सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

ADIP योजनेअंतर्गत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांच्या हस्ते फिरोजपूर, पंजाब येथे दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे पहिल्यांदाच आभासी माध्यमातून वितरण

या संकटाच्या काळात लाभार्थ्यांपर्यंत सहायक साधने वेळेत पोहचवण्यासाठी आणखी आभासी मदत शिबिरांचे आयोजन करणार – थावरचंद गेहलोत

Posted On: 15 JUN 2020 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जून 2020

 

कोविड-19 संसर्गजन्य आजाराच्या काळात समाजात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेली मदत आणि सहाय्यक साधने त्यांच्यापर्यंत वेळेत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने काही विशेष उपाययोजना केल्या आहेत. सध्या लागू असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन, दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करणारे आभासी ADIP शिबीर पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील तलवांडी भाई तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. सरकारने टाळेबंदी अंशतः शिथिल केल्यानंतर, केंद्रीय समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत, ADIP योजनेच्या अंमलबजावणीसाठी ALIMCO ने आयोजित केलेले अशा प्रकारचे हे पहिलेच आभासी शिबीर होते.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून या शिबिरात सहभागी झाले होते.  

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्यांचे मंत्रालय दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध आहे, असे गेहलोत यावेळी म्हणाले. सध्या कोविड-19 या आजाराचे संक्रमण सुरु असल्यामुळे, आता दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने आणि उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी, यापुढे देशभरात आभासी ADIP शिबिरे घेण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला. देशात झालेल्या ADIP शिबिरांमधून 10 वेळा गिनीज बुक मध्ये विक्रम नोंदवण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्तींना वित्तीय सहाय्य आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारने आतापर्यंत अनेक योजना सुरु केल्या आहेत, अशी माहिती गेहलोत यांनी दिली. त्याशिवाय, दिव्यांगांचा सत्कार आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने केलेल्या अनेक उपाययोजनांची देखील त्यांनी माहिती दिली. दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यांगांसाठी असलेल्या एकल ओळखपत्र योजनेत नोंदणी करावी, ज्यामुळे देशभरात कुठेही त्यांना सरकारी योजनांचे लाभ मिळवता येतील, असे गेहलोत यांनी संगितले. आतापर्यंत देशभरातील 31 लाख दिव्यांगांना ही ओळखपत्रे देण्यात आली आहेत.

तलवंडी तालुक्यातील 95 लाभार्थ्यांना 166 विविध प्रकारातील सुमारे 12 लाख किमतीच्या सहायक साधनांचे वाटप करण्यात आले. यावेळी 11 तीन चाकी सायकल्सचे देखील वितरण करण्यात आले. फिरोजपूर जिल्ह्यात एकूण 962 लाभार्थ्यांना सुमारे दीड कोटी रुपयांची साधने दिली जाणार आहेत.

फिरोजपूर येथे ALIMCO-कृत्रिम सांधे उत्पादन महामंडळाने आयोजित केलेले हे अशाप्रकारचे पहिलेच शिबीर आहे. याच्या यशस्वी आयोजनानंतर, देशभरात अशी अनेक शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

दिव्यांग व्यक्तींच्या या शिबिरात, कोविड संक्रमण रोखण्यासाठीची सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. ज्या जागेवर हे शिबीर आहे, तिथे सतत सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. तसेच, दिल्या जाणाऱ्या उपकरणांचे बहुस्तरीय सैनीटायझेशन, ज्याद्वारे पोहचवण्यात येणार, त्या वाहनांचे, साठा केल्या जाणाऱ्या गोदामांचे सैनीटायझेशन केले जाते. त्याशिवाय, उपकरणे दिव्यांगांना देण्याआधी पुन्हा सैनीटायझेशन केले जाते. सध्या कोविडचा धोका असल्याने जी उपकरणे दिव्यांगांच्या जवळून संपर्कात येणार आहेत, त्यांचे वाटप सध्या केले जात नाही.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्तींची आसनव्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करुन करण्यात आली होती. तसेच लाभार्थ्यांची संख्याही मर्यादित ठेवण्यात आली होती.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या सचिव शकुंतला गम्लीन, सहसचिव प्रबोध सेठ आणि इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


* * *

S.Pophale/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1631680) Visitor Counter : 23