पंतप्रधान कार्यालय

संरक्षण आणि अवकाश क्षेत्राला चालना देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बैठक

Posted On: 30 APR 2020 11:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020

 

भारतातील संरक्षण उद्योग क्षेत्र अधिक गतिमान आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी काय सुधारणा आवश्यक आहेत, यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत बैठक झाली. या उद्योगात आवश्यक ते बदल करुन भारतीय संरक्षण दलांच्या सध्याच्या आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करणे आणि कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर,अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या योजना यावर या बैठकीत भर देण्यात आला. यात आयुध निर्माण कारखान्यांच्या कामात सुधारणा आणणे, खरेदी प्रक्रिया सुरळीत करणे, संशोधन आणि संरक्षणाला प्रोत्साहन, संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे यावर प्रामुख्याने चर्चा झाली.  

संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात, जागतिक पातळीवर भारताला पहिल्या स्थानी पोहचवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. संरक्षण आयुधे आणि उपकरणांची रचना ते उत्पादन या सर्व क्षेत्रात अव्वल स्थान मिळवत, सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्रित काम करुन, स्वयंपूर्ण होणे आणि निर्यात वाढवणे ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काम करायला हवे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीच्या प्रस्तावित सुधारणांचा त्यांनी आढावा घेतला.

संरक्षण क्षेत्रावर होणारा खर्च कमी करुन हा पैसा राजनैतिक संरक्षण भांडवल हस्तांतरणासाठी वापरता येईल का यावरही या बैठकीत चर्चा झाली.संरक्षण सामुग्री खरेदी, ऑफसेट धोरण, विविध सुटे भाग देशात तयार करणे, तंत्रज्ञान हस्तांतरण, जागतिक पातळीवरील मूळ उपकरण उत्पादन कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी आकर्षित करणे, आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवणे, इत्यादींवर देखील चर्चा झाली. संरक्षण उत्पादन क्षेत्रात, जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठी, आपल्याला निर्यातमालाची गुणवत्ता आणि दर्जेदार उपकरणे / व्यवस्था तयार कराव्या लागतील यावरही या बैठकीत चर्चा झाली.

भारताने आता आयातीवरील अवलंबित्व कमी करुन, “मेक इन इंडिया’ उपक्रमाला पुढे न्यावे, असे निर्देश पंतप्रधान म्हणाले. संरक्षण आयुधांची रचना, आयुधे विकसित करणे आणि उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जावे. तसेच, संरक्षण उत्पादनांची निर्यात आणि जागतिक पुरवठा साखळीत सहभाग वाढवणे यावरही त्यांनी भर दिला. संरक्षण क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन देणारे वातावरण देशात निर्माण करायला हवे, असे ते म्हणाले.

या बैठकीला, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1619923) Visitor Counter : 226