महिन्यात, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्र सरकारची रुग्णालये/डीआरडीओ या सर्व ठिकाणी, 18000 व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1643473)
आगंतुक पटल : 287