पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी भाषण

Posted On: 30 JUL 2020 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2020

 

मॉरिशसचे पंतप्रधान, माननीय प्रविंद कुमार जगन्नाथ जी, वरिष्ठ सदस्य, मान्यवर आणि सन्माननीय अतिथींना नमस्कार, बोनज्योर.

तुम्हा सर्वांना हार्दीक अभिवादन. प्रथम मी, कोविड-19 जागतिक महामारीचे मॉरिशस सरकार आणि जनतेचे उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल अभिनंदन करतो. भारताने वेळीच औषध पुरवठा करुन आणि अनुभव सामायिक करुन यात मदत केल्याचा मला आनंद आहे.

मित्रांनो, आज आम्ही भारत आणि मॉरिशस यांच्यातील विशेष मैत्रीतील आणखी एक महत्त्वाचा क्षण साजरा करत आहोत. पोर्ट लुईस येथील सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत आपले सहकार्य आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे. भारत आणि मॉरिशस दोन्ही देश लोकशाही मूल्याचा महत्त्वपूर्ण खांब असलेल्या आपल्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा आदर करतात. अत्याधुनिक रचना आणि बांधकाम असलेली ही प्रभावी नवीन इमारत या सन्मानाचे चिन्ह आहे. मला आनंद आहे की, हा प्रकल्प नियोजित वेळेत आणि प्रारंभिक अंदाजित खर्चाच्या आत पूर्ण झाला आहे.

पंतप्रधान जगन्नाथ जी, काही महिन्यांपूर्वीच, आपण संयुक्तरित्या महत्त्वपूर्ण मेट्रो प्रकल्प आणि अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. मला आनंद आहे की, हे दोन्ही प्रकल्प मॉरिशसमधील लोकांसाठी उपयुक्त ठरत आहेत.

मित्रांनो, मॉरिशससोबतच प्रथम सागर- ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दी रिजन’ विषयी बोललो होतो. हे यामुळे की, भारताच्या हिंद महासागराप्रतीच्या दृष्टीकोनाबाबत मॉरिशस भारताच्या हृदयस्थानी आहे. आज, मी आणखी एक बाब सांगू इच्छितो, विकासात्मक भागीदारीबाबत भारताच्या दृष्टीकोनातही मॉरिशस हृदयस्थानी आहे.   

मित्रांनो, महात्मा गांधींनी बरोबर म्हटले आहे, “मी संपूर्ण जगाच्या परिप्रेक्षात विचार करु इच्छितो. माझे देशप्रेम एकूण मानवजातीच्या कल्याणात आहे. म्हणून, माझी भारताप्रतीची सेवा सर्व मानवजातीची सेवा ठरते”. हे भारताचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. भारत विकास करु इच्छितो आणि भारत इतरांना आपल्या विकासात्मक आवश्यकतांमध्ये मदत करु इच्छितो.

मित्रांनो, भारताचा विकासाप्रतीचा दृष्टीकोन प्रामुख्याने मानवकेंद्री आहे. आम्ही मानवतेच्या कल्याणासाठी काम करु इच्छितो. इतिहासाने आम्हाला हे शिकवले आहे की, विकासात्मक भागीदारीच्या नावाखाली, राष्ट्रांना परावलम्बित्वाची    भागीदारी करायला भाग पाडली गेली. यातून वसाहतवाद आणि साम्राज्यवादाचा उदय झाला. यामुळे जागतिक सत्ता केंद्रे उदयाला आली, आणि मानवतेचा ऱ्हास झाला.

मित्रांनो, भारत आदर, विविधता, भविष्याची काळजी आणि शाश्वत विकास यावर आधारीत विकासात्मक भागीदारी करत आहे.  

मित्रांनो, भारताचे विकासात्मक भागीदारीबाबतचे पायाभूत तत्व म्हणजे भागीदारांचा आदर करणे. विकासात्मक पाठांची आदान-प्रदान करणे हीच आमची एकमेव प्रेरणा आहे. म्हणूनच आमची विकासात्मक भागीदारी कोणत्याही अटींशिवाय असते. ती राजकीय किंवा व्यावसायिक विचारांनी प्रेरित नसते. 

मित्रांनो, भारताची विकास भागीदारी वैविध्यपूर्ण आहे. व्यापार ते सांस्कृतिक, ऊर्जा ते अभियांत्रिकी, आरोग्य ते गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान ते पायाभूत सुविधा, क्रीडा ते विज्ञान, यावर भारत जगभरातील राष्ट्रांसमवेत काम करत आहे. अफगाणिस्तान येथील संसद इमारतीला मदत केल्याचा भारताला अभिमान आहे, तसेच नायजर येथील महात्मा गांधी कन्व्हेन्शन सेंटरच्या निर्मितीशी संबंधित असल्याचाही अभिमान आहे. आपत्कालीन आणि अपघात (ट्रॉमा) रुग्णालयासाठी नेपाळला मदत केल्याचा आम्हाला आनंद आहे. तसेच आम्हाला श्रीलंकेच्या सर्व नऊ प्रांतात आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेत मदत केल्याचाही आनंद आहे.

आम्हाला आनंद आहे की, नेपाळसोबत करत असलेल्या इंधन पाईपलाईन प्रकल्पामुळे पेट्रोलिअम पदार्थांची उपलब्धतता निश्चित होईल. तसेच, मालदीवच्या 34 बेटांवर पिण्याचे पाणी आणि स्वच्छताविषयक कार्यात योगदान दिल्याचा आम्हाला आनंद आहे. अफगाणिस्तान आणि गयाना यासारख्या वैविध्यपूर्ण देशांमध्ये स्टेडियम व इतर सुविधा निर्माण करण्यात मदत करून आम्ही क्रिकेट लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतात प्रशिक्षण घेऊन युवा अफगाण क्रिकेट टीम एक मजबूत टीम म्हणून पुढे येत आहे, याबद्दल आम्ही आनंदी आहोत. आम्ही आता मालदिव क्रिकेटपटूंची प्रतिभा विकसित करण्यासाठी अशाच प्रकारचा पाठिंबा देत आहोत. आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब म्हणजे, श्रीलंकेतील गृहनिर्माण प्रकल्पात भारताने आघाडीवर राहून मदत केली. आमची विकासात्मक भागीदारी आमच्या भागीदार देशांचे विकासाचे प्राधान्यक्रम दर्शविते.

मित्रांनो, भारताला केवळ तुमच्या वर्तमानपरिस्थितीतच मदत करण्याचा आनंद नाही. तर, तुमच्या युवकांच्या उज्जवल भवितव्यासाठी मदत करण्यात आम्हाला आनंद आहे. म्हणूनच प्रशिक्षण आणि कौशल्य आमच्या विकास सहकार्याचा महत्वपूर्ण घटक आहे. यामुळे आमच्या भागीदारी राष्ट्रांमधील युवकांना स्वावलंबी होता येईल, नवनवीन उंची गाठण्यासाठी विश्वास प्रदान करेल.

मित्रांनो, भविष्यकाळ शाश्वत विकासाचा आहे. नैसर्गिक भवताल आणि मानवी गरजा आणि आकांक्षा यांच्यात संघर्ष असता कामा नये. म्हणूनच आम्ही मानवी सक्षमीकरण आणि पर्यावरणाची काळजी अशा दोहोंवर विश्वास ठेवतो. या तत्वज्ञानावर आधारीत, भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. चला, सूर्यकिरणांनी मानवी प्रगतीचा प्रवास तेजस्वी होऊ द्या. आम्ही आपत्ती निवारक पायाभूत सुविधांच्या बळकट भागीदारीवरही कार्यरत आहोत. दोन्ही उपक्रम द्वीप देशांसाठी विशेष प्रासंगिक आहेत. जागतिक समुदायाने या प्रयत्नांना ज्या पद्धतीने पाठिंबा दर्शविला आहे तो आनंददायक आहे.

मित्रांनो, मी ज्या मुल्यांविषयी बोललो ते एकत्रितपणे मॉरिशससोबतच्या भागीदारीत येतात. मॉरिशस बरोबर आम्ही फक्त हिंद महासागरामधील पाणीच नाही तर आपुलकी, संस्कृती आणि भाषेचा एक समान वारसा देखील सामायिक करतो. आमची मैत्री भूतकाळातून सामर्थ्य घेते आणि भविष्याकडे देखील पाहते. मॉरिशसच्या लोकांच्या यशात भारताला आनंद आहे. पवित्र अशा आप्रवासी घाट या लहान पायरीपासून ते अत्याधुनिक इमारती असे सर्व मॉरिशसने आपल्या यशातून, कष्टातून आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून उभ्या केले आहे. मॉरिशसची भावना प्रेरणादायक आहे. येत्या वर्षांमध्ये आमची भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याचे लक्ष्य आहे.

विव लामिते एंत्र लांद ए मोरीस 

भारत और मॉरिशस मैत्री अमर रहे।

भारत-मॉरिशस मैत्री चिरायु राहो.

धन्यवाद.

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642405) Visitor Counter : 196