संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई  दल कमांडर परिषद- जुलै 2020

Posted On: 22 JUL 2020 4:56PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषद (एएफसीसी)चे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले. हवाई  दलाच्या मुख्यालयात (वायू भवन) येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले. हवाई  दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी संरक्षण मंत्री व संरक्षण मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याप्रसंगी स्वागत केले.

हवाई  दलाच्या कमांडर्सना संबोधित करताना, संरक्षण मंत्र्यांनी, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमता वाढविणाऱ्या सक्रिय प्रतिसादाचे कौतुक केले. बालाकोट येथे करण्यात आलेले हवाई हल्ले, तसेच पूर्व लडाखच्या सध्याच्या परिस्थितीला उत्तर देताना भारतीय हवाई  दलाची शस्त्रे त्वरित तैनात केल्याने विरोधकांना कडक संदेश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या सशस्त्र दलांच्या क्षमतेवर जनतेच्या असलेल्या विश्वासामुळे, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा देशाचा संकल्प दृढ आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे संकेत दिले व कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार राहण्याचे भारतीय हवाई  दलाला आवाहन केले.

कोविड-19 या साथीच्या आजारात देशाला दिलेल्या प्रतिसादाबाबत, तसेच अनेक ‘मानवी सहाय आपत्ती निवारण’ (HADR) मोहिमेदरम्यान भारतीय हवाई  दलाच्या उत्तम योगदानाचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी संरक्षण उत्पादनातील स्वावलंबन साधण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला व नमूद केले, की या हवाई  दल कमांडर परिषदेसाठी निवडलेली संकल्पना- ‘भारतीय हवाई  दल- आगामी दशकात’- ही येणाऱ्या काळात स्वदेशीकरणाच्या दिशेने प्रयत्न वाढविण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची नेमणूक झाल्यापासून व सैन्य व्यवहार विभाग (Department of Military Affairs- DMA) तयार केल्यापासून तीनही सैन्य दलांमध्ये समन्वय व एकीकरण वृद्धिंगत झाल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेण्यात, तसेच नॅनो टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व स्पेस डोमेनमधील उदयोन्मुख क्षमतांचा स्वीकार करण्यामध्ये भारतीय हवाई  दलाने बजावलेल्या भूमिकेची पोचपावती देऊन संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. सशस्त्र सैन्याच्या आर्थिक किंवा इतर सर्व गरजा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी सर्व कमांडर्सना दिली.

हवाई  दल प्रमुखांनी कमांडर्सना संबोधित करताना म्हटले आहे, की भारतीय हवाई  दल छोट्या कालावधीच्या, त्यासोबतच ठळक धोक्यांचा सामना करण्यास सज्ज आहे. शत्रूंनी केलेल्या कोणत्याही आक्रमक कारवाईला सामोरे जाण्यासाठी सर्व विभाग तयार आहेत. त्यांनी नमूद केले, की सैन्याची तैनाती व सज्जता या गोष्टींची खात्री देण्यात सर्व अधिकाऱ्यांचा प्रतिसाद तत्पर व प्रशंसनीय आहे. तत्काळ मिळालेल्या सूचनेवरून, परिस्थिती हाताळण्यासाठी, आवश्यक प्रतिसाद  त्वरित देण्याची क्षमता, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तीन दिवसांच्या परिषदेदरम्यान, येणाऱ्या सर्व धोक्यांचा सामना करण्यासाठी, पुढील दशकात भारतीय हवाई  दल क्षमता वाढवण्यावर विचारविनिमय करेल, तत्पूर्वी कमांडर सद्य परिचालन परिस्थिती व तैनातींचा आढावा घेतील.

***

M.Chopade/S.Pophale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640428) Visitor Counter : 321