सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

29 जून 2020 रोजी सांख्यिकी दिन, 2020 साजरा करण्यात आला


संकल्पना: शाश्वत विकास उद्दिष्टे

Posted On: 29 JUN 2020 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जून 2020

दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा वापर लोकप्रिय करण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी  धोरण ठरविण्यासाठी सांख्यिकी कशी मदत करते याबाबत जनतेला जागरुक बनवण्यासाठी सरकार सांख्यिकी दिन साजरा करत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली स्थापन करण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाची नोंद म्हणून दरवर्षी 29 जून रोजी प्रा. पी सी महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी जागतिक महामारीमुळे सांख्यिकी दिन2020 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विविध समाजमाध्यमांतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे थेट प्रक्षेपण  देखील करण्यात आले.  सांख्यिकी दिन2020  ची संकल्पना  होती शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) - 3 (निरोगी जीवनाची खात्री करुन घ्या आणि सर्व वयोगटातील सर्वांच्या कल्याणला प्रोत्साहन द्या ) आणि एसडीजी- 5 (लैंगिक समानता मिळवा आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम बनवा).

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि केंद्रीय नियोजन मंत्रालयचे  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजितसिंग यांनी सांख्यिकी दिन, 2020 च्या संमेलनाला संबोधित केले. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय  आणि भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष प्रा. बिमल कुमार रॉय, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष (एनएससी)देशाचे मुख्य संख्याशास्त्रज्ञ प्रवीण श्रीवास्तव, डॉ. प्रीती सुदान, सचिव आरोग्य व कुटुंब कल्याण, डॉ. संगीता रेड्डी, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि संयुक्त महाव्यवस्थापकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल हॉस्पिटल एंटरप्राइजेज लि., भारतीय सांख्यिकी संस्था संचालक प्रा.संघमित्र बंड्योपाध्याय यांनी संकल्पना व तिचे महत्त्व या विविध बाबींविषयी संमेलनाला संबोधित केले. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी रेनाटा लोक डेसॅलियन, यूएन रेसिडेन्ट कोऑर्डिनेटर, डॉ. अनिता भाटिया, उप कार्यकारी संचालक, यूएन वुमेन्स, डॉ. एनरीक ऑरडाज, महासंचालक, नॅशनल स्टॅटिस्टिक्स अँड जिओग्राफी, मेक्सिको, बँकॉक मधील यूएन ईएससीएपी च्या सांख्यिकी विभागाचे संचालक गेम्मा व्हॅन हॅलडेरेन यांनीही यानिमित्त संदेश दिला. शिवाय, केंद्र / राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य हितधारकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमामध्ये भाग घेतला.

सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने  केंद्र सरकार, राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार आणि संस्थांमधील अधिकृत संख्या शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या सन्मानार्थ पी. सी. महालानोबिस राष्ट्रीय पुरस्कार हा नवीन पुरस्कार सुरू केला आहे यंदाचा प्रा. पी. सी. महालानोबिस राष्ट्रीय पुरस्कार देशाच्या  राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. चक्रवर्ती रंगराजन यांना प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्थेचे माजी संचालक डॉ. अरविंद पांडे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे माजी अतिरिक्त महासंचालक डॉ. अखिलेश चंद्र कुलश्रेष्ठ, यांना संयुक्तपणे सांख्यिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सांख्यिकी 2020 मधील प्रा. पी.व्ही. सुखात्मे  राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय स्तरावर आयोजित सांख्यिकीशी संबंधित विषयावरील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

विविध एसडीजी मिळविण्याच्या मार्गातील आव्हानांवर आणि पुढील दिशेबाबत  विविध विषयावरील  सादरीकरणेही करण्यात आली. शाश्वत विकास उद्दिष्टे -राष्ट्रीय संकेतक फ्रेमवर्क (एनआयएफ) अद्यतन अहवाल, 2020  (आवृत्ती 2.1) या कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात आला. अहवालासह, अद्ययावत  एनआयएफ आणि एसडीजी डेटा स्नॅपशॉट हँडबुक देखील प्रकाशित करण्यात आले. मंत्रालयाने जाहीर केले की लवकरच भारतीय सांख्य़िकी सेवा केडर व्यवस्थापन पोर्टलच्या माध्यमातून आयएसएस केडरची कारकीर्द आणखी बहरावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी दिन, 2020 नंतर वर्षभर संकल्पनेवर आधारित चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या मालिका आयोजित केल्या जातील. व्यापक प्रसिद्धीसाठी या चर्चा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  उपलब्ध आहेत.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635237) Visitor Counter : 873