मंत्रिमंडळ

भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आयुष मंत्रालयांतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार

Posted On: 03 JUN 2020 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020

 

भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोगाची (PCIM&H) पुनःस्थापना करण्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हा आयोग आता, आयुष मंत्रालयांतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार असून त्यासाठी आज, 1975 पासून गाझियाबादमध्ये कार्यरत असणाऱ्या PLIM  अर्थात भारतीय औषधपद्धती औषधसूची प्रयोगशाळा आणि HPL अर्थात होमिओपॅथिक औषधसूची प्रयोगशाळा या दोन केंद्रीय प्रयोगशाळांचे त्यात विलीनीकरण करण्यात आले.

सध्या PCIM&H ही आयुष मंत्रालयांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. तीनही संस्थांच्या संबंधित पायाभूत सुविधा, तांत्रिक मनुष्यबळ, आणि आर्थिक संसाधने यांच्या व्यवहार्य आणि उचित उपयोजनाच्या उद्देशाने हे विलीनीकरण करण्यात आले आहे.  आयुर्वेद,सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे.

आयुष प्रकारच्या औषधांचे प्रमाणीकरण विकसित होण्यास, तसेच औषधसूची व सूत्रे प्रकाशित करण्यास याचा उपयोग होऊ शकणार आहे. विलीनीकरणानंतरच्या PCIM&H च्या रचनेला कायदेशीर दर्जा देण्याचाही उद्देश येथे ठेवण्यात आला आहे. आरोग्यसेवा महासंचालक, औषधीद्रव्य महानियंत्रक आणि आयुर्वेद-सिद्ध-युनानी औषधद्रव्य तांत्रिक सल्लागार मंडळ यांच्याशी याविषयी सल्लामसलत करण्यात आली आहे. तसेच, अर्थमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या व्यय विभागाने विलीनीकरण झालेल्या संस्थांच्या पदासोपानाविषयक प्रस्तावास मान्यता दिली आहे.

आतापर्यंत आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या PLIM आणि HPL ही दोन्ही दुय्यम कार्यालये व PCIM&H ही स्वायत्त संस्था- अशा या तीन संस्था आता समान प्रशासकीय नियंत्रणाखालील दुय्यम कार्यालय म्हणून काम करतील.

विलीनीकरणानंतर PCIM&H या संस्थेला सदर मंत्रालयांतर्गत पुरेशी व योग्य अशी प्रशासकीय रचना मिळणार असून औषधसूची निर्माण करण्याच्या कामासाठी क्षमताविकास करणे तसेच औषध- प्रमाणीकरण, बनावट औषधनिर्मितीवर नियंत्रण असे अनेक उद्देश यातून साध्य होणार आहेत.

 

S.Pophale/J.Waishampayan/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629113) Visitor Counter : 227