पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

तेल निर्यातक राष्ट्र संघटनेच्या महासचिवांशी श्री.धर्मेंद्र प्रधान यांनी साधला संवाद, जागतिक ऊर्जासुरक्षेसाठी जबाबदारीने पावले उचलण्याचे केले आवाहन

Posted On: 04 JUN 2020 6:17PM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून OPEC म्हणजेच तेल निर्यातक राष्ट्र संघटनेचे महासचिव डॉ. मोहम्मद बार्किंडो यांच्याशी संवाद साधला. ऊर्जेच्या जागतिक बाजारपेठेतील सध्याच्या घडामोडी आणि कोविड-19 संकटकाळातील कच्च्या तेलाच्या किमतींविषयी यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या OPEC बैठकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली.

पेट्रोलियमचे उत्पादन आणि वापर करणाऱ्या देशांनी येत्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती विचारात घेऊन तिच्या पुनरुज्जीवनासाठी जबाबदार पावले टाकण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रधान यांनी केले. तेल बाजारपेठांना स्थैर्य आणण्यामध्ये OPEC ची भूमिका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या अडचणीच्या प्रसंगात भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी तसेच जगाच्या उर्जास्थिरतेसाठी OPEC देशांबरोबर एकत्रितपणे काम करण्यासही त्यांनीं मान्यता दिली.

भारताने कोविड-19 साथरोगाचा प्रतिकार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे तसेच देशात आर्थिक व्यवहार पुन्हा सुरु करण्यासाठी उचललेल्या पावलांचे, बार्किंडो यांनी यावेळी कौतुक केले.

 

S.Thakur/J.Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629389) Visitor Counter : 248