सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

2019-20 मध्ये खादी आणि ग्रामोद्योगांची उलाढाल सुमारे 90,000 कोटी रुपये

Posted On: 08 MAY 2020 8:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 मे 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षांत भारतात  "खादी ब्रॅण्डला" व्यापक प्रमाणावर  मान्यता प्राप्त झाली आहे. शाश्वत विकासाचे सर्वात पर्यावरणपूरक असलेले खादीचे उत्पादन गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाले आहे, म्हणजेच सन 2015-16 पासून याच काळात खादीची विक्री जवळपास तीन पट वाढली आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण उद्योग क्षेत्रातही गेल्या पाच वर्षात उत्पादन व विक्री जवळपास 100% वाढली आहे.

गेल्या एक वर्षातील कामगिरीकडे पाहता खादीची उलाढाल 2018-19 मध्ये 3215.13 कोटी रुपये होती ती 2019-20 मध्ये  31 टक्क्यांनी वाढून 4211.26 कोटी रुपये झाली. ग्रामीण उद्योग उत्पादनांची उलाढाल 2018-19 च्या 71,077 कोटी रुपयांच्या तुलनेत 19% ने वाढून 2019-20, मध्ये  84,675.39 कोटी रुपये झाली.

सन 2019-20 मध्ये खादी व ग्रामोद्योगांची एकूण उलाढाल तब्बल 88,887 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

खादीच्या अभूतपूर्व विकासाचे श्रेय, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दिले असून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या सर्जनशील विपणन कल्पना तसेच विविध मंत्रालयांच्या सक्रिय पाठिंब्याला दिले आहे.

"खादी उद्योगास पुनरुज्जीवित करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि खादीचा वापर दैनंदिन जीवनाची आवश्यकता म्हणून स्वीकारण्यासाठी  "मन की बात" या रेडिओवरील संवादासह विविध व्यासपीठांवरून पंतप्रधानांनी वारंवार केलेल्या आवाहनामुळे खादीच्या विकासाचा मार्ग सुकर झाला असे सक्सेना यांनी सांगितले.

आकडेवारीनुसार खादीचे उत्पादन जे 2015-16 मध्ये 1066 कोटी रुपये होते ते 2019-20 मध्ये 115 % वाढून 2292.44 कोटी रुपये झाले. दुसरीकडे खादीची विक्री आणखी उंचावली. खादी फॅब्रिक उत्पादनांची 2015 -16 मध्ये 1510 कोटी रुपये असलेली विक्री 179% वाढून 2019-20 मध्ये 4211.26 कोटी रुपये झाली.

तर ग्रामीण उद्योगांचे उत्पादन 2015-16 मध्ये 33,425 कोटी रुपये होते ते 2019-20 मध्ये 96 % वाढून  65,393.40 कोटी रुपये झाले. ग्रामीण उद्योग उत्पादनांची विक्री 2015-16 मध्ये  40,385 कोटी रुपये होती ती 2019-20 मध्ये 110% वाढून 84,675.39 कोटी रुपये झाली.

खादी परिधानांव्यतिरिक्त, सौंदर्यप्रसाधने, साबण आणि शॅम्पू, आयुर्वेदिक औषधे, मध, तेल, चहा, लोणचे, पापड, हॅन्ड सॅनिटायझर्स, मिष्ठान्न, खाद्यपदार्थ आणि चामड्याच्या वस्तू अशा विपुल श्रेणीतील ग्रामीण उद्योग उत्पादनांनी देश-विदेशातील ग्राहकांना आकर्षित केले आहे. यामुळे पाच वर्षात ग्रामीण उद्योग उत्पादनांचे उत्पादन व विक्री जवळपास दुपटीने वाढली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, एअर इंडिया, आयओसी, ओएनजीसी, आरईसी आणि इतर सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, महाविद्यालये, विद्यापीठे, भारतीय रेल्वे आणि आरोग्य मंत्रालय आदींसह राज्य सरकारकडून समर्थन मिळण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही, ग्रामीण उद्योग क्षेत्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मधमाशी पालन, कुंभारकाम व बेकरी या क्षेत्रात उत्कृष्ट क्षमता असणार्‍या 150 हून अधिक उत्पादनांमध्ये अभिमानास्पद कामगिरी करेल.

****

B.Gokhale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622242) Visitor Counter : 198