गृह मंत्रालय

थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘लोकमान्य टिळक- स्वराज ते आत्मनिर्भर भारत’ या दोन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्‌घाटन


भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृती यासाठी लोकमान्य टिळक यांच्या आग्रहाचे मोदी सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात प्रतिबिंब

भारताचा झळाळता इतिहास जाणून घेण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांचे वैचारिक साहित्य जाणणे आवश्यक-गृह मंत्री

Posted On: 01 AUG 2020 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020

थोर स्वातंत्र्यसेनानी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त’लोकमान्य टिळक- स्वराज ते आत्मनिर्भर भारत’ या दोन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत उद्‌घाटन केले. भारतीय सांस्कृतिक सबंध परिषदेने या वेबिनारचे आयोजन केले आहे.

लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्या अर्थाने ‘भारतीय’ स्वरूप दिले.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान  असून  आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण देशासाठी वेचतानाच त्यांनी क्रांतिकारकांची वैचारिक पिढी घडवली.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची गर्जना भारतीय स्वातंत्र्य इतिहासात  सदैव सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल असे गृहमंत्री म्हणाले. 19 व्या शतकात हे बोलणे आणि ते कृतीत आणण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करण्याचे कार्य फारच कमी लोक करू शकत होते. . टिळकांच्या ह्या गर्जनेने भारतीय समाजात चेतना जागृत करण्याचे आणि स्वातंत्र्य चळवळीला जन-चळवळीचे स्वरूप  देण्याचे   कार्य केले, यामुळे ‘लोकमान्य’ ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ आजही जनतेसाठी मार्गदर्शक आहे असे गृह मंत्री म्हणाले.

 लोकमान्य  टिळक हे विद्वान विचारवंत, तत्वज्ञ, यशस्वी पत्रकार आणि समाज सुधारक होते. भारत, भारतीय संस्कृती आणि भारतीय जनमानस समजून घेणारे लोकमान्य आजही तितकेच प्रासंगिक आहेत. आपल्याला भारत आणि भारताचा गौरवशाली इतिहास जाणून घ्यायचा असेल तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे साहित्य जाणून घ्यावे लागेल, असे ते म्हणाले.  त्यांचे वैचारिक लिखाण वाचतांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ज्ञान प्राप्त होईल, आणि तरुणांना आयुष्यात नवनवीन यश मिळवण्यासाठी  प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृती यासाठी लोकमान्य टिळक यांच्या  आग्रहाचे सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ ह्या संकल्पनेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या विचारांनाच पुढे नेण्याचे काम होत आहे.

टिळकांना भारतीय संस्कृतीवरील अभिमानाच्या आधारे देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करायचे होते. या संदर्भात त्यांनी व्यायामशाळा, आखाडे आणि गोहत्याविरोधी संस्था स्थापन केल्या.

लोकमान्य टिळक हे अस्पृश्यतेचे प्रखर विरोधी होते, त्यांनी जाती-पंथांमध्ये विभागलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी मोठी चळवळ  उभारली.

लोकमान्य टिळकांनी कामगार वर्गाला राष्ट्रीय चळवळीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जनतेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांनी   सुरवात केली, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि दशा बदलली.

मरण आणि स्मरण ह्या दोन शब्दांत केवळ अर्ध्या अक्षराचा फरक आहे, पण हा अर्धा ‘स’ जोडण्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवावे लागते, लोकमान्य टिळक हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे असे अमित शहा म्हणाले. टिळकांनी महात्मा गांधी, स्वातंत्र्य वीर सावरकर, मदन मोहन मालवीय

यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरित केले. लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत महात्मा गांधी अनवाणी चालत गेले होते, महात्मा गांधीजीच्या टिळकांविषयीच्या आदराचे हे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1642951) Visitor Counter : 5131