पंतप्रधान कार्यालय

इंडिया आयडियाज समिट 2020 मध्ये पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 22 JUL 2020 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2020

 

नमस्ते

व्यवसाय क्षेत्रातले अग्रणी,

सन्माननीय अतिथी,

इंडिया आयडीयाज समिट मध्ये संबोधित करण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेला धन्यवाद देतो. युएसआयबीसीला या वर्षीच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित मी शुभेच्छा देतो. मागच्या दशकांमध्ये युएसआयबीसीने, भारत आणि अमेरिका व्यापार अधिक निकट आणला आहे. युएसआयबीसीची या वर्षीचा आयडीयाज समिट-‘उत्तम भविष्याची निर्मिती’हा विषयही समर्पक आहे.

मित्रहो,

जगाला एका उत्तम भविष्याची आवश्यकता आहे यावर आपण सर्व सहमत आहोत.आपणा सर्वाना सामुहिक रूपाने भविष्याला आकार द्यायचा आहे. माझा दृढ विश्वास आहे की, भविष्यासाठी आपला दृष्टीकोन प्रामुख्याने मानवकेन्द्री असायला हवा. गरीब आणि दुर्बल यांना  विकासाच्या आपल्या आराखड्यात मुख्य स्थान असायला हवे. व्यवसाय सुलभते इतकेच महत्वाचे आहे ईझ ऑफ लिविंग अर्थात  जीवनमान सुकर करणे.

मित्रहो, जागतिक अर्थव्यवस्था कार्यक्षमता आणि सर्वोत्तमता यावर अतिशय भर देणारी आहे हे नुकत्याच आलेल्या अनुभवाने आपल्याला शिकवले आहे. कार्यक्षमता ही एक चांगली गोष्ट आहे मात्र या वाटचालीत आपण या  इतक्याच महत्वाच्या बाबींवर लक्ष देण्याचे विसरलो आहोत. ती म्हणजे बाह्य धक्य्यासाठीची लवचिकता. या जागतिक महामारीने ही लवचिकता किती महत्वाची आहे हे आपल्याला दाखवून दिले आहे.

मित्रहो,

मजबूत देशांतर्गत आर्थिक क्षमताद्वारे जागतिक आर्थिक लवचिकता साध्य करता येते. याचा अर्थ म्हणजे, देशांतर्गत उत्पादन क्षमतेत  सुधारणा, वित्तीय यंत्रणांना पूर्व स्थितीत आणणे आणि  आंतरराष्ट्रीय व्यापारात वैविध्य आणणे.

मित्रहो,

आत्मनिर्भर भारताची हाक देत भारत,समृध्द आणि लवचिक जगासाठी योगदान देत आहे आणि म्हणूनच आपल्या भागीदारीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

मित्रहो,

आज जगाला  भारताप्रती आशा आहेत. याचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थाविषयक मुक्त धोरण,संधी आणि पर्याय यांचा उत्तम मेळ भारत देऊ करतो. मी विस्ताराने सांगतो. भारतात जनता आणि प्रशासनातही खुलेपणा आहे. खुल्या मनामुळे बाजारपेठाही खुल्या होतात. खुल्या बाजारपेठा, अधिक भरभराटीकडे नेतात.या तत्वावर भारत आणि अमेरिका दोन्हीही देश सहमत आहेत.

मित्रहो, गेल्या सहा वर्षात आपली अर्थव्यवस्था अधिक खुली आणि सुधारणा केन्द्री करण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले आहेत. सुधारणांमुळे, स्पर्धात्मकतेत वाढ, पारदर्शकतेत वृद्धी,डीजिटायझेशनचा विस्तार, नवोन्मेशाला चालना आणि अधिक धोरण स्थैर्य सुनिश्चित झाले आहे.

मित्रहो,

भारत अपार संधीची भूमी म्हणून पुढे येत आहे. मी आपणाला तंत्रज्ञान  क्षेत्राचे उदाहरण देतो. भारतात नुकताच एक अहवाल आला आहे. प्रथमच नागरी इंटरनेट वापरकर्त्यांपेक्षा ग्रामीण भागात इंटरनेट वापरकर्ते जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो. प्रमाणाबाबत आपण कल्पना करू शकता. भारतात सध्या सुमारे अर्धा अब्ज सक्रीय इंटरनेट वापरकर्ते आहेत. अर्धा अब्ज कनेक्टेड लोक.आपल्याला ही संख्या प्रचंड वाटली का. थोडे थांबा, कारण अर्धा अब्जपेक्षा जास्त  लोक आहेत जे  कनेक्टेड होत आहेत. तंत्रज्ञान संधीमध्ये 5 जी, बिग डाटा एनालिटिक्स, क्वांटम कम्प्यूटिंग, ब्लॉक-चेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या प्रमुख तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

 मित्रहो,

भारतात गुंतवणुकीचे व्यापक पर्याय आहेत. आपल्या शेतकऱ्याच्या मेहनतीत गुंतवणूक करण्यासाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. कृषी क्षेत्रात भारताने नुकत्याच ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत. कृषीविषयक  यंत्रे, कृषी पुरवठा साखळी व्यवस्थापन, रेडी टू इट पदार्थ, मत्स्य आणि सेंद्रिय उत्पादने, यामध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत. भारताचे कृषी प्रक्रिया क्षेत्र, 2025 पर्यंत अर्धा ट्रीलीयन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. उत्पन्नाचे अधिक मार्ग विकसित करण्यासाठी भारताच्या कृषी क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधीचा वापर करण्यासाठी हा सर्वात उत्तम काळ आहे.

आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. भारतात आरोग्य सेवा क्षेत्र दर वर्षी 22 टक्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान, टेलीमेडिसिन आणि निदान संबंधित उत्पादन यामध्ये प्रगती करत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात आधीपासूनच औषध निर्मिती क्षेत्रात जोमदार भागीदारी आहे. प्रमाण आणि वेग साध्य करण्यासाठी भारताच्या  आरोग्य सेवा क्षेत्रात आपल्या गुंतवणुकीचा विस्तार करण्याचा हा सर्वात उत्तम काळ आहे.

उर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. गॅस आधारित अर्थव्यवस्थ म्हणून भारत विकसित होत असताना अमेरिकी कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असतील. स्वच्छ उर्जा क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत. तुमच्या गुंतवणुकीसाठी अधिक उर्जा निर्माण करण्यासाठी भारतीय उर्जा क्षेत्रात प्रवेश करण्याचा हा उत्तम काळ आहे. 

पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. इतिहासातले सर्वात मोठे पायाभूत निर्मिती  अभियान आमच्या  देशाने हाती घेतले आहे. या, आमच्या देशात लाखो लोकांसाठी घरे बांधण्यासाठी, रस्ते, महामार्ग आणि बंदरे उभारण्यासाठी भागीदार बना.

नागरी हवाई वाहतूक हे विकासासाठी आणखी एक मोठी क्षमता असलेले क्षेत्र. येत्या आठ वर्षात हवाई प्रवास करणाऱ्याची संख्या दुपटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. येत्या दशकात एक हजार पेक्षा जास्त नवी विमाने ताफ्यात समाविष्ट करण्याची अग्रगण्य खाजगी विमान कंपन्यांची योजना आहे. भारतात उत्पादन सुविधा उभारण्यासाठी पुढे येणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारासाठी ही प्रचंड मोठी संधी आहे, प्रादेशिक बाजारपेठांना पुरवठा करण्यासाठी एक पाया तयार होऊ शकतो. देखभाल, दुरुस्ती आणि कार्यान्वयन सुविधा उभारणीतही अशीच परिस्थिती आहे. हवाई क्षेत्रातल्या आपल्या उद्दिष्टांना नवी भरारी देण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा हा चांगला काळ आहे.

संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा आम्ही 74 % पर्यंत वाढवत आहोत. संरक्षण सामग्री आणि प्लॅटफॉर्म उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने दोन संरक्षण  कॉरिडॉर उभारले आहेत.खाजगी आणि विदेशी गुंतवणूकदारांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहन देत आहोत. काही आठवड्या पूर्वीच आम्ही अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणांना मंजुरी दिली. या, पुढे येणाऱ्या या क्षेत्राचा भाग व्हा.

वित्त आणि विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा भारताने 49 % पर्यंत वाढवली आहे. विमा मध्यस्थामध्ये गुंतवणुकीसाठी 100 % थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. भारतातली विमा बाजारपेठ 12 % पेक्षा जास्त वेगाने वाढत असून 2025 पर्यंत 250अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.आयुष्मान भारत ही आमची आरोग्य आश्वासक योजना,प्रधान मंत्री फसाल विमा योजना, पिक विमा योजना आणि जन सुरक्षा किंवा सामाजिक सुरक्षा योजना यशस्वी ठरण्या बरोबरच सरकारने विमा उत्पादने त्वरित स्वीकारण्यासाठी पाया घातला आहे. आरोग्य, कृषी, व्यवसाय आणि जीवन विमा क्षेत्रात विमा कवच वाढवण्यासाठी व्यापक संधी आहेत. दीर्घकालीन आणि सुनिश्चित उत्पन्न निर्मितीसाठी भारतीय विमा क्षेत्र हा सध्या सर्वात उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.

मी काही पर्याय सुचवले आहेत आणि  त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. 

जेव्हा बाजार खुले आणि मुक्त असतात, संधी अधिक असतात आणि पर्याय अनेक असतात तेव्हा आशावाद मागे राहू शकत नाही. प्रमुख व्यवसाय क्रमवारीत भारताचे स्थान उंचावत असताना आपण हा आशावाद पाहू शकता. विशेषकरून जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत.

गुंतवणूक म्हणजे आत्मविश्वासाचे द्योतक आहे. दर वर्षी आम्ही थेट परकीय गुंतवणुकीचा  नवा उच्चांक गाठत आहोत.  2019-20  मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक 74अब्ज डॉलर्स होती. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही 20 % अधिक आहे. यूएसआईबीसी स्नेह्यांनी माहिती दिली आहे की या वर्षी अमेरिकेकडून ‘प्लेज इन्व्हेस्टमेंट’40 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त झाली आहे. सध्या सुरु असलेल्या महामारीच्या  काळात काय झाले आहे हे ही पहा. कोविडच्या मध्यात भारताने एप्रिल आणि जुलै 2020 दरम्यान 20 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे.

मात्र भारत आणखी अनेक संधी प्रदान करत आहे. जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक सामर्थ्य आमच्याकडे आहे.

मित्रहो,

भारताची प्रगती  म्हणजे  एका अशा राष्ट्रासमवेत व्यापार संधीत वृद्धी, ज्यावर भरवसा करता येईल, अधिक मुक्ततेसमवेत जागतिक एकात्मकतेत वाढ, विशाल बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याबरोबरच स्पर्धात्मकतेत वाढ आणि कुशल  मनुष्य बळ उपलब्धतेबरोबरच गुंतवणुकीवरच्या परताव्यात वाढ.  

मित्रहो,

या दृष्टीकोनासाठी अमेरिकेप्रमाणे काही चांगले भागीदार आहेत. भारत आणि अमेरिका या सामायिक मुल्ये असणाऱ्या  दोन सळसळत्या लोकशाही आहेत. आपण नैसर्गिक भागीदार आहोत. याआधी भारत- अमेरिका मैत्रीने अनेक आयाम गाठले आहेत. महामारी नंतर जग पुन्हा पूर्वपदावर यावे यासाठी आपल्या भागीदारीने महत्वाची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे. अमेरिकी गुंतवणूकदार नेहमी एखाद्या क्षेत्रात किंवा देशात प्रवेश करण्यासाठी अचूकवेळेच्या शोधात असतात. त्यांना मी सांगू इच्छितो की भारतात  गुंतवणूक करण्यासाठी यापेक्षा उत्तम काळ कधी नव्हता. भारत-अमेरिका आर्थिक भागीदारी पुढे नेण्यासाठीच्या कटीबद्धतेसाठी यूएसआईबीसीच्या नेतृत्वाचे  मी पुन्हा एकदा आभार मानतो. यूएसआईबीसी नवी शिखरे गाठत राहो.

भारत-अमेरिका मैत्री अधिक वृद्धिगत होवो.

नमस्ते !

धन्यवाद !

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640774) Visitor Counter : 326