आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 व्यवस्थापनासाठी मध्यप्रदेशची तयारी आणि प्रतिबंधात्मक उपायांचा हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.
केंद्राकडून राज्याला संपूर्ण पाठिंब्याची हमी तसंच कोविड 19 बाधित नसलेल्या जिल्ह्यांमध्येही सखोल सर्वेक्षणावर भर देण्याची सूचना.
Posted On:
04 MAY 2020 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2020
कोविड 19 व्यवस्थापनासाठी टप्प्याटप्प्याच्या क्रमाने, पूर्वनियोजनानुसार आणि संपूर्ण तयारीनिशी भारत सरकार, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयाने, तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर भर देत आहे. या तयारीचा नियमितपणे वरिष्ठ पातळीवर आढावा घेतला जातो.
मध्यप्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह मध्यप्रदेशचे आरोग्य मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीला केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“राज्यातल्या काही जिल्ह्यातील covid-19 मृत्युदर हा राष्ट्रीय सरासरी मृत्यू दरापेक्षा जास्त असणे दुःखद आहे”, असे यावेळी हर्षवर्धन म्हणाले. मृत्यूदर कमी करण्यासाठी योग्य तपासण्या, सखोल सर्वेक्षण आणि वेळेवर रोगनिदान ह्या अत्यावश्यक बाबी असून त्यावर राज्याने भर देण्याची गरज असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. नव्याने रुग्ण संख्या वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक, आक्रमक आणि सर्वंकष उपायोजना पद्धतशीरपणे राबवणे आणि केंद्राने घालून दिलेल्या निर्बंधांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांमध्ये विषाणू बाधेने अद्याप शिरकाव केलेला नाही. तेथे रुग्ण शोधण्यावर भर देणे, सर्वेक्षण आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असणारे किंवा फ्ल्यू सारखे आजार असणाऱ्या रुग्णांच्या तपासणीवर भर दिल्यास या भागांमध्ये आजाराचा शिरकाव रोखण्यास मदत होईल. हातांची स्वच्छता सोशल डिस्टन्सिंग यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांसंबंधी जागरूकता निर्माण करणे तसंच यासंबंधी जनतेत असलेली भिती दूर करण्यासाठी वॉर्ड पातळीवर स्वयंसेवक नेमावे अश्या सूचनाही त्यांनी केल्या.
तातडीच्या तसेच दूरगामी उपाययोजनांसाठी आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी म्हणून राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल अशी हमी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याने प्राधान्यक्रमाने संसर्गजन्य नसला तरीही काही आजार असलेल्या 65 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची तपासणी करायला हवी अशी सूचना हर्षवर्धन यांनी दिली.
covid-19 संबंधित यंत्रणा राबवताना राज्यातल्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन मोहीम (NTEP) किंवा प्रसूती आणि बालक आरोग्य, डायलिसेस, केमोथेरपी, लसीकरण यासारख्या इतर आरोग्यसंबधित यंत्रणांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील धोक्याची रूपरेषा ठरवण्यासाठी राज्यांकडे उपलब्ध असलेल्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची (HMIS) माहिती वापरून व्यवस्थापन करावे अशीही सूचना त्यांनी केली.
सार्थक आणि आरोग्य सेतू एप्लीकेशनच्या परिणामकारक वापराबद्दल इंदोर व्यवस्थापन आणि आरोग्य अधिकाऱ्यांना हर्षवर्धन यांनी शाब्बासकी दिली.
प्रीती सुदान, सचिव (HFW), राजेश भूषण OSD (HFW), संजीवा कुमार, विशेष सचिव (आरोग्य), वंदना गुरनानी AS & MD(NHM), विकास शील, संयुक्त सचिव, मनोहर अगनानी, संयुक्त सचिव एस के सिंग, संचालक NCDC तसंच मुख्य सचिव मध्यप्रदेश राज्य, एम्स संचालक भोपाळ, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा कलेक्टर आणि डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट या बैठकीला हजर होते.
* * *
G.Chippalkatti/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621024)
Visitor Counter : 222