गृह मंत्रालय
देशभरात विविध ठिकाणी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याची नोंद
कोविड -19 रोखण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक ; मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासनाने सर्व आवश्यक पावले उचलावीत - गृह मंत्रालय
Posted On:
21 MAY 2020 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2020
कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तथापि, देशभरात विविध ठिकाणी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळले आहे. याची दखल घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे आणि मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर तसेच राज्य / केंद्रशासित प्रदेशातील सर्व अधिकाऱ्यांनी ते सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत यावर भर दिला
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आता गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध झोनचे वर्गीकरण करण्याचे आणि निर्बंध असलेल्या सेवांबाबत निर्णय घेण्याचे किंवा निर्बंधासह परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या झोनमध्ये प्रतिबंधित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यात काही उल्लंन्घन आढळल्यास कारवाई करणे आवश्यक आहे, असे त्यात नमूद केले आहे.
रात्री संचारबंदी काटेकोरपणे पाळण्याचे महत्त्व या पत्रात नमूद केले आहे, कारण यामुळे सामाजिक अंतर सुनिश्चित होईल आणि संसर्ग वाढण्याचा धोका कमी होईल. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने या आदेशांचे काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांची अंमलबजावणी करणे आणि लोकांकडून मास्कचा वापर , कामाच्या ,वाहतुकीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर सुनिश्चित करणे, स्वच्छता आदी सुनिश्चित करणे हे जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे याचा पुनरुच्चार या पत्रात करण्यात आला आहे.
अधिकृत पत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625909)
Visitor Counter : 206