पर्यटन मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने केले संपूर्ण सप्ताहाचे आयोजन


‘‘योग ॲट होम अँड योग विथ फॅमिली’’ या संकल्पनेअंतर्गत समाज माध्यमांवर विविध उपक्रम

‘देखो अपना देश’ वेबिनारमध्ये 20 जून, 2020 रोजी ‘भारत: ए कल्चरल ट्रेझर’ या विशेष सत्रामध्ये पर्यटन मंत्री सहभागी होणार

Posted On: 19 JUN 2020 4:43PM by PIB Mumbai

 

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण एक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दि.15 जून रोजी सुरू झालेल्या या सप्ताहामध्ये देशभरामध्ये क्षेत्रीय कार्यालयांच्यावतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यासाठी समाज माध्यमांची मदत मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. तसेच योगसंबंधित कार्यक्रम मालिकांचेही आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा कहर लक्षात घेऊन पर्यटन विभागाने यंदा ‘‘योग ॲट होम अँड योग विथ फॅमिली’’ ही संकल्पना निश्चित केली आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये निरोगी मन आणि सुदृढ शरीराची आवश्यकता आहे, याविषयी आत्म-जागरूकता निर्माण करण्यासाठी योगविषयक कार्यक्रमांची गरज आहे, हे लक्षात घेऊन आभासी माध्यमातून या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, दि. 20 जून 2020 रोजी पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘देखो अपाना देश’ वेबिनारमध्ये पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल उपस्थित असणार आहेत. अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याबरोबर  प्रल्हादसिंह पटेल संवाद साधणार आहेत. 20 जून, 2020 रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये होणा-या या कार्यक्रमामध्ये  ‘भारत: ए कल्चरल ट्रेझर’ म्हणजेच भारत: सांस्कृतिक दृष्ट्या एक मोठा खजिना, या विषयावर चर्चा होणार आहे. प्रल्हादसिंह पटेल यांच्यासह दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये स्पाईस जेटचे मुख्य कार्यकारी संचालक अजय सिंग, ओयोचे प्रमुख रितेश अग्रवाल, फॅशन डिझायनर अनिता डोंगरे, प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार, मॅरिएटच्या विपणन शाखेच्या उपाध्यक्षा रंजू अलेक्स, आदि सहभागी होणार आहेत. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमाअंतर्गत भारतातल्या विविधतेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न ‘देखो अपना देश’ या वेबिनार मालिकेच्या मदतीने पर्यटन मंत्रालच्यावतीने करण्यात येणार आहे.

या सत्राचे थेट प्रक्षेपण 'अतुल्य भारत'च्या समाज माध्यमावर करण्यात येणार आहे.

यासाठीची लिंक पुढीलप्रमाणे आहे- facebook.com/incredibleindia/ and Youtube.com/incredibleindia

योग आणि कल्याण या विषयांचा समावेश असलेल्या ‘देखो अपना देश’ वेबिनारवरील आधारित कार्यक्रमांमध्ये पुढील विषयांचा समावेश आहे.

दि. 19 जून, 2020 - 11.00 ते 12.00 -

योग आणि कल्याण- आव्हानात्मक काळात योगाचे महत्व-

सादरकर्ते आंतरराष्ट्रीय योगगुरू भरत ठाकूर. अध्यात्मिक गुरू, देव संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या, नाडी विज्ञान आणि योग उपचार शास्त्रातले तज्ज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण जोशी हे सहभागी होणार आहेत.

दि. 20 जून, 2020- दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत

भारत: ए कल्चरल ट्रेझर’ हे वेबिनार होणार आहे. यामध्ये केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील पाच मान्यवर, स्पाईस जेटचे मुख्य कार्यकारी संचालक अजय सिंग, ओयोचे प्रमुख रितेश अग्रवाल, फॅशन डिझायनर अनिता डोंगरे, प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार, मॅरिएटच्या विपणन शाखेच्या उपाध्यक्षा रंजू अलेक्स, आदि सहभागी होणार आहेत.

दि. 21 जून, 2020- 11.00 ते 12.00 -

भारत -योग केंद्र (भारत- योग गंतव्य) हा कार्यक्रम ग्रीनवे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अचल मेहरा सादर करणार आहेत. अचल मेहरा हे मुंबईतल्या 'द योगहाउस'चे सहसंस्थापक आणि 'महुआ वन रिसॉर्ट'चे संस्थापक आहेत.

समाज माध्यमांव्दारे आयोजित कार्यक्रम - अतुल्य भारत समाज माध्यमाव्दारे योग कार्यक्रम करण्यासाठी लोकांमध्ये भरपूर उत्साह दिसून येत आहे. अनेकजण आपल्या कुटुंबियांसमवेत विविध प्रकारची आसने करतानाची छायाचित्रे, चित्रीकरण लोकांना पाहता यावीत म्हणून समाज माध्यमांवर ‘शेअर’ करीत आहेत. पर्यटन मंत्रालयानेही योगदिन कार्यक्रमासाठी राबवलेल्या अनेक उपक्रमांचे चित्रीकरण शेअर केले आहे. तसेच प्रश्नमंजूषा कार्यक्रमात सहभागी झालेले आपले छायाचित्र पाठवू शकतात, असे जाहीर केले आहे. योग दिन साजरा करण्यासाठी लोक आपल्या घरी सराव करत आहेत, त्याची माहिती ई-वृत्तपत्राकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ‘भारत-योग गंतव्य’मध्ये त्याचा समावेश करता येणार आहे. आयुष मंत्रालयाच्यावतीने ‘माय लाईफ, माय योग’ अशी स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या घरामध्ये कुटुंबियांसमवेत योगदिनी योग करीत असतानाचा व्हिडिओ पाठवणे अपेक्षित आहे. या स्पर्धेलाही मंत्रालय प्रोत्साहन देत आहे.  

पर्यटन मंत्रालयाने देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘my GOV’बरोबर तंत्रज्ञानाचे सहकार्य करून भागीदारी निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ‘देखो अपना देश’ ही वेबिनार मालिका नॅशनल इ-गव्हर्नन्स डिव्हिजनच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने प्रदर्शित केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग आणि कल्याण या क्षेत्रातल्या भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न पर्याटन मंत्रालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

*****

S.pophale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632615) Visitor Counter : 227