Posted On:
17 MAY 2020 9:28PM by PIB Mumbai
देश लॉकडाऊन 3.0 च्या अंतीम भागात उभा असताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “आमच्या धोरणात्मक चिकाटीसह आपल्या देशाच्या कणखर नेतृत्वाने घेतलेल्या तडफदार आणि वेळेच्या आधीच घेतलेल्या उपाययोजनांचे प्रोत्साहनात्मक परिणाम दिसून आले आहेत. तर मागील 14 दिवसातील रुग्ण संख्या दुपटीचा काळ 11.5 होता, परंतु गेल्या तीन दिवसांत त्यात सुधारणा होऊन 13.6 झाला आहे.” ते पुढे म्हणाले की, मृत्यूचे प्रमाण 3.1 टक्के आहे आणि रोग्यांच्या बऱ्या होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून हा दर 37.5 टक्के आहे. त्यांनी असेही सांगितले की, (कालपर्यंत) आयसीयू मध्ये सक्रीय कोविड-19 चे 3.1 टक्के आणि व्हेंटिलेटरवर 2.7 टक्के आणि ऑक्सिजनवर 2.7 टक्के रुग्ण आहेत.
17 मे 2020 पर्यंत देशात एकूण 90,927 प्रकरणांची नोंद झाली असून त्यातील 34,109 लोक बरे झाले आहेत आणि 2,872 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 4,987 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे असे त्यांनी नमूद केले.
डॉ. हर्ष वर्धन यांनी अधोरेखित केले की, आपण आता दररोज 1,00,000 चाचण्या घेण्याची क्षमता विकसित केली असून देशातील 373 सरकारी प्रयोगशाळा आणि 152 खाजगी प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या केल्या जातात. कोविड-19 साठी आतापर्यंत 22,79,324 चाचण्या घेण्यात आल्या असून, कालपर्यंतच्या चोवीस तासात 90,094 नमुने घेण्यात आले आहेत. “आज अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, चंडीगड, लदाख, मेघालय, मिझोरम आणि पुडुचेरी अशी 8 राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या कोणत्याही प्रकरणाची नोंद झाली नाही. तसेच, दमण आणि दीव, सिक्कीम, नागालँड आणि लक्षद्वीपमध्ये अद्याप एकही प्रकरणाची नोंद नाही, ” असेही ते म्हणाले.
भारतातील कोविड-19 च्या नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर बोलताना डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की आतापर्यंत देशात कोविड-19 वर मात करण्यासाठी 1,80,473 खाटांची सुविधा असलेली 916 कोविड समर्पित रुग्णालये (अलगीकरण सुविधेच्या खाटा -1,61,169 आणि आयसीयू खाटा - 19,304) आणि 1,28,304 खाटांची सुविधा असलेली कोविड-19 समर्पित आरोग्य केंद्रे (अलगीकरण सुविधेच्या खाटा -1,17,775 आणि आयसीयू खाटा - 10,529), यासोबत 9536 विलगीकरण केंद्र आणि 5,64,632 खाटांची सुविधा असलेले कोविड सुश्रुषा केंद्र उपलब्ध आहेत. केंद्राने राज्य/केंद्रशासित प्रदेश/ केंद्रीय संस्थांना 90.22 लाख एन95 मास्क आणि 53.98 लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) पुरवली आहेत.
डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की, भारत सामान्य स्थितीत पूर्ववत येत असताना आपण किमान वीस सेकंदासाठी साबणाने हात धुणे किंवा अल्कोहोल बेस सेनेटिझिझर्स वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, कामाचे ठिकाण स्वच्छ करणे, टेबलाच्या पृष्ठभागासारखे वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग नियमित साफ करणे; स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी नेहमी फेस कव्हरचा वापर करणे यासारख्या सोप्या स्वच्छतेच्या उपायांचे पालन करत आहोत. ते म्हणाले की, शारीरिक अंतर ही आपल्यासाठी उपलब्ध असलेली सर्वात सामर्थ्यशाली लस आहे आणि म्हणूनच इतरांशी संवाद साधताना ‘दो गज की दुरी’ अर्थात सहा फुट अंतर राखणे आणि आभासी मेळाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संमेलनांचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली. आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा आणि संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
योग्य सावधगिरी बाळगून, सुरक्षित हाताळणी आणि अन्न शिजवल्याने कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यास मदत होईल. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कोविड-19 च्या दरम्यान अन्न-सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे ज्यामध्ये स्वच्छ पाण्यात कच्चे फळ आणि भाज्या धुणे; मांस पूर्णपणे शिजवणे; कच्चे मांस आणि शिजवलेल्या अन्नासाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड आणि चाकू वापरणे; एकमेकांची अन्नाची भांडी, पाण्याच्या बाटल्या किंवा कप वापरणे टाळा; विषाणूच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या ब्लीचने पृष्ठभाग स्वच्छ करणे या गोष्टींचा समावेश आहे.
महामारीच्या सुरवातीपासूनच दिल्या जाणाऱ्या निस्वार्थ सेवांबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी डॉक्टर, परिचारिका, एएनएम, अंगणवाडी कर्मचारी यासारख्या आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसोबतच रोगनिदानतज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैज्ञानिक आणि इतर कर्मचारी या सगळ्या कोरोना योद्धयांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांनी हे अधोरेखित केले की, आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावताना हे सर्व कोरोना योद्धे अत्यंत धोकादायक परिस्थितीत दिवस रात्र काम करत आहेत आणि म्हणूनच देशाने या आघाडीच्या आरोग्यसेवा प्रदात्यांना वाळीत न टाकता त्याच्या योगदानासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, कोविड-19 शी जोडले गेलेले कलंक दूर करण्यासाठी आम्ही लोकांना वेळेवर लक्षणे कळविण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत जेणेकरून देशातील रुग्णांच्या बऱ्या होण्याच्या प्रमाणात सुधारणा होण्यास मदत होईल. त्यांनी सर्व संनिरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे समर्पण आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि नागरिकांच्या सहाय्याने हा लढा सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले.
हा लढा देशातील प्रत्येकाच्या सहकार्यानेच जिंकला जाऊ शकतो, असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले. म्हणूनच त्यांनी आरोग्य-सेतू अॅप डाऊनलोड करण्याच्या महत्त्वावर भर दिला ज्यामुळे स्व-मुल्यांकन होण्यास मदत होते आणि कोविड -19 पॉझिटिव्ह प्रकरणांचे परीक्षण केले जाते.
याव्यतिरिक्त, त्यांनी कोविड-19 संदर्भातील चुकीची माहिती, अफवा आणि मिथक किंवा निराधार दाव्यांना बळी पडू नये असा इशारा दिला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आयसीएमआर, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालयाचे संकेतस्थळ आणि ट्विटर हँडलवर उपलब्ध अधिप्रमाणित माहिती वाचण्याचा सल्ला दिला.
कोविड-19 संबंधित तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्त्वे आणि सल्ले-सूचनांच्या अधिप्रमाणित आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया नियमितपणे https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA येथे भेट द्या.
कोविड-19 संबंधित तांत्रिक शंका technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva वर पाठवा.
कोविड -19 संबंधित काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी + 91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधा. कोविड-19 वरील राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर देखील उपलब्ध आहे.
*****
G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com