माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आसामची 24/7 दूरदर्शन वाहिनी सुरू


ही वाहिनी आसाममधील लोकांसाठी भेट : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

डीडी आसाम वाहिनी राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी मोठे योगदान देईलः माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे

Posted On: 04 AUG 2020 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020

 

आसाम राज्यासाठी दूरदर्शन आसाम या 24 तास समर्पित वाहिनीचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले., "ही वाहिनी आसामच्या लोकांसाठी एक भेट असून ही वाहिनी आसाममधल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचेल आणि ती खूप लोकप्रिय होईल, असा विश्वास जावडेकरांनी यावेळी व्यक्त केला.

सर्व राज्यांची स्वतंत्र दूरदर्शन वाहिनी असणे महत्वाचे आहे, असेही जावडेकर यावेळी म्हणाले. इतर राज्यांच्या वाहिन्या डीडी फ्री डिशवर उपलब्ध आहेत. यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या सहा राष्ट्रीय वाहिन्यांवरील कार्यक्रमांची प्रशंसा केली. ईशान्य भारताला, देशाच्या विकासाचं इंजिन बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा पुनरुच्चार, करत श्री जावडेकर म्हणाले की, या प्रदेशात अपार नैसर्गिक आणि मनुष्यबळ क्षमता आहे आणि दळणवळणातही सातत्याने सुधारणा होत आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आसामहून या कार्यक्रमात सहभागी झाले. आसामच्या जनतेसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, ही वाहिनी आसामच्या सर्व क्षेत्रातील विकासाला चालना देईल आणि त्याचवेळी सरकारच्या उपक्रम आणि कार्यक्रमांना तळागाळापर्यंत पोहचण्यास मदत करेल." पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासून ईशान्य भारताच्या क्षमता आणि संधींवर लक्ष देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे असे ते यावेळी म्हणाले.

आसामचे राज्यपाल  प्राध्यापक जगदीश मुखी या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ‘सार्वजनिक प्रसारण सेवेची डी डी आसाम ही विशेष वाहिनी सुरु झाल्यामुळे, दूरदर्शनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, त्यासोबतच,आसाममधल्या आम्हा सर्वांसाठी देखील हा आनंदाचा क्षण आहे,’ असे मुखी यावेळी म्हणाले. गुवाहाटीच्या दूरदर्शन केंद्रातल्या कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे, आसामची वैशिष्ट्यपूर्ण, समृध्द आणि विविधांगी संस्कृती देशभर लोकप्रिय झाली, असेही मुखी यांनी सांगितले. 

माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव, अमित खरे, दिल्ली दूरदर्शनच्या कार्यालयातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते डी डी आंध्रप्रभा वाहिनी सुरु झाली, तेव्हापासूनच ईशान्य  भारतात, विशेषतः आसामसाठी स्वतंत्र वाहिनी सुरु करण्यासाठी मंत्रालयाने काम सुरु केलं होतं, असे अमित खरे यांनी सांगितलं. आसाम राज्य ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे,आणि ईशान्य भारत, आसियान देशांसाठीचे प्रवेशद्वार आहे. आसाम, भारत आणि आसियान देशांमधील दुवा म्हणून काम करु शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीडी आसाम वाहिनीवर या प्रदेशातील उदयोन्मुख गुणवत्तेला, कलेला वाव मिळेल, तसेच, उर्वरित भारत, ईशान्य भारताच्या जवळ येण्यास मदत होईल, अशी आपल्याला खात्री आहे, असेही खरे म्हणाले.

इतर राज्यांतील प्रादेशिक वाहिन्यांप्रमाणेच डीडी आसाम वाहिनीमुळे राज्याच्या शैक्षणिक विकासातही मदत होईल. संपूर्ण राज्यात प्रादेशिक भाषांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नात, या वाहिनीची सुरुवात, अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याचं, खरे म्हणाले.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेम्पत्ती म्हणाले की, डीडी आसाम वाहिनी सुरु झाल्यामुळे, ईशान्य भारतातील सर्व राज्यांना स्वतंत्र वाहिनी मिळाली असून, समृद्ध विविधता असलेल्या ईशान्य भारतात पहिल्यांदाच उपग्रह सेवा सुरु झाली असून, दूरदर्शनच्या मोफत डीडी डिशच्या माध्यमातून देशभर ही समृद्धी दिसू शकेल.

पार्श्वभूमी:

प्रसारभारतीची डीडी ईशान्य भारत वाहिनी, ही चोवीस तास चालणारी संमिश्र वाहिनी आठही राज्यांसाठी, 1 नोव्हेंबर 1990 साली सुरु करण्यात आली होती. 27 डिसेंबर 2000 पासून ही वाहिनी 24 तास सुरु करण्यात आली होती. 

अरुणाचल प्रदेशसाठी डीडी अरुणप्रभा वाहिनी, इटानगरहून सुरु झाली. पंतप्रधानांच्या हस्ते 9 फेब्रुवारी  2019 रोजी या वाहिनीचा शुभारंभ झाला होता.

त्यासोबतच, ईशान्य भारतातील विविध राज्यांच्या राजधान्यांमधून प्रसारित होणाऱ्या मर्यादित कालावधीच्या वाहिन्या डी डी फ्री डिशच्या माध्यमातून देशभर दाखवण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला. त्यानुसार, डीडी मेघालय, डीडी मिझोराम, डीडी त्रिपुरा, डीडी मणिपूर आणि डीडी नागालँड, शिलॉंग, ऐझवाल, अगरतला, इम्फाल आणि कोहिमा या ठीकाणांहून प्रसारित होणाऱ्या या वाहिन्या 9 मार्च 2019पासून  डीडी फ्री डिश (DTH) आणि प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या. त्यानंतर, डीडी ईशान्य भारत वाहिनीचे रुपांतर आसामसाठीच्या विशेष वाहिनीत करण्याची गरज लक्षात आली. ही चोवीस तास चालणारी वाहिनी, दूरदर्शन गुवाहाटी वरुन प्रसारित केली जाईल, ही वाहीनी आसाममधील लोक आणि तिथल्या संस्कृतीला समर्पित आहे. या वाहिनीवरून आसामीज भाषेतील सहा  नवे कार्यक्रम दाखवले जातील, यात बोडो भाषेसाठी विशेष कालावधी असेल. या वाहिनीचे चाचणी प्रसारण 1 डिसेंबर 2019 रोजी झाले.

सध्याच्या कोविड संकटात, तात्पुरती उपाययोजना म्हणून ईशान्य भारतातील सर्व वाहिन्यांचे अपलिंकिंग केले जात आहे. एप्रिल 2020 पासून डीडी नागालँड, डीडी त्रिपुरा, डीडी मणिपूर, डीडी मेघालय आणि डीडी मिझोराम ह्या वाहिन्या चोवीस तास वाहिन्यांमध्ये रुपांतरीत करण्यात आल्या.

डी डी आसाम वाहिनीवरुन विविध आकर्षक आणि रसिकांच्या पसंतीस उतरतील असे दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न असणार आहे. या कार्यक्रमात आसाममधील संस्कृती, खाद्यपदार्थ, लोकसंस्कृती इत्यादींवर विशेष भर दिला जाईल.

 

M.Iyengar/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643333) Visitor Counter : 256