विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या आणखी एका प्रयोगशाळेतर्फे नॉवेल कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेच्या शोधाचे काम सुरु
Posted On:
17 APR 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020
सीसीएमबी अर्थात पेशी आणि रेणू जीवशास्त्र केंद्र आणि आयजीएमबी अर्थात जनुकीय आणि एकात्मिक संशोधन संस्था यांच्यानंतर आता सीएसआयआर अर्थात राष्ट्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या आणखी एका प्रयोगशाळेने नॉवेल कोरोना विषाणूच्या संपूर्ण जनुकीय रचनेच्या संशोधनाचे काम हाती घेतले आहे. चंदिगढ येथील इमटेक अर्थात सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत या विषाणूच्या संपूर्ण जनुकीय रचनेचा शोध लावण्याचे कार्य सुरु झाले आहे.
विषाणूंमध्ये म्युटेशन अर्थात उत्परिवर्तनाचे प्रमाण इतर सूक्ष्म जीवांपेक्षा जास्त आहे आणि स्वतःची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रक्रियेत ह्या विषाणूंच्या जनुकीय रचनेत सतत बदल होत राहतात. म्हणून त्यांच्या संपूर्ण जनुकीय रचनेचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना कोरोना विषाणूची उत्पत्ती, भारतात आढळून येणाऱ्या या विषाणूच्या विविध उपजाती तसेच या विषाणूच्या देशभरात होत असलेल्या जलद प्रसाराची कारणे यांच्याबद्दल काही ठोस निष्कर्ष काढता येतील, अशी माहिती सीएसआयआर-इमटेकचे संचालक डॉ. संजीव खोसला यांनी इंडिया सायन्स वायर या संस्थेशी बोलताना दिली.
सीएसआयआर-इमटेकने या पूर्वीच कोरोना संदिग्ध रुग्णांच्या नमुन्यांची वैद्यकीय चाचणी सुरु केली असून आता जागतिक महामारीला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूची जनुकीय रचना समजून घेण्यासाठीच्या संशोधनाची मोहीम नव्याने हाती घेत आहोत, असे खोसला यांनी सांगितले.
U.Ujgare/S.Chitnis/P.Kor
(Release ID: 1615432)
Visitor Counter : 256