संरक्षण मंत्रालय

कोविड-19 बरोबर सामना करण्यासाठी पीपीई आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीविषयी वेबिनार

Posted On: 17 APR 2020 7:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

कोविड-19चा वाढता प्रसार लक्षात घेवून या संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सामुग्रीची वाढती मागणी लक्षात घेवून त्यांची निर्मिती देशांतर्गत करण्याची निकड निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा उत्पादनांची निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी शासकीय आणि अशासकीय क्षेत्रांमध्ये प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात एसआयडीएम म्हणजेच सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्यूफॅक्चरर्स आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संरक्षण संशोधन विभाग (डीडीआर अँड डी) चे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी. सतीश रेड्डी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

या वेबिनारला डॉ. सतीश रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. सध्या देशभरात उद्भवलेल्या कोविड-19 महामारीचे युद्ध जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय उपकरणाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने देशभरामध्ये संशोधन आणि निर्मिती केली जात आहे, त्याचे डॉ. रेड्डी यांनी कौतुक केले. डीआरडीओने ‘वैयक्तिक संरक्षण सामुग्री’चे नवीन डिझाईन तयार केले आहे. आता त्याप्रमाणे उत्पादनाची निर्मिती करण्याची गरज आहे. जे उद्योजक या संरक्षण संचाची निर्मिती करू इच्छितात, त्यांना डीआरडीओच्यावतीने आवश्यक ती माहिती-ज्ञान देण्यास सिद्ध आहे, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. ‘पीपीई’च्या  सामुग्रीचा पुनर्वापर करणे शक्य आहे का, त्यासाठी कोणता कपडा वापरणे योग्य ठरेल, याविषयी संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. व्हँटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, गॉगल्स, परीक्षण संच, स्वॅब्स आणि व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम (व्हीटीएमएस) या घटकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्यामुळे त्यांचे उत्पादन देशांतर्गतच केले जावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे या वेबिनारमध्ये सांगण्यात आले.

डीआरडीओच्या वतीने सध्या सुमारे 15 ते 20 नवीन उत्पादने विकसित करण्यात आली आहेत, अशी माहिती डीडीआर अँड डी च्या सचिवांनी यावेळी दिली. यूव्ही स्वच्छता खोके, हातात पकडता येईल असे यूव्ही यंत्र, कोविड नुमने गोळा करण्याचा कक्ष, पायाने चालवता येईल असे धूर करणारे यंत्र, स्पर्शमुक्त निर्जंतुकीकरण यंत्र आणि कोविड विषाणूंपासून चेहरा सुरक्षित ठेवू शकणारी ढाल या नवीन साधनांची वेबिनारमध्ये माहिती देण्यात आली. 

यावेळी उपस्थितांनी परस्परांमध्ये संवाद साधला. त्यामुळे अनेकांनी उपस्थित केलेल्या  विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. कोविड-19 चा सामना करण्यासाठी लागणा-या वैद्यकीय साधनांच्या निर्मितीसाठी कोणत्या प्रकारची सामुग्री वापरणे गरजेचे आहे. तसेच चाचण्या करताना काय लागेल याविषयी उत्पादकांनी प्रश्न विचारले. त्याला डीआरडीओ आणि सिट्रा म्हणजेच दक्षिण भारत वस्त्रोद्योग संशोधन संघटना आणि इतर संस्थांच्यावतीने उत्तरे देण्यात आली. डीआरडीओच्या वतीने सर्व उद्योजकांना सर्व तांत्रिक माहिती, तपशील मोफत पुरवण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

सध्याचा संकटाचा काळ लक्षात घेवून, या वेबिनारमध्ये सहभागी झालेले उद्योजक आणि डीआरडीओ यांच्यामध्ये तंत्रज्ञानाची भागीदारी अधिक मजबूत बनले, अशी आशा व्यक्त करून डॉ. रेड्डी यांनी सर्व सहभागीदारांना शुभेच्छा दिल्या.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1615497) Visitor Counter : 293