आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी पंजाबच्या कोविड-19 व्यवस्थापनाची  तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला


“सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध”

Posted On: 13 MAY 2020 10:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि  कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्लीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीरसिंग सिद्धू  यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली.  विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री आणि रेड झोन आणि उच्च प्राधान्य जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याशी कोविड -१९ च्या व्यवस्थापनासाठीच्या तयारी आणि उपाययोजनांबाबत करत असलेल्या एकास एक चर्चेचा हा एक भाग आहे.

सुरुवातीलाच डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की 13 मे 2020 पर्यंत देशात एकूण 74,281  रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 24,386 लोक बरे झाले आहेत आणि 2,415 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत, 3,525 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 14 दिवसात रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा दर 11 होता , तो गेल्या तीन दिवसांत 12.6 पर्यंत सुधारला आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, मृत्यूचे प्रमाण 3.2% आहे आणि बरे होण्याचे प्रमाण 32.8%.आहे. ते म्हणाले की (कालपर्यंत) आयसीयूमध्ये 2.75% सक्रिय कोविड -19 रुग्ण आहेत, व्हेंटिलेटरवर  0.37% आणि ऑक्सिजन सहाय्यावर  1.89% रुग्ण आहेत. डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की देशात  352  शासकीय प्रयोगशाळा आणि 140 खासगी प्रयोगशाळांद्वारे चाचणी क्षमता  दररोज 1,00,000 चाचण्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकत्रितरित्या, कोविड -१९ साठी आतापर्यंत 18,56,477 चाचण्या घेण्यात आल्या आहेत, तर काल 94708 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. “आज अशी नऊ राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे गेल्या  24 तासांत कोविड -19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही. ही राज्ये आहेत अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, गोवा, छत्तीसगड, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोरम. तसेच, दमण आणि दीव, सिक्कीम, नागालँड आणि लक्षद्वीपमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळला नाही, ”असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की देशात कोविड -19 चा सामना करण्यासाठी आतापर्यंत 1,79,882 खाटा असलेली  (अलगीकरण खाटा - 1,60,610 आणि आयसीयू खाटा - 19,272)   900 समर्पित कोविड रुग्णालये  आणि 1,29,689 खाटा असलेली (अलगीकरण खाटा- 1,19,340 आणि आयसीयू खाटा - 10,3492,040)  समर्पित कोविड आरोग्य केंद्रे तसेच 8,708 विलगीकरण केंद्रे आणि 4,93,101खाटांसह 5,577  कोविड केअर सेंटर उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने 78.42 लाख N95 मास्क आणि  42.18  लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) राज्य, केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थाना उपलब्ध करुन दिली आहेत.

एनसीडीसीचे संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी राज्यातील कोविड -19 रुग्णांची स्थिती आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी संक्षिप्त सादरीकरण केले. 12 मे 2020 पर्यंत सर्व २२ जिल्हे कोविड-19 बाधित झाले असून एकूण 1913 रुग्ण आहेत. ३ जिल्हे (लुधियाना, जालंधर आणि पटियाला) रेड झोनमध्ये आणि १५ ऑरेंज झोनमध्ये आहेत.एकूण 43,999 नमुने गोळा करण्यात आले आहेत, ज्यात नमुना सकारात्मकतेचा दर 4.3% आहे. नांदेड हजूर साहिब येथून परत आलेल्यांना कोविड -19 ची लागण झाली असून  एकूण 4,216 बाधितांमध्ये त्यांची संख्या 1,225  आहे. राज्यात 20,521 स्थलांतरित मजूर परत येत असून ते राज्यासमोर  आणखी एक आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ हर्ष वर्धन यांनी बलबीर सिंह सिद्धू आणि  लुधियाना, अमृतसर, पटियाला तसेच जालंधर जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांबोरबर  कोविड-19 व्यवस्थापन आणि अन्य प्राधान्य मुद्द्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी लॉकडाउन उपायांचे काटेकोर पालन, सर्तकतेने करण्यात आलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्रातील सर्वांची तपासणी , लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक वस्तू आणि औषधे लोकांच्या घरी पोहचवणे यासारख्या उपाययोजनांची प्रशंसा केली.

डॉ हर्ष वर्धन म्हणाले की पंजाब राज्याने आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या कार्यान्वयनात उत्तम कार्य केले आहे. याचा उपयोग मधुमेहहाइपरटेंशन आणि तीन कर्करोग  (तोंड, स्तन, आणि गर्भाशय) ग्रस्त लोकांची तपासणी आणि व्यापक प्रमाणात समुदायाला  प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात करता येईल.

त्यांनी राज्याला सारी /आयएलआय स्क्रीनिंग मजबूत करणे आणि लसीकरण मोहीम , क्षयरोगी शोधणे आणि उपचार करणे, डायलिसिस रूग्णांसाठी रक्त संक्रमण, कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार, गर्भवती महिलांचे एएनसी यासारख्या बिगर -कोविड आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली. उपलब्ध आकडेवारीनुसार खाजगी आणि सार्वजनिक दवाखान्यांमध्ये क्षयरोगीमध्ये  घट झाल्याचे सूचित होत असल्याने राज्यानेही या क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे. वेतन  वेळेवर देणे आणि कामगिरीशी जोडलेले प्रोत्साहन हे आघाडीवरील आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोधैर्य वाढवेल याकडे लक्ष वेधतानाच राज्यांना वेळेत मोबदला जारी करण्याची विनंती केली. उत्तम देखरेख आणि उपयुक्त  वैद्यकीय हस्तक्षेपासाठी  परत आलेल्यां सर्वांना आरोग्य सेतू ऍप्प डाउनलोड करणे अनिवार्य केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.  राज्य हेल्पलाईन क्रमांक 104 बद्दल जागरूकता वाढविणे आवश्यक आहे आणि कॉल सेंटरची संख्या देखील एनएचएम अंतर्गत वाढविली जाऊ शकते. देशभरातील कॉल सेंटर एजंट्सना कोविड -१९ रूग्ण, आरोग्य कर्मचारी आणि बरे झालेल्या रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे प्रशिक्षण दिले आहे, म्हणूनच त्यांच्या सेवाही या उद्देशाने वापरल्या जाऊ शकतात.

आरोग्य राज्यमंत्री म्हणाले कि लॉकडाउन दरम्यान ओपीडी सेवा सुरु होत्या आणि बिगर कोविड रुग्ण सेवा देखील सुरु होती. घरोघरी देखरेखीच्या माध्यमातून  6,58,000 लोकांची तपासणी झाली आहे.  पंजाब ने स्वतःचा डैशबोर्ड विकसित केला आहे जो एक हीट मैप निर्माण करतो. ज्याचा वापर प्रभावी नियंत्रण उपायांसाठी केला जातो. सिद्धू म्हणाले कि नांदेड़ साहेब येथून परत आलेल्या सर्व भाविकांची तपासणी करण्यात अली असून त्यांना विलगीकरणात ठेवले आहे.

या बैठकीत विशेष अधिकारी (आरोग्य आणि कुटुंब कल्याण) राजेश भूषण, संयुक्त सचिव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) डॉ मनोहर अगनानी, डीजीएचएस डॉ राजीव गर्ग आणि  केंद्र तसेच राज्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.

****

S.Thakur/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1623802) Visitor Counter : 205