पंचायती राज मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल 2020 ला देशातल्या ग्राम पंचायतींशी साधणार संवाद


राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी होणार

Posted On: 22 APR 2020 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी  24 एप्रिल 2020 ला  देशातल्या विविध  ग्राम  पंचायतींशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

देशात लॉक डाऊन असून सोशल डीस्टन्सिंगचे  पालन करण्यात येत असल्याने सहभाग घेणाऱ्या व्यक्तींशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे  संवाद साधणार आहेत.

यावेळी  पंतप्रधान एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल अॅपचे अनावरण करणार आहेत.

एकीकृत पोर्टल हा पंचायत राज मंत्रालयाचा नवा उपक्रम असून, ग्राम पंचायतींना त्यांच्या ग्राम पंचायत विकास आराखड्याची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सिंगल इंटरफेस पुरवणार आहे.

स्वामित्व योजनेचा प्रारंभही पंतप्रधान करणार आहेत.ग्रामीण भागासाठी एकीकृत मालमत्ता प्रमाणीकरण या योजनेद्वारे पुरवण्यात येणार आहे.ग्रामीण भागात वसाहती जमिनीची सीमा निश्चिती ड्रोन तंत्रज्ञान या अद्ययावत सर्वेक्षण पद्धतीने करण्यात येईल. पंचायत राज मंत्रालय, राज्य पंचायत  राज विभाग आणि राज्य महसूल विभाग आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

पंचायती राज मंत्रालय दरवषी या  कार्यक्रमात, जन हित आणि सेवा प्रदान करण्यात सुधारणा करत  उत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायत/राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा गौरव करते. यावर्षी नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार, बाल स्नेही ग्राम पंचायत पुरस्कार,ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार असे तीन पुरस्कार संबंधित राज्य/केंद्र शासित प्रदेशाला दिले जातील. 

पूर्वपीठीका:

  1. घटना दुरुस्ती (73 वी सुधारणा) कायदा 1992 द्वारे पंचायती राज संस्थापनेसह 24 एप्रिल 1993 अधिकारांचे तळापर्यंत विकेंद्रीकरण करण्याच्या इतिहासातला महत्वाचा क्षण ठरला. पंचायती राज मंत्रालय दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायती दिन म्हणून साजरा करते. 73 वी घटना दुरुस्ती या दिवसापासून अमलात आली त्या प्रीत्यर्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. देशभरातल्या पंचायत प्रतिनिधीना थेट संवादाची संधी या कार्यक्रमाद्वारे प्राप्त होते.
  2. राष्ट्रीय पंचायती राज दिन साधारणतः दिल्ली बाहेर मोठ्या कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो. अनेकदा पंतप्रधान या कार्यकर्माला उपस्थित राहतात. या वेळी उत्तर प्रदेशातल्या झाशी इथे हा राष्ट्रीय कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. पंतप्रधान या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार होते आणि देशभरातल्या ग्राम सभा आणि पंचायती राज संस्थाना संबोधित करणार होते. मात्र कोविड-19 मुळे देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थिती मुळे राष्ट्रीय पंचायती राज दिन 24 एप्रिलला शुक्रवारी हा दिवस डिजिटली साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
  3. देशभरात  जन हित आणि सेवा प्रदान सुधारणा  करत उत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायत/राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा गौरव पंचायती राज मंत्रालय दरवर्षी करते. दीन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार, बाल स्नेही ग्राम पंचायत पुरस्कार,ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार आणि ई पंचायत पुरस्कार ( केवळ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला जातो) अशा विविध श्रेणी मधे हे पुरस्कार दिले जातात. या वर्षी लॉक डाऊन मुळे केवळ नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार, बाल स्नेही ग्राम पंचायत पुरस्कार,ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार असे केवळ तीनच  पुरस्कार निश्चित करण्यात आले असून ते संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्र्देशाना  देण्यात येतील.दोन श्रेणीतल्या  पुरस्काराना अंतिम स्वरूप योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल आणि राज्यांनात्याबाबत कळवण्यात येईल. कोविड-19 मुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.  
  4. राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमाचे प्रक्षेपण डीडी न्यूज वर करण्यात येईल.लॉक डाऊनच्या आणि सोशल डीस्टन्सिंगच्या निकषांचे पालन करत पंचायती राज विभाग अधिकारी आणि राज्य,जिल्हा, गट, पंचायत स्तरावरच्याअधिकारी या ई कार्यक्रमात सहभागी होतील. 

* * *

 

G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1617321) Visitor Counter : 233