पंतप्रधान कार्यालय

15 व्या भारत-युरोपियन युनियन (आभासी) शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

Posted On: 15 JUL 2020 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2020

 

महोदय, नमस्कार!

कोविड-19 मुळे मार्च मध्ये होणारी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषद आपल्याला स्थगित करावी लागली होती. आज आपण आभासी माध्यमातून भेटू शकलो ही खूपच चांगली बाब आहे. सर्वप्रथम मी कोरोना विषाणूमुळे युरोप मध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल संवेदना व्यक्त करतो. आपल्या प्रारंभिक टिप्पणीसाठी धन्यवाद. मी देखील तुमच्याप्रमाणे भारत आणि युरोपियन युनियनचे संबंध अधिक विस्तृत आणि दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी आपल्याला दीर्घकालीन धोरणात्मक  दृष्टीकोन अवलंबला पाहिजे.

यासोबतच एक कृती-अभिमुख विषयसूची तयार केली पाहिजे, जिला निर्धारित मुदतीमध्ये लागू केली जाऊ शकेल. भारत आणि युरोपियन युनियन नैसर्गिक भागीदार आहेत. आमची भागीदारी जगामध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आजच्या जागतिक परिस्थितीत हे वास्तव आणखी स्पष्ट झाले आहे.

आम्ही दोन्ही देश, लोकशाही, बहुलवाद, सर्वसमावेशकता, आंतरराष्ट्रीय संस्थांचा आदर, बहुपक्षीयता, स्वातंत्र्य, पारदर्शकता यासारखी सार्वत्रिक मूल्ये सामायिक करतो. कोविड-19 नंतर आर्थिक क्षेत्रात जागतिक स्तरावर नवीन समस्या उद्भवल्या आहेत. यासाठी लोकशाही देशांमध्ये अधिकाधिक सहकार्याची आवश्यकता आहे.

आज आमच्या नागरिकांचे आरोग्य आणि समृद्धी दोन्ही देखील आव्हानांचा सामना करत आहेत. नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विविध प्रकारचे दबाव आहेत. अशा परिस्थितीत, भारत-युरोपियन युनियन भागीदारी, आर्थिक पुनर्रचना आणि मानव-केंद्रित व मानवता-केंद्रित जागतिकीकरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. आम्ही उभय देशांनी सध्याच्या आव्हानांखेरीज हवामान बदलासारख्या दीर्घकालीन आव्हानाला देखील प्राधान्य दिले आहे.

भारतात नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आम्ही युरोपमधून गुंतवणूक आणि तंत्रज्ञानास आमंत्रित करतो. मला आशा आहे की या आभासी शिखर परिषदेच्या माध्यमातून आपले संबंध अधिक दृढ होतील.

महोदय, तुमच्याशी संवाद साधायची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो.

 

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1638838) Visitor Counter : 250