आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणूमुळे आलेल्या खडतर आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारताने केली पुरेशी क्षमता आणि संसाधने प्राप्त -डॉ हर्ष वर्धन
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली
Posted On:
23 APR 2020 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2020
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात भारताचा प्रतिसाद तत्पर आणि श्रेणीबद्ध असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांशी आभासी संवादात्मक सत्रात ते बोलत होते.
कोविड-19 संदर्भात जगातली परिस्थिती चिंताजनक असून मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी विशेष उपाययोजनांची आवश्यकता डॉ हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. आपण एका कठीण काळात चर्चा करत आहोत आणि कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपल्या उत्तम बाबींची देवाणघेवाण करून आपण एकत्र काम करायला हवे असे ते म्हणाले.
कोविड-19 संदर्भात उपायाबाबत भारत अग्रणी होता असे सांगूनआपल्या कोरोना योद्ध्यांच्या बहुमोल आणि कळकळीच्या सेवेमुळे जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले. या रोगाच्या संभाव्य वाहकांवर लक्ष ठेवण्याच्या सरकारी एजन्सीच्या प्रयत्नाबाबत बोलताना, आम्ही हा शत्रू आणि त्याचा ठाव ठिकाणा जाणतो. सामुदायिक देखरेख, विविध सूचनावली आणि गतिमान धोरणाच्या माध्यमातून आम्ही या शत्रूला रोखण्यासाठी सक्षम झाल्याचे ते म्हणाले.
कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीचे देशातल्या आरोग्य सेवा बळकट करण्याच्या संधीत कसे रुपांतर झाले हे त्यांनी विषद केले. पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे असलेली प्रयोगशाळा ही कोविड 19 चे निदान करण्यासाठी आमच्याकडे सुरवातीला असलेली एकमेव प्रयोगशाळा होती. गेल्या तीन महिन्यात आम्ही सरकारी प्रयोगशाळाची संख्या 230 वर नेली 87 खाजगी प्रयोगशाळा आणि 16,000 हून अधिक कलेक्शन केंद्रे झाली. कोविड -19 साठी आम्ही आतापर्यंत 5 लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळांची संख्या 300 पर्यंत आणि सध्याची दररोज 55,000 चाचण्या करण्याची क्षमता 31 मे 2020 पर्यंत 1 लाख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशाच्या सज्जतेची त्यांनी माहिती दिली. आगामी काळात रुग्णांच्या वाढत्या संख्येसाठी सज्ज असल्याचे सरकारने सुनिश्चित केले आहे.रोगाच्या तीव्रतेनुसार सरकारने त्यावरच्या उपचारांच्या तीन श्रेणी केल्या आहेत.सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड सुश्रुषा केंद्र, मध्यम लक्षणे असणाऱ्या साठी कोविड आरोग्य सुश्रुषा केंद्र आणि तीव्र लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी कोविड समर्पित रुग्णालये.लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांना सुलभपणे हलवता येईल अशीच यांची रचना करण्यात आली आहे. सध्या देशात 2,033समर्पित सुविधा असून 1,90,000 पेक्षा जास्त अलगीकरण खाटा, 24,000 अति दक्षता खाटा आणि 12,000 हून जास्त व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत.या सर्व सुविधा तीन महिन्यात संघटीत करण्यात आल्या आहेत.
आपल्याला या रोगाचा किती धोका आहे याबाबत जनतेला जाणून घ्यायचे असणार हे लक्षात घेऊन आणलेले आरोग्य सेतू हे ऐप किती प्रभावी आहे हे त्यांनी अधोरेखित केले. 7.2 कोटी पेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. कोविड-19 विरोधातल्या लढ्यासाठी केंद्र सरकारने हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. कोविड-19 संदर्भातला धोका, तो टाळण्यासाठीची खबरदारी,उत्तम प्रथा आणि सूचना याबाबत हे ॲप माहिती देते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान नेता देशाला लाभला असून तज्ञांनी दिलेल्या सूचनांचा स्वीकार करत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत कोविड विरोधातला लढा प्रभावीपणे हाताळत आहे असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. लॉक डाऊनचे पालन करण्यात जनतेनेही आमच्या प्रयत्नांना सहकार्य दिल्याचे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि सर्व रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आणि येत्या काळात त्यांचे आरोग्य राखण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617735)
Visitor Counter : 263