शिक्षण मंत्रालय

कोविड-19 आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि शिक्षणविषयक दिनदर्शिका याविषयी UGC कडून विद्यापीठांसाठी मार्गदर्शक सूचना


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शक सूचना केल्या जारी

Posted On: 29 APR 2020 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29  एप्रिल 2020

 

कोविड-19 साथरोग आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने, शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने परीक्षा व शैक्षणिक दिनदर्शिका यांविषयी विचारविनिमय करून शिफारशी करण्यासाठी एका समितीची नेमणूक केली होती.

UGC चे माजी सदस्य व हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.आर.सी. कुहाड यांनी या समितीचे अध्यक्षपद भूषविले.

दि. 27.4.2020 रोजी आयोगाने एक बैठक घेऊन या समितीचा अहवाल स्वीकारत परीक्षा व शैक्षणिक दिनदर्शिका याविषयीच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी दिली.

या मार्गदर्शक सूचनांपैकी प्रमुख शिफारशी पुढीलप्रमाणे-

  1. मध्य सत्र (Intermediate Semester) विद्यार्थी- चालू सत्र आणि याआधीचे सत्र यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनानुसार  विद्यार्थ्यांना   श्रेणी दिली जाईल. ज्या राज्यांमध्ये कोविड-19 संबंधाने परिस्थिती सुरळीत झाली असेल तेथे जुलै महिन्यात परीक्षा होतील.
  2. सत्रान्त (Terminal Semester) विद्यार्थी -परीक्षा  जुलै महिन्यात  होतील.
  3. प्रत्येक विद्यापीठात एक कोविड-19 तुकडी स्थापन केली जाईल आणि परीक्षा आणि शैक्षणिक दिनदर्शिका याविषयीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे अधिकार तिच्याकडे असतील.
  4. UGC मध्ये जलद निर्णयप्रक्रियेसाठी एक कोविड-19 तुकडी स्थापन केली जावी.

या मार्गदर्शक सूचनांपैकी ठळक मुद्दे असे-

या मार्गदर्शक सूचना 'सल्लास्वरूप' आहेत.

कोविड-19 संबंधीचे मुद्दे व प्रश्न लक्षात घेऊन विद्यापीठ स्वतःची कृतियोजना तयार करू शकते.

व्यक्ती- व्यक्तीमधील उचित सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेतली जावी.

परीक्षा कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठे पर्यायी व सोप्या परीक्षापद्धतीचा अवलंब करू शकतात.  

परीक्षाकाल तीन (3) तासावरून दोन ( 2 )तासांवर आणून विद्यापीठे अभिनव परीक्षापद्धतीचा अवलंब करू शकतात.

विद्यापीठे त्यांच्या नियम व अटींच्या अधीन राहून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सत्रान्त किंवा सत्रमध्य परीक्षा घेऊ शकतात. मात्र यामध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्याची खबरदारी घेतली गेलीच पाहिजे. तसेच विद्यापीठांना उपलब्ध असणारी संसाधने व सर्व विद्यार्थ्यांना न्याय्य संधी, यांचाही विचार त्यामध्ये झाला पाहिजे.

पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी वर्षान्त किंवा सत्रान्त परीक्षा शैक्षणिक दिनदर्शिकेत सुचविल्यानुसार घेता येतील. परिक्षेच्या वेळा विद्यापीठांनी ठरवाव्यात व सामाजिक अंतराचे पालन होईल अशा रीतीने परीक्षा घेण्यात याव्यात.

सत्रमध्य विद्यार्थ्यांसाठी, विद्यापीठांनी त्यांची तयारी, विद्यार्थ्यांची निवासविषयक स्थिती आणि विविध भागातील कोविड-19 साथीचे प्रमाण अशा मुद्यांच्या आधारे निर्णय घेऊन परीक्षा घ्याव्यात.

कोविड-19 मुळे  उद्भवलेली स्थिती मूळपदावर आली नसेल तर, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सामाजिक अंतराचे नियम यांचा विचार करून श्रेणी देताना 50% गुण  अंतर्गत मूल्यमापनानुसार व उर्वरित 50% गुण आधीच्या सत्रानुसार देता येतील.

आधीच्या सत्र/ वर्षाचे गुण उपलब्ध नसतील, खासकरून वार्षिक परीक्षा प्रकारचे पहिलेच वर्ष असेल, तर संपूर्ण मूल्यमापन अंतर्गत मूल्यांकनानुसारच करता येईल.

विद्यार्थ्यास आपली श्रेणी सुधारावयाची असल्यास पुढच्या सत्रात अशा विषयाच्या खास परीक्षेला बसता येईल.

सत्रामध्ये सत्रपरीक्षेची ही तरतूद केवळ सध्याच्या शैक्षणिक वर्षापुरतीच (2019-20), कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उपलब्ध असेल.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थी किंवा संशोधकांनी उपस्थिती लावली, असे धरता येईल.

प्रकल्प संशोधन करणाऱ्या पदव्युत्तर किंवा पदवीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठे, प्रयोगशाळेतील संशोधनाऐवजी तसेच क्षेत्रीय सर्वेक्षणाऐवजी अहवालावर किंवा दुय्यम माहितीवर आधारित अथवा सॉफ्टवेअरच्या मदतीने करण्याचे प्रकल्प देऊ शकतात.

प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा (व्हायवा) घेण्यासाठी स्काईप किंवा अन्य ऍप चा उपयोग विद्यापीठांना करता येईल. तर सत्रमध्य परीक्षांबाबत, पुढच्या सत्रात त्या परीक्षा घेता येतील.

Ph.D. आणि M. Phil च्या तोंडी परीक्षा गूगल, स्काईप, मायक्रोसॉफ्ट टेकनॉलॉजिस किंवा अन्य एखाद्या विश्वासार्ह आणि परस्परांना सोयीस्कर अशा विडिओ कॉन्फरन्सिंगच्या तंत्राने घेता येतील.

Ph.D.आणि M. Phil च्या विदयार्थ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ.

कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांबद्दल भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता प्रत्येक विद्यापीठ एका तुकडी स्थापन करेल, व विद्यार्थ्यांना त्याची व्यवस्थित माहिती  दिल्या जाईल.

शैक्षणिक दिनदर्शिका

शैक्षणिक वर्ष 2019-2020 साठी पुढील दिनदर्शिका सुचविण्यात येत आहे.

सदर शैक्षणिक दिनदर्शिका सल्लात्मक आहे. विद्यापीठांनी त्यांची सज्जता, विद्यार्थ्यांची निवासविषयक स्थिती, त्यांच्या भागातील कोरोना साथीची स्थिती वगैरे मुद्द्यांवर विचार करून तिचा अवलंब करावा.

सम सत्राचा (even semister) प्रारंभ

01.01.2020

वर्गांना स्थगिती

16.03.2020

ऑनलाईन शिक्षण / दूरस्थ शिक्षण / समाजमाध्यमे / इ-मेल / विडिओ कॉन्फरन्सिंग / मोबाईल ऍप / DTH वरील स्वयंप्रभा वाहिन्या अशा माध्यमातून अध्ययन-अध्यापन सुरु ठेवणे

16.03.2020 ते 31.05.2020

 

शोधनिबंध/ प्रकल्प कार्य/ इंटर्नशिप अहवाल/ इ-प्रयोगशाळा/ अभ्यासक्रमाची पूर्तता / अंतर्गत मूल्यमापन / असाइनमेंट / प्लेसमेंट ड्राईव्ह इत्यादींना अंतिम स्वरूप देणे

 

01.06.2020 ते 15.06.2020

उन्हाळी सुट्ट्या

16.06.2020 ते 30.06.2020

परीक्षा

सत्रान्त / वर्षान्त (Terminal Semester/ Year)

सत्रमध्य / वर्षमध्य (Intermediate Semester/Year)

 

01.07.2020 ते 15.07.2020

16.07.2020 ते 31.07.2020

मूल्यमापन व निकाल घोषणा :

सत्रान्त / वर्षान्त (Terminal Semester/ Year)

सत्रमध्य / वर्षमध्य (Intermediate Semester/Year)

 

31.07.2020

14.08.2020

 

गरज पडल्यास, विद्यापीठे 01-06-2020 ते 30-06-2020 या कालावधीत 30 दिवसांची उन्हाळी सुट्टी घेऊ शकतात. तसे केल्यास, विविध मार्गांनी अध्यापन-अध्ययन 15-05-2020 पर्यंत घेतले जाऊ शकते आणि त्यानंतर शोधनिबंधाला अंतिम स्वरूप देणे वगैरे कामे 16-05-2020 ते 31-05-2020 दरम्यान पूर्ण केली जाऊ शकतात.

शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सुरुवात जुन्या विद्यार्थ्यांसाठी 01.8.2020 पासून तर नव्या विद्यार्थ्यांसाठी 01.09.2020 पासून केली जाऊ शकते.

     शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पुढीलप्रमाणे दिनदर्शिका सुचविण्यात येत आहे-

प्रवेश प्रक्रिया

01.08.2020 ते 31.08.2020

वर्गांचा प्रारंभ

दुसऱ्या / तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी

नवीन विद्यार्थी (प्रथम सत्र/ वर्ष)

 

01.08.2020

01.09.2020

परीक्षा

01.01.2021 ते 25.01.2021

सम सत्रासाठी (Even Semester) वर्गांचा प्रारंभ

27.01.2021

वर्गान्त (Dispersal of Classes)

25.05.2021

परीक्षा

26.05.2021 ते 25.06.2021

उन्हाळी सुट्ट्या

01.07.2021 ते 30.07.2021

पुढील शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ

02.08.2021

 

काही सर्वसामान्य सूचना :-

  1. विद्यापीठे आठवड्याचे सहा दिवस काम करू शकतात.
  2. प्रयोगशाळेतील / प्रात्यक्षिक प्रयोग यासाठीचे काम विद्यार्थ्यांना आभासी (virtual) प्रयोगशाळांद्वारे दिले जाऊ शकते.
  3. शास्त्रशाखा/ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आभासी (virtual) प्रयोगशाळांसाठी उपलब्ध करून दिलेली लिंक यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  4. आभासी वर्गखोल्या व विडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा विकसित करून सर्व अध्यापकांना ते तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण द्यावे.
  5. विद्यापीठांनी इ-अभ्यास / इ-प्रयोगशाळा प्रात्यक्षिके तयार करून त्यांच्या संकेतस्थळांवर अपलोड करावीत.
  6. गुरु-शिष्य समुपदेशनाची पद्धत मजबूत करावी.
  7. लॉक डाउनमुळे विद्यार्थी व कर्मचारीवर्ग विद्यापीठात येऊ शकत नसतील तेव्हाच्या काळासाठी त्यांच्या प्रवास व निवासाचे तपशील नोंदवून ठेवण्याची प्रणाली विद्यापीठांना विकसित करता येईल.
  8. माहिती-संपर्क तंत्रज्ञान (ICT) वापरण्यासाठी तसेच ऑनलाईन अध्यापनासाठी अध्यापकवर्गाला पुरेसे प्रशिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून अभ्यासक्रमाचा 25% भाग ऑनलाईन तर 75% भाग समोरासमोर शिकविता येईल.

टीप –

सद्यस्थिती आणि भविष्यातील अनिश्चितता पाहता, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणसंस्था व शिक्षणप्रणालीचे हित लक्षात घेऊन गरज भासल्यास या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल/सुधारणा करून / भर घालून पारदर्शक पद्धतीने त्या अंमलात आणाव्यात.

प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यापीठांना कायद्याच्या चौकटीत राहून पर्यायी पद्धतीचा अवलंब करता येईल.

केंद्र/ राज्य सरकारने जेथे जमावबंदीसदृश निर्बंध घातले असतील, अशा भागात असणाऱ्या शिक्षणसंस्थांनी त्यानुसार नियोजन करावे.

उचित सरकार / पात्र अधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना/ आदेशांवर कोणत्याही परिस्थितीत, या शिफारशींमुळे निर्बंध येणार नाहीत.

UGC ने प्रा.आर.सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीने, विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन, कोरोना साथीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याचा विचार करीत सदर अहवाल सादर केला.

कोविड-19 आणि लॉकडाउनच्या संदर्भाने, परीक्षा आणि शैक्षणिक दिनदर्शिका यासंदर्भात UGC च्या सविस्तर मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांबद्दल भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता UGC एक हेल्पलाईन सुरु करेल.

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619494) Visitor Counter : 532