सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

किरकोळ विक्रेते आणि इमारत व बांधकाम व्यावसायिकांनी एमएसएमई म्हणून नोंदणी करण्याच्या विनंतीचे परीक्षण केले जाईल : गडकरी


अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ आणि नगर रचनाकार यांना गर्दी असलेल्या शहरांमध्ये विसंकुलक आणि आयातीला पर्याय शोधण्याचे आवाहन

Posted On: 09 MAY 2020 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9  मे 2020

केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भारतीय किरकोळ विक्रेते संघ आणि सराव अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ आणि नगर रचनाकार (भारत) संघ यांना आश्वासन दिले की, एमएसएमई म्हणून नोंदणी करण्याच्या त्यांच्या विनंतीचे त्वरित परीक्षण केले जाईल. या संस्थांना रोजगारनिर्मिती आणि विमा, वैद्यकीय लाभ, निवृत्ती वेतन इत्यादी विविध लाभ कामगारांना देता येतील की नाही या दृष्टीकोनातून याचा शोध घेण्याची गरज आहे.

त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना घरपोच सामान पोहोचवण्याच्या पर्यायाचा विचार करण्याचे आणि ग्राहक/कामगारांसाठी सॅनिटायझर्सची उपलब्धता आणि शारीरिक अंतराच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन तसेच सर्व किरकोळ विक्री दुकानांमध्ये मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

 मंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारतीय किरकोळ विक्रेते संघ आणि सराव अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ आणि नगर रचनाकार (भारत) संघ यांच्या प्रतिनिधींसोबत कोविड-19 चा  त्यांच्या क्षेत्रावर झालेल्या परिणामांविषयी चर्चा केली. चर्चे दरम्यान, प्रतिनिधींनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे त्यांना सामना कराव्या लागत असलेल्या विविध आव्हानांसंबंधी चिंता व्यक्त केली तसेच काही सूचना देखील केल्या आणि या क्षेत्राचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी सरकारकडे पाठबळाची विनंती देखील केली.

त्यांनी अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ आणि नगर रचनाकार यांना गर्दी असलेल्या शहरांमध्ये विसंकुलक शोधण्याचे आणि ग्रामीण, आदिवासी आणि मागासलेल्या प्रदेशातील विकासामध्ये विशेषतः याभागातून जाणाऱ्या नवी दिल्ली-मुंबई द्रुतगतीमार्ग यासारख्या हरित द्रुतगती मार्गांच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, या महत्वाकांक्षी प्रकल्पात क्लस्टर आणि लॉजिस्टिक पार्क सारख्या अनेक संधी उपलब्ध होतील.

यावेळी काही प्रमुख मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आणि किरकोळ विक्रेते / उपहारगृहे / वास्तुविशारद संस्थाची एमएसएमई म्हणून नोंदणी करणे, कोविड-19 संबंधित सुरक्षा उपायांच्या अटींसह मॉल सुरू करणे, अनावश्यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स कंपन्यांचे कामकाज सुरू करणे, किरकोळ विक्रेत्यांना भाड्यात सूट, विलंब शुल्कात 9 महिन्यांपर्यंत मुदतवाढ, बँक व्याजदरामध्ये 10% वरून 4-5% कपात करणे, खासगी बँकांनी आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, केवळ प्राप्तिकांवर जीएसटी लागू करणे व रेरा कायद्यांतर्गत अगोदरच नोंदणी असणार्या बांधकाम व्यावसायिकांची एमएसएमई म्हणून नोंदणी करणे इत्यादी विषयांवर सूचना देण्यात आल्या.

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उद्योगांनी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे अआव्हान गडकरी यांनी केले. त्यांनी पीपीई (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) वापरण्यावर भर दिला आणि कामकाजादरम्यान सामाजिक अंतरांचे निकष पाळण्याचा सल्ला दिला.

त्यांनी असे नमूद केले की सर्व भागधारकांनी लोकांचे जीवन व उदरनिर्वाह सुनिश्चित करताना या संकटावर मात करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. या संकटातून बाहेर येण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक दृष्टीकोनाचा अवलंब करावा असे आवाहन गडकरी यांनी केले.

निर्यात वाढीकडे विशेष लक्ष देणे हि सध्या काळाची गरज आहे आणि जागतिक बाजारपेठेत आपली स्पर्धात्मकता वृद्धिंगत करण्यासाठी वीज, लोजीस्टिक आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब केला पाहिजे यावर केंद्रीय मंत्र्यांनी जोर दिला. पुढे त्यांनी असेही नमूद केले की परदेशी आयातीला देशांतर्गत उत्पादनासह बदलण्यासाठी आयात पुनर्स्थापनेवर भर देण्याची गरज आहे.

त्यांनी पुढे नमूद केले की हरित द्रुतगती महामार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्कमध्ये भविष्यात गुंतवणूक करण्याची उद्योगासाठी ही उत्तम संधी आहे. मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर भागात औद्योगिक क्लस्टरची क्षितिजे वाढविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि उद्योगांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

जपान सरकारने आपल्या उद्योगांना चीनमधून जपानी गुंतवणूक काढून इतरत्र हलविण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे याचा मंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, भारतासाठी ही एक चांगली संधी आहे जी आपण मिळवली पाहिजे.

गडकरी यांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सरकार शक्य ती सर्व मदत करेल असे आश्वासन दिले. संबंधित विभागांकडे हे प्रश्न वर्ग केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. उद्योगांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा आणि कोविड-19 चे संकट संपल्यानंतर निर्माण होणाऱ्या संधीचे सोने करावे यावर गडकरी यांनी जोर दिला.

 

M.Jaitly/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1622569) Visitor Counter : 240