पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे राष्‍ट्राला उद्देशून संबोधन

Posted On: 30 JUN 2020 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जून 2020

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार!

कोरोना जागतिक महामारीविरुद्ध लढताना आपण सर्वानी अनलॉक-2 मध्ये प्रवेश केला आहे आणि आपण त्या ऋतूतही प्रवेश करतोय ज्यात

सर्दी, खोकला, ताप इत्यादी न जाणे काय काय गोष्टी होत आहेत, ही प्रकरणे वाढत आहेत. अशा परिस्थितीत माझी सर्व देशवासियांना प्रार्थना आहे कि आपण सर्वांनी अशा काळात आपापली काळजी घ्यावी. मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे कि जर कोरोनामुळे होणारा मृत्युदर बघितला तर जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारत सावरलेल्या स्थितीत आहे. वेळेवर केलेली टाळेबंदी आणि इतर निर्णयांमुळे भारतातील अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. मात्र आम्हाला हे पण जाणवत आहे कि जेव्हापासून देशात टाळेबंदी उठण्याचा पहिला टप्पा सुरु झाला तेव्हापासून व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारांमध्ये बेफिकीरपणा वाढतच चालला आहे. पहिल्यांदा आम्ही, मास्कचा वापर असो, दोन फूट शारीरिक अंतर नियम पालन करणे असो, 20 सेकंदापर्यंत दिवसातून कितीतरी वेळा हात धुणे असो, या सर्व गोष्टीत खूप सतर्क होतो. मात्र आज जेंव्हा आम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज आहे, तेव्हा बेफिकिरी वाढणे ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे.

मित्रांनो, टाळेबंदीच्या काळात खूप गांभीर्याने नियमांचे पालन केले गेले होते मात्र आता सरकारांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना, देशातील नागरिकांना पुन्हा तशाच प्रकारची सतर्कता दाखविण्याची गरज आहे. विशेष करून प्रतिबंधित क्षेत्रात आम्हाला विशेष लक्ष देण्याची गरज आहे.जे कोणी लोक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना ते दाखवून देण्याची, त्यांना थांबविण्याची आणि समाजविण्याची गरज आहे.

आता तुम्ही बातम्यांमध्ये बघितलेच असेल कि एका देशाच्या पंतप्रधानांवर 13 हजार रुपयांचा दंड आकारला गेला कारण ते सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान केल्याशिवाय गेले होते. भारतातही स्थानिक प्रशासनांना याच तत्परतेने कारवाई करायला हवी. हे 130 कोटी जनतेच्या आयुष्याचे रक्षण करण्याचे अभियान आहे. भारतात गावातील प्रमुख (मुखिया) असुदे किंवा देशाचा पंतप्रधान कोणीही नियमांपेक्षा वरचढ नाही.

मित्रांनो, अशी परिस्थिती येता कामा नये कि कोणत्याही गरिबाच्या घरी चूल पेटणार नाही हीच टाळेबंदीच्या काळात देशाची सर्वोच्च प्राथमिकता होती. केंद्र सरकार असो, राज्य सरकारे असोत, नागरी स्वराज्य संस्थातील लोक असुदे, सर्वानीच पूर्णपणे प्रयत्न केला कि एव्हढ्या मोठ्या देशात आमचे कोणी गरीब बंधू, भगिनी उपाशी झोपणार नाहीत. देश असो किंवा व्यक्ती; वेळेवर निर्णय घेतल्यामुळे, संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यामुळे कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्याची शक्ती अनेक पट वाढते. त्यामुळे टाळेबंदी केल्यावर केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण योजना घेऊन आले. या योजनेअंतर्गत गरीबांसाठी 1.75 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले.

मित्रानो,

मागील तीन महिन्यात 20 कोटी गरीब कुटुंबाच्या जनधन खात्यात थेट 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. या दरम्यान 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. याचबरोबर गावांमध्ये मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान जलद गतीने सुरु करण्यात आले आहे. यावर सरकार 50 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र मित्रानो, आणखी एक मोठी गोष्ट आहे, ज्याने जगालाही हैराण केले आहे, आश्चर्यचकित केले आहे ते म्हणजे कोरोनाविरोधात लढताना भारतात 80 कोटींहून  अधिक लोकांना 3 महिन्यांचा शिधा म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात आले  याशिवाय प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला एक किलो डाळ देखील मोफत देण्यात आली.  म्हणजे एका परीने पाहिले तर अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा  अडीचपट जास्त लोकांना, ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा  12 पट अधिक लोकां आणि युरोपीय संघटनेच्या लोकसंख्येपेक्षा 2 पटीने अधिक लोकांना आमच्या सरकारने मोफत अन्नधान्य दिले आहे. मित्रानो, आज मी याच्याशीच संबंधित एक महत्वपूर्ण घोषणा करणार आहे. मित्रानो, आपल्याकडे वर्षाऋतू दरम्यान आणि त्यानंतर प्रामुख्याने कृषी क्षेत्रात जास्त काम असते. अन्य क्षेत्रात त्यामानाने थोडी सुस्ती असते. जुलैपासून हळूहळू सण उत्सव सुरु होतात.

आता बघा 5 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. मग श्रावण सुरु होत आहे, त्यानंतर 15 ऑगस्ट आहे, रक्षाबंधन आहे, कृष्ण जन्माष्टमी येईल, गणेश चतुर्थी येईल, ओणम येईल, पुढे  तर काठी बिहू आहे, नवरात्री आहे, दुर्गापूजा आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, छटपूजा आहे, सणांचा हा काळ गरजाही वाढवतो आणि खर्च देखील वाढवतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे कि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाईल, म्हणजेच  80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारी ही योजना आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्येही लागू राहील.

सरकारतर्फे या पाच महिन्यांसाठी 80 कोटी पेक्षा जास्त बंधु-भगिनींना, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, दरमहा पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मोफत दिले जातील. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला दरमहा एक किलो हरभरा डाळ सुद्धा मोफत दिली जाईल.

मित्रहो, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या या विस्तारासाठी 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागच्या तीन महिन्यांचा खर्चही यात मिळवला तर हा खर्च दीड लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.

आम्ही संपूर्ण भारतासाठी एक स्वप्न पाहिले. अनेक राज्यांनी खूप चांगले काम सुद्धा केले. इतर राज्यांनीही चांगले काम करावे, यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत. संपूर्ण भारतासाठी एकाच सामायिक रेशन कार्डची व्यवस्था सुद्धा केली जात आहे. एक राष्ट्र - एक रेशन कार्ड. वन नेशन वन राशन कार्ड. याचा सर्वात जास्त लाभ अशा गरीबांना मिळेल, ज्यांना रोजगार किंवा इतर कारणांसाठी आपले गाव सोडून इतरत्र जावे लागते. इतर राज्यात जावे लागते.

मित्रहो, आज गरिबांना, गरजूंना मोफत धान्य देणे सरकारला शक्य होते आहे, त्याचे श्रेय प्रामुख्याने दोन वर्गांना जाते. पहिला वर्ग म्हणजे आपल्या देशातील कष्टकरी शेतकरी, आपले अन्नदाते. आणि दुसरा वर्ग म्हणजे आपल्या देशातील प्रामाणिक करदाते. आपले कष्ट आणि आपल्या समर्पणामुळेच ही मदत करणे देशाला शक्य होते आहे. तुम्ही देशाचे अन्न भांडार भरले, म्हणून आज देशातील गरिबांची, श्रमिकांची चूल पेटते आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कर भरला, आपली जबाबदारी पार पाडली, म्हणून आज देशातील गरिबांना एवढ्या मोठ्या संकटाशी दोन हात करणे शक्य होते आहे.

मी आज प्रत्येक गरीबाबरोबरच देशातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक करदात्याचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना अभिवादन करतो.

मित्रहो, येणाऱ्या काळात आपण आपले प्रयत्न वाढवणार आहोत. गरीब, पिडीत, शोषित, वंचित अशा सर्वांनाच सक्षम करण्यासाठी निरंतर काम करणार आहोत. आपण सर्व प्रकारची खबरदारी घेत आर्थिक व्यवहारांचे प्रमाण आणखी वाढवणार आहोत.  भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपण दिवस-रात्र एक करू. आपण सर्व लोकल साठी व्होकल होऊया. याच संकल्पासह आपणा सर्वांना, 130 कोटी देशवासीयांना, एकत्रितपणे काम सुद्धा करायचे आहे आणि आगेकूच सुद्धा करायची आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो, आपल्यासाठीही प्रार्थना करतो, आपल्याला आग्रहाची विनवणी करतो, आपण सर्वांनी निरोगी रहावे, परस्परांपासून सहा फूट अंतर राखावे, रुमाल, फेस कव्हर, मास्क यांचा वापर करत राहा, हलगर्जीपणा करू नका. याच आग्रहासह, याच इच्छेसह मी आपणा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा देतो. धन्यवाद!

 

 

* * *

GC/VJ/SK/MP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635384) Visitor Counter : 322