संरक्षण मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी लढाईत एनसीसीच्या योगदानाचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा

Posted On: 05 MAY 2020 6:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यात राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) योगदानाचा आढावा घेतला. ही अशी पहिलीच परिषद आहे ज्यात संरक्षण मंत्र्यांनी देशभरातील 17 एनसीसी संचलनालयांसोबत थेट संवाद साधला. या परिषदेत एनसीसी महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा, आणि संरक्षण सचिव अजय कुमार देखील सहभागी झाले होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात संरक्षण मंत्री म्हणाले की, देश सध्या आव्हानात्मक काळातून जात आहे आणि कोविड-19 वर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. या संकटावर मात करत देश नक्की विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी 25 टक्के मुलींच्या सहभागासह 60 हजारांहून अधिक एनसीसी कॅडेट्स स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत; राजनाथ सिंह यांनी एनसीसी संचलनालयांच्या या महत्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली.

एनसीसी कॅडेट्स लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, जीवनावश्यक वस्तू, औषधे यांच्या पुरवठ्याची खात्री, वाहतूक नियंत्रण इत्यादी कामे करत आहेत. काही कॅडेट्स सोशल मीडियासाठी शैक्षणिक व्हिडीओ तयार करत आहेत तर काही मास्क तयार करून स्थानिक पातळीवर त्यांचे वितरण करत आहेत. त्यांच्या स्तुत्य भूमिकेचे कौतुक करताना संरक्षण मंत्र्यांनी, एनसीसी कॅडेट्सना प्रशिक्षण देण्यात आलेल्या कामांसाठीच नियुक्त करण्याच्या सूचना देखील दिल्या.

आढावा बैठकीत राजनाथ सिंह यानी जाहीर केले की, सरकारने एनसीसीचा विस्तार करण्याचा निश्चय केला असून किनारपट्टी आणि सीमा भागात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवीन आणि बदलत्या काळाशी सुसंगत होण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी एनसीसीच्या आधुनिकीकरणावर जोर दिला. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सत्र पद्धतीशी एनसीसी उपक्रम सुसंगत करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

एनसीसी संचलनालयाचे एडीजी आणि डीडीजी यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याच्या अनोख्या संधीबद्दल संरक्षण मंत्र्यांचे एकमताने आभार मानले आहेत आणि त्यांचे संबंधित संचलनालय कोविड-19 विरुद्धच्या लढाईत देत असलेल्या योगदानाची त्यांनी माहिती दिली.

कॅडेट्सचे मनोबल खूपच उच्च आहे आणि त्यांच्या योगदानाचे नागरिक व प्रशासन या दोघांकडून कौतुक होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

***

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1621220) Visitor Counter : 360