ऊर्जा मंत्रालय
नवीकरणीय ऊर्जा व्यवसायासाठी संयुक्त उद्योग कंपनी स्थापन करण्यासाठी एनटीपीसीचा ओएनजीसी बरोबर करार
नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, स्टोअरेज, ई-मोबिलिटी आणि ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि शासन) अनुरूप प्रकल्पांमध्ये नव्या संधी शोधणार
Posted On:
22 MAY 2020 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2020
ऊर्जा मंत्रालया अंतर्गत येणा-या ओएनजीसी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ आणि एनटीपीसी म्हणजेच राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ यांनी संयुक्तपणे नवीकरणीय ऊर्जा व्यवसायासाठी संयुक्त उद्योग कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला गती मिळू शकणार आहे.
एनटीपीसीचे वाणिज्यिक संचालक ए.के.गुप्ता आणि ओएनजीसीचे वित्त विषयक संचालक आणि प्रभारी व्यवसाय विकास विभागाचे प्रभारी सुभाष कुमार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. आभासी ‘काॅन्फरन्सिंग मोड’मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी एनटीपीसीचे सीएमडी गुरदीप सिंग, ओएनजीसीचे सीएमडी शशी शंकर तसेच दोन्ही कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते.
या सामंजस्य करारानुसार एनटीपीसी आणि ओएनजीसी मिळून भारतामध्ये आणि परदेशामध्ये ‘ऑफ शोअर’ पवन आणि इतर नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेसाठी असलेल्या संधींचा शोध घेणार आहेत. तसेच शाश्वत, स्टोअरेज, ई-मोबिलिटी आणि ईएसजी म्हणजेच पर्यावरण विषयक, सामाजिक आणि शासनाला अनुरूप प्रकल्पांच्या क्षेत्रामध्ये असलेल्या संधींचा शोध घेतील.
सध्या एनटीपीसीकडे त्यांनी स्थापन केलेले नवीकरणीय ऊर्जेचे 920 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प आहेत. तसेच आणखी 2300 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प निर्माणाधीन आहेत. या करारामुळे एनटीपीसाला आपल्याकडील नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवण्याच्या कार्याला वेग देता येणार आहे. तसेच ऑफशोअर पवन ऊर्जा आणि परदेशांमध्ये 32 जीडब्ल्यू नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचे महत्वाकांक्षी लक्ष्य वर्ष 2032 पर्यंत गाठण्यासाठी मदत होणार आहे.
ओएनजीसीकडे 156 मेगावॅट पवन ऊर्जा आणि 23 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जेचे असे मिळून 176 मेगावॅटचे नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांचे काम आहे. आता या करारामुळे ओएनजीसीची कार्यक्षमता वाढणार आहे. सन 2040पर्यंत 10 जीडब्ल्यू नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याइतकी क्षमता ओएनजीसीची असेल. एनटीपीसीच्या सहकार्याने एकूण 62110 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्यात आले आहेत. एनटीपीसीकडे एकूण 70 ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. त्यामध्ये 24 कोळशावर चालणारी तर 7 मध्ये संयुक्त साधनांचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. यासाठी वायू, प्रवाही-द्रव इंधन यांचा वापर केला जातो.13 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आहेत.
* * *
M.Jaitly/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626072)
Visitor Counter : 267