पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद

Posted On: 14 MAY 2020 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14  मे 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील  प्रतिसाद आणि या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक अभिनवता आणि विकास व संशोधनाबाबत जागतिक समन्वयाचे महत्त्व यावर चर्चा केली.

या आरोग्याच्या संकटाविरुद्ध लढा देण्यासाठी भारताने स्वीकारलेला जागरूक दृष्टीकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला जो योग्य संदेशाद्वारे जनतेचा सहभाग सुनिश्चित करण्यावर आधारित आहे. या लोक केंद्रित तळागाळापर्यंतच्या दृष्टिकोनाने शारीरिक अंतराला  मान्यता , आघाडीवर लढणाऱ्या आरोग्य कामगारांप्रति आदर, मास्कचा वापर , योग्य स्वच्छता राखणे आणि लॉकडाऊन तरतुदींचा आदर करायला कशी मदत झाली हे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून यापूर्वी हाती घेण्यात आलेले विकासात्मक उपक्रम उदा. आर्थिक समावेशकतेचा विस्तार, आरोग्य सेवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था  मजबूत करणे, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेच्या सवयी लोकप्रिय करणे, लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारताच्या आयुर्वेदिक ज्ञानाचा वापर यामुळे सध्याच्या साथीच्या रोगासंदर्भात भारताच्या प्रतिसादाची परिणामकारकता वाढविण्यात कशी मदत झाली.हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

कोविड -19 बाबत जागतिक पातळीवरील प्रतिसादात समन्वय साधण्यासह गेट्स फाउंडेशनतर्फे केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक भागांमध्ये करण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जगाच्या कल्याणासाठी भारताची क्षमता आणि सामर्थ्याचा अधिक चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल या संदर्भात त्यांनी गेट्स यांच्याकडून सूचना मागवल्या.

या संदर्भात दोन्ही मान्यवरांनी ज्या काही कल्पना मांडल्या त्यामध्ये ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्याच्या भारताच्या विशिष्ट मॉडेलमधून प्रेरणा घेणे, केंद्र सरकारने विकसित केलेल्या प्रभावी संपर्क शोध मोबाईल अ‍ॅपचा प्रसार करणे आणि याशिवाय भारताच्या विशाल औषधी क्षमतांचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घेणे आणि शोध लागल्यांनंतर लसींचे उत्पादन आणि औषधोपचार प्रमाणात वाढवणे यांचा समावेश होता. जागतिक स्तरावरील प्रयत्नांमध्ये विशेषत: विकसनशील मित्र देशांच्या हितासाठी योगदान देण्याची भारताची इच्छा आणि क्षमता लक्षात घेऊन साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी समन्वयाने सुरु असलेल्या जागतिक चर्चेत भारताचा समावेश होणे महत्वाचे आहे याबाबत उभयतांनी सहमती दर्शवली.

शेवटी पंतप्रधानांनी असेही सुचविले की  जीवनशैली, आर्थिक संघटना, सामाजिक वर्तन, शिक्षण आणि आरोग्यसेवा प्रसार यामध्ये कोविडनंतरच्या काळात उदयाला येतील अशा आवश्यक बदलांचे आणि तंत्रज्ञानात्मक आव्हानांचे विश्लेषण करण्यात गेट्स फाउंडेशन पुढाकार घेऊ शकतो. भारताला  स्वत:च्या अनुभवांच्या आधारे अशा विश्लेषणात्मक अभ्यासात हातभार लावायला आनंद होईल असे ते म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1624018) Visitor Counter : 255