पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 17 APR 2020 10:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली.

उभय नेत्यांनी यावेळी कोविड-19 या जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आव्हानाविषयी आपआपली मते व्यक्त केली. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही देशात कोणती पावले उचलण्यात येत आहेत, तसेच लोकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी त्याचबरोबर आर्थिक दुष्परिणाम कमीतकमी व्हावेत, यासाठी सरकार करत असलेल्या उपाय योजनांची चर्चा केली.

सध्याच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा करण्यासाठी भारताच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी योवळी दिले.

कोविड-19 महामारीचा प्रसार संपूर्ण खंडामध्ये झाला आहे. अशा संकटाच्या काळात अफ्रिकन संघाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्राध्यक्ष रामाफोसा पुढाकार घेवून अतिशय कार्यक्षमतेने समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत, याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये शतकांपासून जुने मैत्रीचे दृढ नाते आहे. यामुळे दोन्ही देशांतल्या माणसां-माणसांमध्ये ऋणानुबंध जुळले आहेत. हे लक्षात घेवून या कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अफ्रिकेच्या प्रयत्नांना भारताकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासनही पंतप्रधान यांनी यावेळी दिले.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1615534) Visitor Counter : 235