उपराष्ट्रपती कार्यालय

कोरोना विषाणूच्या रुग्णांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक आणि कोविड-19 पीडितांचा आदरपूर्ण अंत्यविधी केला जात नसल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख


खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती यापेक्षा पूर्वग्रह अधिक घातक ठरू शकतो- उपराष्ट्रपतींचा इशारा आणि त्याविरोधात लढा देण्याची विनंती

कोरोना विषाणूशी संबंधित सर्व तथ्यांविषयी लोकांना अवगत करण्याची प्रसारमाध्यमे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती

शेतकऱ्यांसह कोविड-19 च्या योद्धांच्या समर्पित प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे नागरिकांना आवाहन

Posted On: 26 JUL 2020 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2020

कोविड-19 च्या रुग्णांप्रति होत असलेला भेदभाव आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सन्मानपूर्वक न होणारे अंत्यसंस्कार याबाबत, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज दुःख व्यक्त केले.

ते म्हणाले, अशा प्रकारच्या घटना फार दुर्दैवी आहेत. नागरिकांना अशा प्रवृत्ती रोखण्याचे  आणि अशा घटना टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.

फेसबुक पोस्टमध्ये नायडू म्हणाले की, पूर्वग्रह असलेल्या विचारांविरुद्ध लढा देणे आणि त्या मूळापासून नष्ट करणे, ही काळाची गरज आहे. अन्यथा चुकीची माहिती किंवा खोट्या बातम्यांपेक्षाही हे अधिक विषारी ठरू शकेल. कोविड-19 रुग्णांना समजून घेऊन आणि सहानुभूतीपूर्वक त्यांना वागणूक द्यावी, असे त्यांनी आवाहन करीत ते म्हणाले, हा अदृश्य विषाणू कोणालाही बाधित करू शकतो आणि त्यामुळे कोणीही सुरक्षित नाही, हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.

प्राचीन काळापासून भारत हा सहिष्णुतेची भूमी म्हणून ओळखला जात आहे आणि व्यथित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी येथील लोक कायमच सहानुभूती दाखवित आहेत, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. संसर्ग होण्याच्या भीतीमुळे कोरोनाबाधित व्यक्तींना लोकांद्वारे आणि काही ठिकाणी नातेवाईकांद्वारे कलंकित केले जाते, वेगळे असल्याची वागणूक दिली जाते अशा प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांना उपराष्ट्रपतींनी विचलित करणाऱ्या म्हणून संबोधले आहे.

कोविड-19 मुळे मरण पावलेल्यांना दफन करण्यासाठी जागा देण्यास विरोध दर्शविणाऱ्या घटनांचा संदर्भ देताना ते म्हणाले की हे पूर्णपणे अमान्य आहे आणि शोकाकुल कुटुंबातील सदस्यांच्या दु:खात सहभागी होण्याच्या आपल्या प्राचीन भारतीय परंपरेच्या विरोधात आहे.

निरक्षरता, अंधश्रद्धा, बनावट बातम्या आणि अफवा यासारख्या घटकांमुळे लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत, हे लक्षात घेता नागरिकांमध्ये जागरूकता आणि कोरोना विषाणू बाबतची सत्यता मांडणारी, बदल घडविणारी जनजागृतीपर मोहीम आरोग्य अधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी हाती घ्यावी, असे आवाहन श्री नायडू यांनी केले आहे. योग्य संदेशाचा पुनरुच्चारआणि व्यापक प्रसार केला पाहिजे जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि वर्तनातून इच्छित परिवर्तन घडवून आणता येईल. असे उपराष्ट्रपती म्हणाले.

एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नातून साथीच्या आजारामुळे उद्‌भवणाऱ्या भयानक परिस्थितीवर मात करता येते, असा आशावाद व्यक्त करीत ते म्हणाले की, आता पहिले कार्य म्हणजे रोगाच्या आलेखाला सपाट केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला जबाबदारीने वागणे आणि काही नियमांचे पालन करणे  आता गरजेचे आहे, जसे की वरचेवर हात धुणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या गोष्टींचे पालन केले पाहिजे,यावर त्यांनी भर दिला.

सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी प्रत्येकाने योगाभ्यास करावा आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. अनेक लोक संकटाच्या वेळी क्रोध आणि अस्वस्थता या नकारात्मक भावनांमध्ये अडकतात हे लक्षात घेऊन, नायडू यांनी समाधान, कृतज्ञता, सहानुभूती, क्षमा आणि सकारात्मक गुणधर्मांची भावना यासारख्या भावना जोपासण्याची गरज असल्यावर भर दिला. खरे तर हे सारे अध्यात्माचेच सार आहे, असे श्री नायडू म्हणाले

आजच्या कारगिल विजय दिवसाचा संदर्भ देऊन, उपराष्ट्रपती म्हणाले, कारगिल विजय दिवसानिमित्त आपण शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत, मातृभूमीच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या त्याग आणि बलिदानाबद्दल हे राष्ट्र नेहमी कृतज्ञ राहील.

त्यांनी अपरिचित कोरोना योद्धा असे म्हणत शेतकऱ्यांप्रति देखील आभार व्यक्त केले. जे अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी झटत असतात आणि आरोग्य सेवा, पोलिस कर्मचारी, प्रसारमाध्यमे, स्वच्छता कामगार आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामान वेळेत पोहोचविणाऱ्या व्यक्तींच्या समर्पित प्रयत्नांना  सहाय्य करण्यासाठी कार्यरत असतात.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641398) Visitor Counter : 248