आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. हर्षवर्धन यांची राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट
लॉकडाऊन 2.0 च्या काळात केलेल्या शिस्तपालनाचा फायदा कोविड-19च्या उच्चाटनाच्या रुपात दिसणार
“अशा काळात करत असलेल्या सेवेबद्दल देश आरोग्य योद्ध्यांचा ऋणी आहे”
Posted On:
19 APR 2020 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयांना निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेऊन राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालय 450 खाटांचे समर्पित कोविड-19 रुग्णालय म्हणून काम करत असून त्यामध्ये पुरेशा प्रमाणात अलगीकरण कक्ष आणि खाटा उपलब्ध आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी फ्लू कॉर्नर, अलगीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष, क्रिटीकल एरिया/ अतिदक्षता विभाग, कोविड कॉरिडॉर, कोविड एरिया, कोविड बाह्यरुग्ण विभाग, कोविड नमुना संकलन विभाग, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांचे पोशाख बदलण्याच्या सुविधा या सर्व विभागांची पाहणी केली. या सर्व कक्षांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आंघोळीच्या, पोशाख बदलण्याच्या आणि स्प्रे निर्जंतुकीकरणाच्या विशेष सुविधा आरएमओ वसतिगृहात उपलब्ध करून दिल्याची माहिती मिळाल्यावर केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराकडे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊ नयेत तसेच ते आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी त्यांची जवळच्याच काही हॉटेलांमध्ये निवासाची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल असलेल्या एका कोविड रुग्ण डॉक्टरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विचारपूस केली. हा डॉक्टर विमानतळावर प्रवाशांची आरोग्य तपासणी करताना आणि नरेला क्वारंटाईनमध्ये कार्यरत असताना कोविड बाधित बनला होता. या रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या या डॉक्टरच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आणि या आजाराला तोंड देताना त्याचे मनोधैर्य पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
या रुग्णालयातील विविध कक्षांची आणि संकुलांची अतिशय बारकाईने पाहणी केल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड19 प्रतिबंधासाठी केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी गेल्या काही दिवसात आपण दिल्लीचे एम्स, एलएनजेपी, आरएमएल, सफदरजंग, झाज्जरचे एम्स आणि आता राजीव गांधी सुपर स्पेशालिटी अशा विविध रुग्णालयांना भेटी दिल्या आहेत आणि या महामारीला तोंड देण्यासाठी या रुग्णालयांनी केलेल्या व्यवस्थांबाबत आपण समाधानी आहोत असे ते म्हणाले.
कोविड-19 ला तोंड देण्यासाठी परिचारिका, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेला निर्धार, कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती आणि वचनबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली. कोविड-19च्या रुग्णांच्या रोगमुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून मार्च 29 रोजी संपलेल्या आठवड्यातील 8 टक्क्यांवरून या आठवड्याच्या अखेरीला हे प्रमाण 12 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अधिकाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. त्यावरुनच आपल्या आघाडीवर राहून रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा उच्च दर्जा दिसून येत असल्याचे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
त्यांच्या या यशाबद्दल मी त्यांचे कौतुक करत आहे. अशा कठीण प्रसंगी तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल संपूर्ण देश तुमचा ऋणी आहे. अशा कठीण प्रसंगात आपल्या आरोग्य योद्ध्यांचे उच्च मनोधैर्य वाखाणण्याजोगे आहे, असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 प्रतिबंधाच्या उपाययोजनांवर राज्यांच्या सहकार्याने अतिशय उच्च स्तरावरून लक्ष ठेवले जात असुन नव्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ देखील आता स्थिर होऊ लागली आहे. लॉकडाऊनपूर्वी भारतातील रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवस होता. मात्र, गेल्या सात दिवसात उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार हे प्रमाण आता 7.2 दिवस झाले आहे. गेल्या 14 दिवसात ते 6.2 होते आणि गेल्या तीन दिवसात हे प्रमाण 9.7 झाले आहे. सध्याच्या काळात चाचण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास 14 पटीने वाढ होऊनही ही आकडेवारी दिसत आहे. 15 मार्च ते 31 मार्च या काळात रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण 2.1 होते तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण 1.2 झाले आहे. संपूर्ण देशासाठी ही उत्साहवर्धक घडामोड आहे. यातूनही कोविड-19 च्या रुग्णांच्या एकूण संख्येत वाढ होत नसल्याचे आणि ही संख्या स्थिर होण्याची शक्यतता असल्याचे दर्शवत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत तीन मे पर्यंत वाढ केल्यानं या काळापर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आणि शिस्तीने त्याचे पालन करण्याचे आणि कोविड-19च्या संक्रमणाची साखळी तोडण्याचा हा एक महत्त्वाचा उपाय असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले. लॉकडाऊन 2.0 च्या काळात शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे पालन केले तर या महामारीच्या उच्चाटनाच्या प्रक्रियेच्या रुपात आपल्याला त्याची सकारात्मक फळे मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण अनेक लढाया जिंकल्या आहेत आणि कोविड-19 च्या विरोधातील लढाई देखील नक्कीच जिंकू असा विश्वास डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.
B.Gokhale/S.Patil/D.Rane
(Release ID: 1616198)
Visitor Counter : 283