विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड – 19 : गुवाहाटी इथल्या संस्थेने नाविन्यपूर्ण त्रिमितीय उत्पादने केली विकसित

Posted On: 11 APR 2020 3:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोविड – 19 विषाणूच्या महामारीशी लढा देण्यासाठी गुवाहाटी इथल्या एनआयपीईआर अर्थात राष्ट्रीय औषधशास्त्र शिक्षण आणि संशोधन संस्थेने दोन नाविन्यपूर्ण त्रिमितीय उत्पादने विकसित केली आहेत. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ही उत्पादने अत्यंत उपयोगी आहेत.

यापैकी पहिले उत्पादन म्हणजे दारे, खिडक्या, ड्रॉवरची हॅन्डल्स, फ्रीजची दारे, इत्यादी उघडण्या- बंद करण्यासाठी तसेच लिफ्टची बटणे, विजेच्या उपकरणांची बटणे तसेच कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यांची बटणे दाबण्यासाठी वापरता येणारे त्रिमितीय उपकरण. दारे,खिडक्या, लिफ्ट तसेच इतर अनेक उपकरणांची बटणे, ड्रॉवरची हॅन्डल्स यांच्यावर सर्वात जास्त जंतू आढळतात. सध्या सर्वत्र होत असलेल्या कोविड – 19 विषाणूचा प्रसार लक्षात घेता, या सर्व वस्तूंवर असणारे जंतू कोरोनाच्या प्रसाराला हातभार लावू शकतात. तेव्हा या सर्व वस्तूंना जर कोरोना विषाणू बाधित व्यक्तीने स्पर्श केलेला असेल आणि निरोगी माणसाने जर उघड्या हाताने त्यांना स्पर्श केला तर त्याला संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी एनआयपीईआर संस्थेच्या संशोधकांनी बनविलेले उपकरण अत्यंत उपयोगी आहे कारण ते जन्तुबाधित वस्तूंशी हाताचा प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी उपयोगी आहे. हे उपकरण वापरण्यास सोपे, मजबूत आणि सध्या वापरात असलेल्या कुठल्याही अल्कोहोलयुक्त जंतुनाशक किंवा सॅनिटायझरने सहज स्वच्छ होणारे आहे.

या संस्थेने तयार केलेले दुसरे उपकरण म्हणजे नॉवेल कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त असलेले चेहेऱ्याचे त्रिमितीय जंतुरोधक संरक्षक आवरण. तोंडाद्वारे, डोळ्यांद्वारे, श्वसनमार्गाद्वारे तसेच मानवी शरीराच्या इतर पोकळ्यांद्वारे कोरोना विषाणूंचा प्रसार कसा होतो याचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी या जन्तुरोधक आवरणाची संरचना केली आहे. हे आवरण चेहेऱ्यावर चढविण्यास सोपे, रासायानिकदृष्ट्या अविघटनशील, दीर्घकाळ टिकणारे आणि सध्या वापरात असलेल्या कुठल्याही अल्कोहोलयुक्त जंतुनाशक किंवा सॅनिटायझरने सहज स्वच्छ करता येऊ शकणारे आहे.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Kor



(Release ID: 1613297) Visitor Counter : 155