रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

एनएचएआय ठरली बांधकाम क्षेत्रातली संपूर्णतः डिजिटल होणारी पहिली संस्था

Posted On: 12 JUN 2020 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2020


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या एनएचएआय,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, क्लाऊड वर आधारित आणि कृत्रिम बुद्धिमत्ता बळावरच्या बिग डाटा एनेलेटीक्स मंच- डाटा लेक आणि प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर सुरु करून मोठी सुधारणा आणली आहे. एनएचएआयचे संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापन कार्याचे मानवी कार्यातून ऑनलाईन पोर्टल आधारित कार्यात परिवर्तन झाले आहे. ‘वर्क फ्लो विथ टाईम लाईन’ आणि सतर्क यंत्रणा यासह  प्रकल्प अंमलबजावणीचे  संपूर्ण कार्य कॉन्फीगर करण्यात आले आहे. सर्व प्रकल्प दस्तावेजीकरण, कंत्राटविषयक निर्णय, मान्यता आता केवळ पोर्टल मार्फतच होतील.

अद्ययावत विश्लेषणासह डाटा लेक सॉफ्टवेअर, विलंब, संभाव्य तंटे वर्तवण्याबरोबरच आधीच इशारा देईल. अशाप्रकारे निर्णय घेण्याला गती देण्याबरोबरच, ही यंत्रणा मागच्या आकडेवारी आणि माहितीवर आधारित विविध पर्यायांचा वित्तीय परिणामही वर्तवणार असल्याने अचूक आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठीही मदत होणार आहे. यामुळे  तंटे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

एनएचएआयला मोठ्या प्रमाणात प्रलंबित लवाद प्रकरणांचा आणि मोठ्या रकमेच्या दावे आणि प्रतिदाव्यांचा इतिहास आहे. बरेच तंटे हे विना अडथळा जागा देण्यात विलंब, सोयी-सुविधांचे स्थलांतर, यंत्रसामग्री, साधन सामग्री, मनुष्यबळ कामाविना राहिल्यासाठीचे आकार देण्यातला विलंब, निर्णयाला विलंब अशा स्वरूपाचे असतात. डाटा लेक सॉफ्टवेअर मधे अशा सर्व मर्यादांची माहिती आणि तपासण्याची तरतूद असल्याने त्याचबरोबर काम दिलेल्या काळातच पारदर्शी पद्धतीने पूर्ण होईल याची सुनिश्चिती असल्याने तंटे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सर्व प्रक्रिया पोर्टल आधारित होणार असल्याने निर्णय प्रक्रिया  वेगाने होऊन परिणामी भविष्यात दाव्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण प्रकल्प दस्तावेज आणि पत्रव्यवहार डिजिटल स्वरुपात, जीआयएस ट्यांगिंग संलग्न आणि विशिष्ट प्रकल्प आयडीसह क्लाऊड बेस डाटा लेक मधे साठवला जाईल. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून आवश्यक असेल तेव्हा माहिती आणि आकडेवारी मिळू शकेल.

एनएचएआयच्या सर्व कंत्राटदार, सल्लगार, प्राधिकरण अभियंते, प्रकल्प संचालक, प्रादेशिक अधिकारी यांनी याचा विस्तृत वापर आधीच सुरु केला आहे. एनएचएआयचे ई - कार्यालय मोड्यूलही या यंत्रणेशी समन्वित करण्यात आले आहे यामुळे सर्व पत्रव्यवहार डिजिटली आणि संरक्षित पद्धतीने होणार आहे.

सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळात अनेक संस्थाना काम करताना आव्हानांना सामोरे जावे लागतअसताना एनएचएआय कर्मचारी त्यांचे काम परस्परांच्या नजीकच्या संपर्कात येण्याच्या भितीवाचून सुरु ठेवत आहेत. एनएचएआयने लॉक डाऊनच्या काळाचा उपयोग आपल्या कर्मचाऱ्यांना डाटा लेकच्या  वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी केला.

विलंब टाळणे, जलदगती निर्णय, तपशील गहाळ होण्याचा प्रश्नच नाही, कोणत्याही ठिकाणाहून काम यासारख्या फायदे डाटा लेक आणणार असून त्यामुळे एनएचएआयमधे क्रांतिकारी परिवर्तन घडणार आहे. प्रकल्पाशी सर्व सबंधिताना आणि अधिकाऱ्याना यासंदर्भातली प्रक्रिया पाहता येणार असल्याने यामुळे पारदर्शकता वाढणार आहे.


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631189) Visitor Counter : 240