विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

देशांतर्गत बनावटीचे जलद चाचणी व RT-PCS निदान किट्स तयार करण्यात मे-2020 अखेरपर्यंत देश स्वयंपूर्ण होणार - डॉ.हर्ष वर्धन


कोविड-19 वरील उपायांवर वेगाने संशोधन करण्याचे डॉ.हर्ष वर्धन यांचे शास्त्रज्ञांना आवाहन

"किमान सहा संभाव्य लसींच्या निर्मितीस सहाय्य दिले जात असून त्यापैकी चार प्रगत टप्प्यावर आहेत."- डॉ.हर्ष वर्धन

Posted On: 28 APR 2020 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या प्रतिकारासाठी देशात विकसित करण्यात येत असलेल्या लसी, जलद चाचणी आणि  RT-PCR निदान किट्सच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुटुंबकल्याण तसेच भूविज्ञान मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यामध्ये   जैवतंत्रज्ञान विभाग, आणि त्याच्या स्वायत्त संस्था तसेच BIRAC आणि BIBCOL हे सार्वजनिक उपक्रम(PSU) यांनी या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.

‘DBT अर्थात जैव तंत्रज्ञान विभागाने संशोधनासाठी बहुआयामी धोरण अवलंबले असून तातडीचे उपाय व दीर्घकालीन उपाय या दोन्हींसाठी कृतीयोजना तयार केली आहे’, अशी माहिती, डीबीटीच्या सचिव डॉ.रेणू स्वरूप यांनी दिली. यामध्ये संभाव्य लसींवर संशोधन, उपचारप्रणाली, देशांतर्गत बनावटीची निदानप्रणाली तसेच रोगकारक सूक्ष्मजीव आणि त्याला आसरा देणारे शरीर- या दोन्हींचे जनुकीय अभ्यास यांवर प्रयत्न सुरु आहेत. DBT आणि त्याचे PSU  असणारी BIRAC  (जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन साहाय्य परिषद ) यांनी यासाठी विविध संस्थांमार्फत एकत्रित काम करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. 

विभागाच्या शास्त्रज्ञांशी चर्चा करताना मंत्रिमहोदयांना, विषाणूच्या जीवनचक्राच्या महत्त्वाच्या पायऱ्या आणि त्याला अटकाव करणाऱ्या घटकांवर सुरु असलेल्या संशोधनाची माहिती देण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातील प्रतिपिंडांविषयी (antibodies) काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. DBT च्या विविध स्वायत्त संस्थांमध्ये संभाव्य लसींवर संशोधन सुरु असून त्या वैद्यक चाचणीपूर्वीच्या विविध टप्प्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. असे काही अभ्यास प्राथमिक स्तरावर असून काही प्रगत टप्प्यांवर आहेत. 

जनुकीय क्रमाबद्दल बोलताना डॉ.हर्ष वर्धन म्हणाले की, "या प्रयत्नांमुळे मला 26 वर्षांपूर्वीच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेची आठवण होत आहे. या मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्यात देशभरात प्रचंड प्रमाणात व कसून सर्वेक्षण करण्यात आले होते. पोलिओ विषाणूच्या प्रवासाचा इतिहास शोधण्यासाठी जनुकीय क्रमाचा अभ्यास केला गेला होता, व त्याचा फायदा पोलिओच्या निर्मूलनासाठी झाला", असे ते म्हणाले. 

सादरीकरणानंतर डॉ.हर्ष वर्धन यांनी शास्त्रज्ञांच्या कामाचे व अभिनव कल्पनांचे कौतुक केले. "DBT च्या शास्त्रज्ञांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे RT-PCS आणि प्रतिपिंडांच्या (antibodies) तपासणी किट्सच्या निर्मितीत पुढच्या महिनाअखेरपर्यंत देशाला स्वयंपूर्णता येऊ शकणार आहे. यामुळेच, पुढच्या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला दररोज एक लाख तपासण्या करण्याचे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल." असेही ते म्हणाले. नवीन लसी, नवीन औषधे, आणि वैद्यकीय उपकरणे  विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांनी जलदगतीने काम करावे असे आवाहनही डॉ.हर्ष वर्धन यांनी यावेळी केले. सहाय्य्य दिलेल्या सहापैकी चार  संभाव्य लसी प्रगत टप्प्यावर आहेत आणि त्यांच्यासाठी परवानगी प्रक्रिया वेगवान करण्याकरिता एका मंचाची निर्मिती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.  

स्टार्टअपच्या माध्यमातून आलेल्या 150 उत्पादनांना पाठबळ देण्याबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी BIRAC चे कौतुक केले. यापैकी 20 उत्पादने आता बाजारपेठेत येण्याच्या तयारीत आहेत. जैवतंत्रज्ञान विभागाच्या BIBCOL या सार्वजनिक उपक्रमाने तयार केलेल्या एका हॅन्ड-सॅनिटायझरचे त्यांनी उदघाटन केले. या सॅनिटायझरच्या प्रत्येक बाटलीमागे एक रुपया  पंतप्रधान सहाय्यता निधीकडे वळता  होणार असल्याचेही डॉ.हर्ष वर्धन यांनी सांगितले. 

या बैठकीत, DBT च्या सचिव डॉ.रेणू स्वरूप, अन्य वरिष्ठ अधिकारी, DBT च्या स्वायत्त संस्थांचे संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, आणि BIRAC व BIBCOL चे वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग होता.

* * *

B.Gokhale/J.Waishampayan/D.Rane


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619100) Visitor Counter : 208