पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 संदर्भात अलिप्त राष्ट्रगट चळवळीच्या समूह गटाच्या  व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 04 MAY 2020 11:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 मे 2020

 

अध्यक्ष महोदय,

महामहीम,

ही आभासी परिषद आयोजित केल्याबद्दल मी महामहिम अध्यक्ष इलहम अलीयेव यांचे आभार मानतो. सर्वप्रथम मी  कोविड -19 मुळे जगभरात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रति संवेदना व्यक्त करतो.

आज मानवतेला अनेक दशकांमधील सर्वात गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. यावेळी, अलिप्त राष्ट्रगट चळवळ (एनएएम) जागतिक एकता वाढवण्यात मदत करू शकते. अलिप्त राष्ट्रगट चळवळ नेहमीच जगाचा नैतिक आवाज राहिला आहे. ही भूमिका कायम ठेवण्यासाठी एनएएमला  सर्वसमावेशक राहायला हवे.

 

महामहीम,

एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश लोक भारतात राहतात.  भारत हा विकसनशील देश आणि मुक्त समाज आहे. या संकटकाळात, आम्ही दाखवून दिले आहे की लोकशाही, शिस्त आणि निर्णयक्षमता एकत्र येऊन लोकांची खरी चळवळ कशी निर्माण  केल्या जाते.

भारताची संस्कृती संपूर्ण जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहते. आम्ही आमच्या स्वतःच्या नागरिकांची काळजी घेत आहोत, त्याचप्रमाणे आम्ही इतर देशांना देखील मदत करत आहोत. कोविड -19 चा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या कोविड-19चा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या शेजारी देशांबरोबर समन्वय वाढवला आहे आणि आम्ही अनेक देशांबरोबर भारताचे वैद्यकीय कौशल्य सामायिक करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करत आहोत. जगातील एक फार्मसी म्हणून विशेषतः परवडणार्‍या औषधांसाठी भारताकडे पाहिले जाते.

आमच्या स्वतःच्या गरजा असूनही आम्ही एनएएमच्या 59 सदस्यांसह 123 पेक्षा अधिक भागीदार देशांना वैद्यकीय पुरवठा सुनिश्चित केला आहे.

आम्ही उपाय आणि लस विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नात सक्रिय आहोत. भारतात जगातील सर्वात प्राचीन वनौषधी -आधारित पारंपारिक औषध प्रणाली आहे. लोकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवायला  मदत करण्यासाठी आम्ही  सोपे आयुर्वेदिक घरगुती उपचार मोकळेपणाने सामायिक केले आहेत.

 

महामहीम,

जग कोविड -19शी लढत असतानाही, काही लोक इतर प्राणघातक विषाणू  पसरवण्यात व्यस्त आहेत.  उदा. दहशतवाद .

खोट्या बातम्या आणि समाज तसेच देशांमध्ये फाळणी करण्यासाठी तयार केलेले व्हिडिओ. पण आज मी फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.

या आरोग्य संकटाशी लढण्यासाठी जगाला मदत करण्यासाठी आम्ही एक चळवळ म्हणून एकत्र काय करू शकतो.

 

महामहीम,

कोविड-19 ने आम्हाला विद्यमान आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मर्यादा दाखवली आहे.  कोविडनंतरच्या काळात  जगात आपल्याला निष्पक्षता , समानता आणि मानवतेवर आधारित जागतिकीकरणाच्या नवीन साच्याची आवश्यकता आहे.

आपल्याला अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची आवश्यकता आहे ज्या आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. आपल्याला केवळ आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करायचे नाही तर मानवी कल्याणासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भारताने बर्‍याच काळापासून अशा प्रकारच्या उपक्रमांना समर्थन दिले आहे.

जसे की, संपूर्ण मानव जातीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन, आपल्या पृथ्वीला हवामान बदलांच्या आजारापासून बरे करण्यास मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी , हवामान आणि आपत्तीच्या जोखमीपासून आपले रक्षण करण्यासाठी आपत्तिरोधक संरचना आघाडी इत्यादी .

बरेच देश लष्करी कवायती आयोजित करतात. परंतु भारताने आपल्या प्रदेशात आणि त्याही पलीकडे आपत्ती व्यवस्थापन कवायती आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

महामहीम,

एनएएमने आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि जागतिक आरोग्य संघटनेला  विकसनशील देशांमध्ये आरोग्य-क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. आपण आरोग्य उत्पादने आणि तंत्रज्ञानामध्ये सर्वाना समान, किफायतशीर आणि वेळेवर प्रवेश सुनिश्चित केला पाहिजे.

आपले अनुभव, उत्तम पद्धती, आपत्ती -व्यवस्थापन प्रोटोकॉल, संशोधन आणि संसाधने एकत्र आणण्यासाठी आपण सर्व एनएएम देशांसाठी एक व्यासपीठ विकसित केले पाहिजे.

 

महामहीम,

आपल्या  चळवळीच्या संस्थापक भावनेने आज आपण एकत्र येण्याचे उद्दीष्ट ठरवूया, वेगळे होण्याचा विचारही करायला नको. आपल्यातील प्रत्येकजण एकत्र आला तर साथीच्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. सर्वसमावेशक आणि सहकारी जागतिक प्रतिसादासाठी आपण भागीदार म्हणून काम करूया.

धन्यवाद.

धन्यवाद महामहिम.

***

B.Gokhale/ S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621136) Visitor Counter : 245